लेख : चित्ती असो द्यावे…

>> दिलीप जोशी

खुदकन हसू फुटणारी माणसे मनाने निर्मळ असतात असे म्हटले जाते. असे ठोकताळे बांधण्याची माणसाची सवयच असते. कदाचित त्यामागे अनुभव दडलेला असतो. एक प्रकारे हा नकळत झालेला ‘सॅम्पल सर्व्हे’च असतो. साधारण एक प्रकारची भावभावना व्यक्त करणारी माणसे कशी असतील याचे अंदाज बांधले जातात. ‘‘अमकी तमकी व्यक्ती पाहताच आपल्यालाही प्रसन्न वाटते’’ किंवा ‘‘चेहऱयावरूनच कळत होता त्याचा खडूसपणा’ अशी मते गावगप्पांत ऐकायला मिळतातच. मग एखादा सांगतो, ‘‘अहो ते दिसतात उग्र, पण आहेत अगदी मनमिळाऊ.’’ म्हणजे इथे ‘एक्झिबिट-पोल’ फसतो. त्यावर कोणी म्हणते ‘‘दिसतं तसं नसतं हेच खरं.’’

प्रत्येक गोष्टीबद्दल आपले असे एक मत असतेच. कधी आतून आलेले, कधी बाहेरून लादलेले. कधी स्वीकारलेले तर कधी भ्रामक मतमतांच्या गलबल्यात केलेल्या स्वभाव-चाचण्या तंतोतंत खऱया ठरतीलच असे काही सांगता येत नव्हते. तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने ‘रॅण्डम सॅम्पल सर्व्हे’ घेतला जातो. त्याचा गवगवा होतो निवडणुकीच्या काळात. आपण नुकताच त्याचा अनुभव घेतला, पण जगात सातत्याने विविध क्षेत्रांत, विविध विषयांसाठी पाहणी, चाचणी सुरूच असते. जगातल्या नामांकित संस्था अशा चाचण्या घेतात. त्यांचे निष्कर्ष किंवा भाकीत बऱयाचदा बरोबर ठरल्याने त्यांना विश्वासार्हता प्राप्त होते.

जगात कोणत्या देशातली माणसे समाधानी आहेत याची पाहणीसुद्धा वारंवार केली जाते. बहुतेक वार्षिक परीक्षेसारखी ती वार्षिक असावी. मग ‘सुखी माणसाचा सदरा’ घातलेल्या त्या देशाचे नाव जाहीर केले जाते. गेल्या वेळी फिनलॅण्ड या युरोपच्या डोक्यावरील ‘स्कॅडिनेवियन’ समजल्या जाणाऱया देशसमूहातील देशाचे नाव ‘समाधानी’ लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले. हिंदुस्थानींचाच नव्हे, तर अमेरिकनांचा नंबरही बराच खाली गेलेला होता.

प्रश्न समाधानाचा. समर्थ रामदासांनी प्रश्न केला की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनि पाहे.’ राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काही ना काही विवंचना असतेच. सुखी माणसाच्या ‘सदऱया’च्या शोधात असलेला ‘सुखी’ माणूस सापडला, पण त्याच्याकडे ‘सदरा’ (शर्ट) नव्हता! अशा रूपक कथा मानवी स्वभावाचे दर्शन घडवतात.

आता फिनलॅण्डसारख्या अवघ्या काही लाखांत लोकसंख्या असलेल्या देशातली मंडळी समाधानी असतील तर त्यांचे कौतुकच करायला हवे, पण काही वर्षांपूर्वी हा मान बांगलादेशलाही मिळाला होता. दारिद्रय़, वादळांचे तांडव आणि अनेक समस्यांनी ग्रासलेले बांगलादेशी सुखी आणि संपन्न, फिनिश लोकही सुखी-समाधानी. म्हणजे समाधानाचे नेमके गणित काय?

