
खान्देशची मुलूखमैदान तोफ अशीच माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांची ओळख होती. 23 ऑगस्ट रोजी अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील दहिवद येथे ती कायमची थंडावली. वृद्धापकाळाने गेली अनेक वर्षे गुलाबराव सक्रिय नव्हते. मात्र प्रामुख्याने खान्देशात एक काळ गुलाबराव पाटील यांच्या झंझावाती राजकारण आणि समाजकारणाचा होता. समाजवादी विचारांच्या गुलाबरावांवर साने गुरुजींचा पगडा होता. ते राष्ट्रसेवा दलाचे शिपाई होते. 1978 मध्ये पुलोद काळात ते अमळनेर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. नंतर तीन वेळेस एकूण 13 वर्षे ते जनता दलाचे आमदार होते. हा संपूर्ण काळ त्यांनी अक्षरशः गाजवला. मायबोली ‘‘अहिराणीतूनच शपथ घेईन’’ अशा घोषणा करून त्यांनी त्यावेळी विधानसभा गाजवली होती. शेतकऱयांच्या प्रश्नांवर त्यांचा अभ्यास दांडगा होता. तेवढय़ाच आक्रमकतेने ते शेतकऱयांचे, कष्टकऱयांचे प्रश्न सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडत असत. कापूस उत्पादक शेतकऱयांसाठी काढलेला शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळविणे अशा आंदोलनांमुळे त्यावेळी गुलाबराव वामनराव पाटील यांनी विरोधक असूनही राज्याच्या राजकारणावर स्वतःची छाप उमटविली होती. त्यांची जाहीर सभांमधील भाषणे म्हणजे त्या काळी श्रोत्यांसाठी पर्वणीच असे. जाहीर सभेत मध्यांतर घेऊन पुन्हा सभा सुरू करण्याचे कसब आचार्य अत्रेंनंतर गुलाबराव वामनराव पाटील यांच्याकडेच होते. संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली सभा रात्रौ 10-11 पर्यंत चालत असे. त्यामुळे मध्यांतर करावे लागे. विशेष म्हणजे मध्यांतरांनंतर गर्दी वाढलेली असायची. आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या तुफान सभांमुळे जळगाव जिल्हा दणाणून सोडला होता. अहिराणी भाषेत ते विरोधकांच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवीत असत. असे असले तरी विरोधकांत त्यांची सगळय़ांशी ‘मैत्री’ होती. तेवढा मोकळेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. ‘भरा गाडी आणि चाला वलवाडी’ ही त्यांची घोषणा प्रचंड गाजली होती. सोप्या, ग्राम्य भाषेतील घणाघाती भाषणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. आणीबाणी काळात त्यांची नाशिकच्या तुरुंगात रवानगी झाली होती. त्यावेळी तेथील एकूण स्थानबद्ध ‘मीसाबंदी’पैकी सर्वाधिक काळ पॅरोलवर गावी जाणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील होते. वागण्या-बोलण्यात असलेली निर्भीडता आणि बेधडकपणा त्यांच्या पत्रकारितेतदेखील होता. ‘साथी संदेश’ या त्यांच्या साप्ताहिकाचे अनेक विशेषांक गाजले. ग्राम्य म्हणींचा मुक्त वापर ते भाषणांमधून आणि ‘साथी संदेश’ या साप्ताहिकातून करीत. अत्यंत चपखल आणि आक्रमक शीर्षके देण्यातही त्यांचा हातखंडा होता. राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री के. एम. बापू पाटील हेदेखील गुलाबरावांच्या लेखणीच्या तडाख्यांतून सुटले नव्हते. समाजवादी विचारांवर त्यांची एवढी अविचल निष्ठा होती की, तिथी, मुहूर्त वगैरे परंपरागत शिष्टाचारांना फाटा देत आपल्या जन्मदिनी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वांचे विवाह केले. प्रजा समाजवादी पक्षापासून सुरू झालेला गुलाबरावांचा राजकीय प्रवास संयुक्त समाजवादी, नंतर जनता दल असा झाला. मात्र एका टप्प्यावर ते काँग्रेसवासी झाल्याने त्यांच्या अनेक समर्थकांनाही धक्का बसला होता. बहुधा त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण काँग्रेसकडून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या गुलाबरावांचा भाजपच्या डॉ. बी. एस. पाटील यांनी पराभव केला. त्यानंतर गुलाबरावांचा राजकीय प्रभाव हळूहळू कमी होत गेला आणि नंतर वयपरत्वे ते सक्रिय राजकारणातून बाहेरच राहिले. अर्थात सामाजिक, शैक्षणिक कार्यात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. ज्यांच्या कारवरदेखील ‘मुलूखमैदान’ असे लिहिले होते अशा गुलाबराव पाटील यांच्या निधनाने एक तळमळीचा कार्यकर्ता आणि तत्कालीन समाजवादी परंपरेतील एक निर्भीड आणि लढवय्ये नेतृत्व कायमचे पडद्याआड गेले आहे.





























































