
>> दिलीप देशपांडे
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण आपण साजरा करतो. आपण साडेतीन मुहूर्त मानतो. त्यातील गुढीपाडवा हे एक मुहूर्त आहे. आपल्या दाराशी गुढी उभारणे हे विजयाचे तसेच समृद्धीचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी अनेक जण नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक जण शुभ संकल्प करतात. या दिवशी केलेले संकल्प फलदायी ठरतात असा अनेकांना अनुभव आहे.
गुढीपाडवा आपसातील वैरभाव, मतभेद विसरून शांतता मिळवून देणारा आनंददायी असा सण आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस पवित्र समजला जातो.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारासमोर गुढी उभारली जाते. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. गुढी दाराशीच उजव्या बाजूला, तशीच खिडकीमध्ये, गच्चीवरही उभारली जाते. दाराशी सडा टाकून सुंदर रांगोळ्या काढतात. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. पूजेनंतर कडूनिंबाची पाने आणि गूळ मिश्रण सेवन करतात. येणारे वर्ष आरोग्यदायी जावे, उन्हाळा त्रासदायक ठरू नये हीच त्यामागील भावना असते.
प्रभू श्रीरामचंद्रांचे विजयाचे प्रतीक, रावणावरच्या विजयाचे कौतुक असा हा आनंददायी सण.
विजय पताका
श्रीरामाची झळकते अंबरी…
प्रभू आले मंदिरी….
गुलाल उधळूनी नगर रंगले…
भक्त जनांचे थवे नाचले…
रामभक्तीचा गंध दरवळे …
गुढय़ा तोरणे, घरोघरी..गं.घरोघरी.।
प्रभू आले मंदिरी,…
अयोध्येचा आला राजा…
या गाण्यात त्याचे खूप छान वर्णन केले आहे.
रावणाच्या त्रासातून मुक्त झाल्याने व श्रीरामाचे आगमन झाल्याने नगरवासीय आनंदित झाले आहे. त्यांनी गुढय़ा उभारल्या, तोरणांनी घरे सजविले, गुढीपाडव्याचे दिवशी घरोघरी हे गाणं ऐकायला मिळतं.
संध्याकाळी परत गुढीची पूजा करून गुढी उतरवण्याची प्रथा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा आपल्यावर पाश्चात्यांचा पगडा कायम आहे. 1 जानेवारीलाच नववर्ष साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. 31 डिसेंबरला मद्यधुंदावस्थेत सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि त्याच अवस्थेत नववर्षाचे स्वागत करायचे, फटाके फोडायचे विचित्र प्रकार सुरू आहे. त्यातून अपघात, मारामाऱया, बलात्कार, विनयभंग, संस्कृतीचे अधःपतन सुरू आहे. कोण थोपवणार हे सगळं? ज्यांनी काहीतरी करायला हवे ते बसतात मूग गिळून. सरकारी तिजोरीत मात्र खूप सारा पैसा जमा होतो.
एक विचार मनात येतो, 28 डिसेंबर ते 4-5 जानेवारीपर्यंत शासनाने दारूबंदी करावी. बघा कोण नववर्ष साजर करतो? (नव्वद टक्के लोकांच हे नववर्ष केवळ आणि केवळ मद्यप्राशनासाठी साजर करणं असते हे सांगायला नकोच.) काय साध्य होतय यातून? एका चांगल्या कामाची मुहूर्तमेढ प्रशासनाकडून होणार का?
सत्ययुगाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. प्रभू श्रीरामाच्या आगमनाचा दिवस गुढीपाडवा… आध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि ते योग्यच आहे.
पाश्चात्यांच करत असलेले अंधानुकरण रोखण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. गुढीपाडव्याला मांगल्याची गुढी उभारून, नववर्षाचे स्वागत करून, एकमेकांना मंगलमय शुभेच्छा देऊन आपला मराठी बाणा जपूया!
























