अमूर्त भावना गणिती पद्धतीने व्यक्त करताच येत नाहीत. ‘अमक्याला फार राग येतो’ म्हणजे किती याचे काही मोजमाप नसते. कोणी चिडून ओरडतो, कोणी आदळआपट करतो, कोणी वस्तू फेकतो वगैरे, पण ‘फार’ राग आलेली काही माणसे दोन-दोन दिवस घुम्यासारखी बसून राहून निषेध करतानाही दिसतात. प्रत्येक भावनेची प्रत्येकाची अभिव्यक्ती निराळी. एखाद्याला कोणी विनोद सांगतेय म्हटले की, हसू फुटते. विनोद ऐकण्याआधीच त्याची पूर्वतयारी मनात झालेली असते. ‘पुलं’चे भाषण किंवा पूर्वी अत्र्यांचे भाषण म्हटले की, लोक ‘कन्डिशण्ड’ होऊनच जात. गाण्याच्या मैफलीत मना ‘सूर’ धरून जावे तसे. त्यामुळे हास्यकल्लोळाची मजा यायची. काही जण मात्र ‘‘विनोद बिनोद कसले करता!’’ म्हणून करवादल्यासारखे मख्ख बसतात. आमच्या परिचयातले एक गृहस्थ कोऱया (ब्लँक) चेहऱयाने ‘विनोद’ ऐकायचे आणि शेवटी ‘‘अच्छा! असं झालं तर!’’ म्हणायचे. त्यांना कोण विनोद सांगण्याचा फंदात पडणार? एका संस्कृत कवीने वैतागून म्हटलेय, ‘‘अरसिकेषु काव्यमादाय, शिरसि मा लिख मा लिख’’ म्हणजे अरसिकाला कविता वाचून दाखवायची वेळ न येवो.

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते खरेच. फिनिश लोक समाधानी असतील तर उत्तमच, पण त्याच भागातल्या नॉर्वेमधली एक मुलगी वडिलांबरोबर एका ‘आकाशदर्शन’ कार्यक्रमात आली होती. मी ‘मृग’ नक्षत्र दाखवत होतो. त्यातला ‘काक्षी’ तारा मरणपंथाला लागलाय असे सांगताच ती म्हणाली, ‘‘प्लीज, असे म्हणू नका. तो माझा फार आवडता तारा आहे. आय लव्ह हिम!’’ तिच्या डोळय़ांत पाणी होते. मला क्षणभर काहीच कळेना, पण त्या संपन्न देशातल्या संपन्न घरातल्या मुलीच्या मनाला विद्ध करणारे असे काही घडले असावे की, ‘काक्षी’ तारा तिला माणसांपेक्षा जवळचा वाटत होता!

लेख लिहीत असतानाच एका ज्येष्ठ मित्राचा फोन आला. ‘‘काय चाललंय!’’ त्यावर ते पंच्याऐंशी वर्षांचे गृहस्थ हसून उद्गारले ‘‘नागपूरचा कडक उन्हाळा एन्जॉय’ करतोय!’’ आम्ही हसलो. ‘‘उन्हाळा तर आहेच. कटकट करून थोडाच कमी होणार?’’ असे त्यांचे म्हणणे. ते खरेच होते, पण एखादी गोष्ट असहय़ झाली म्हणजे माणूस वैतागतोच. सगळे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून. मग एखाद्या देशाच्या, समूहाच्या समाधानाचे निष्कर्ष ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने काढता येतात का? ते त्यांनी नेमकी कोणती ‘शिते’ तपासली त्यावर अवलंबून असेल; परंतु असे निष्कर्ष काढले जातात खरे. त्यातले ‘खरे’पण कदाचित तात्कालिकही असू शकते. फिनिश लोकांनी जरूर समाधानी असावे. मग संपन्न, महासत्ता असलेल्या अमेरिकनांचे काय? ते मागे कसे? उत्तर शोधावे लागेल. तुकोबांनी मोजक्य शब्दांत सांगितलेय ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन।।’ –  ते मन ‘प्रसन्न’ करणे तेवढे जमले पाहिजे. तीच तर अनेकांची अडचण असते. अगदी आपलीसुद्धा. पाहणी, निकष, निकषांवर भाष्य वगैरे ठीक, पण आपण खरोखर किती सुखी-समाधानी  आहोत हे ज्याला त्याला अंतर्मनात ठाऊक असते. सुखी माणसाचा ‘अदृश्य’ सदरा असला तर मनातच असतो. तो असला तर ‘फिनिश्!’