लेख – ठसा – हरेंद्र जाधव

>> प्रशांत गौतम

‘‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू, पाहा पाहा पाहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा.’’ यासारखी कितीतरी वैविध्यपूर्ण, आशयघन मराठी गीते आपण अनेकदा ऐकली. अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, प्रल्हाद शिंदे, साधना सरगम यांच्या सुरेल आवाजातील गीते किती श्रवणीय होती. आपल्या प्रत्येकाला या लोकभाषेतील गाणी माहीत आहेत. पण गीतकार कोण होते? या श्रवणीय गाण्यांचे गीतकार होते हरेंद्र जाधव. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. जाधव यांच्या निधनाने लोककलेचा बाज असणारा गीतकार काळाच्या प्रवाहात हरपला आहे. जाधव हे केवळ गीतकारच नव्हते; तर त्यांच्या काव्यमय चिंतनाला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान होते. म्हणूनच त्यांनी लिहिलेली असंख्य गीतं अनेकांसाठी सृजनशील व प्रेरणा देणारी होती. हरेंद्र जाधव यांच्या निधनाने फुले, शाहू, आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीचीही मोठी हानी झाली आहे.

मूळचे नाशिकचे असलेले जाधव हे हाडाचे शिक्षक. 1933 साली नाशिक जिल्हय़ातील निफाड तालुक्यात मिग ओझर येथे त्यांचा जन्म झाला. हरेंद्रचे वडील मुंबईत असल्याने त्यांची पुढील वाटचाल ही मुंबईत सुरू झाली; पण नाशिक जन्मभूमीशी, परिसराशी, परिसरातील व्यक्तींचा त्यांचा स्नेह अतूट राहिला. विशेष म्हणजे जाधव यांच्यावर आंबेडकरी जलशांचा मोठा प्रभाव राहिला. या चळवळीच्या संस्कारातून त्यांच्या किती रचना लोकप्रिय झाल्या. व त्या तत्कालीन आघाडीच्या गायकांच्या स्वरातून जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या. त्यातील काही गाणी पुस्तकरूपाने मुंबईतील सेंटर प्रकाशनाने प्रसिद्ध केली. लोकगायक रंजन शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांच्यासह सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम यांच्या आवाजातील गाणीही लोकांची झाली. जाधव यांचा शिक्षकी पेशा असल्याने त्यांचे विद्यार्थीही नक्कीच समृद्ध आणि संपन्न झाले असणार. गीतातला हा माणूस खरा लोकशिक्षक आणि फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. लोकांनीच त्यांना आदराने ‘गुरुजी’ ही उपाधी दिली होती. विशेष म्हणजे त्यांचा आणि वामनदादा कर्डक यांचाही जुनाच अनुबंध होता. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं लिहिले खरं, पण गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी वाट बघण्यात एक दशकाचा कालखंड लोटला. या संपूर्ण प्रवासात त्यांनी उत्तमोत्तम दहा हजार गाणी लिहिली. हरेंद्र जाधव यांचा हा प्रदीर्घ  कालखंडाचा प्रवास 88 व्या वर्षी थांबला.

 

आपली प्रतिक्रिया द्या