
>>शिवाजी भाऊराव देशमाने
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात प्रमुख तीन ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचा दसरा मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. तिन्ही पारंपरिक ठिकाणी हिंदुत्व, विकास व शक्तिप्रदर्शनावर भर असल्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिसून आले. अयोध्येत राममंदिर निर्माण, केंद्रीय सत्ताधाऱ्यांना विकासाबाबतीत कानपिचक्या व शक्तिप्रदर्शन हे तीन प्रमुख मुद्दे यावेळी ठळकपणे झळकले. गेल्या चार-साडेचार वर्षांपासून शिवसेनेला शासनाच्या चुकीच्या धोरणांना परखडपणे लोकांसमोर मांडण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे देशाचे लक्ष असलेल्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील, याविषयी उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी नेहमीच्या आक्रमकपणे केली. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची शासनाची उदासीनता, राममंदिर उभारणीला लागलेला विलंब, केंद्रातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांत झालेला बदल, महिलांच्या अत्याचाराविरोधात केलेलं परखड वक्तव्य. प्रत्येक विषयावर मार्मिकपणे भाष्य करीत जनसमुदायाला उत्स्फूर्त करण्याचं काम त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपूर या संघाच्या मातृभूमीत दरवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त सरसंघचालकांनी लोकसभा निवडणूक व पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघाच्या स्वयंसेवकांना व पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचा वडिलकीचा सल्ला दिला. त्यानुसार पुढील लोकसभा निवडणुकीअगोदर राममंदिर उभारणीचा कायदा करण्याचा व तसा अध्यादेश काढून केंद्रातील प्रमुखांनी विकासासोबतच सर्वधर्मसमभाव ही सद्भावना जोपासण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन सरसंघचालकांनी केले. सरसंघचालकांनी देशात उद्भवलेल्या सद्यस्थितीवरही आपले मत मांडून विश्लेषण केले व संघ कार्यकर्त्यांत नवचैतन्य व देशाभिमान जागविण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केले होते. महाराष्ट्रभर हिंदुत्व, विकास व शक्तिप्रदर्शन या तिन्ही मुद्दय़ांवर दसरा मेळावा दणक्यात साजरा झाला असेच काहीसे म्हणावे लागेल.
































































