लेख  : दे दयानिधे..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी   

श्रीगणेशाचं प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात स्वागत झाले. घरोघरी आलेले गणराय आणि लोकमान्य टिळकांनी व्यापक सार्वजनिक रूप दिलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. गणपती ही बुद्धीची देवता. म्हणूनच त्याच्याकडे मागणं मागताना ‘‘दे दयानिधे बुद्धी चांगली’’ असं म्हटलं जातं. लहानपणी आम्हाला एक गणेश प्रार्थना शिकवली होती.  

‘प्रारंभी विनती करू

गणपती विद्यादयासागरा,

आज्ञानत्त्व हरोनी बुद्धी,

मती दे आराध्य मोरेश्वरा’ 

त्यात गणपती विद्येबरोबरच दयासागर असल्याचं सांगून अज्ञान दूर करणारी बुद्धी प्राप्त व्हावी अशी इच्छा वासुदेव कवीने प्रकट केली आहे. गणराय म्हणजे कलानिधीसुद्धा. अग्रपूजेचा मान लाभलेल्या या देवाची किती किती रूपं! जगातल्या अनेक देशांत गणेशाची उपासना होते. कंबोडिया, इंडोनेशिया आणि अगदी चीन, जपानमधील गणरायांची विविध रूपांची चित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. असा हा जगद्व्यापी बुद्धिदाता. गणपती आणि गुणपतीसुद्धा. ‘गणपती तू गुणपती तू, नमन चरणी ईश्वरा’ या काव्यात हेच सांगितलंय. प्राचीन काव्यापासून आधुनिक कवितांपर्यंत गणेशाचं वर्णन अनेक कवी-कवयित्रींनी केलं. शाहीर पठ्ठे बापूराव म्हणतात ‘आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना’. त्याचप्रमाणे एका कवनात ‘हे शिवशंकर गिरिजातनया, गणनायक प्रभुवरा। शुभकार्याच्या शुभप्रारंभी नमन तुला ईश्वरा’ असं वंदन केलेलं आहे. ‘गणराज रंगी नाचतो’ हे शांता शेळके यांचं गाणं प्रसिद्धच आहे, पण पारंपरिक नाटय़ातही ‘गणपती आला अन् नाचून गेला’ असा नृत्यगणपतीचा उल्लेख आढळतो. नृत्यगणेशाची शिल्पंही अनेक ठिकाणी आढळतात.

असा हा जनसामान्यांत उत्साह निर्माण करणारा उत्सवी गणराय. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतील देखावे, स्पर्धा, व्याख्यानं, संगीताच्या मैफली यातून अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्यात मोठा वाटा गणरायाची मूर्ती घडविणार्‍या मूर्तिकारांचा. अत्यंत सुबक प्रसन्न मूर्ती घडविण्यासाठी ही मंडळी अथक परिश्रम करतात. उत्सवाच्या काळात त्यांच्या श्रमाचं सार्थक होतं. या बुद्धीच्या दैवताकडे काही मागायचं तर सद्बुद्धीच मागावी. व्यक्ती आणि समष्टीच्या सुखाची कामना करावी. गैरसमज, विसंवादाची किल्मिषं नष्ट होऊन ‘सर्वे सुखिनः सन्तु’ अशी इच्छा धरावी. ईश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदात्त असावा. एकदा सद्बुद्धी मागितली की, बाकी लौकिकातील आपल्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आलीच. बुद्धी आणि विचार ही मानवी प्राण्याची वैशिष्टय़े. सृष्टीतल्या एकूण प्राणिजातांपैकी माणूस सर्वाधिक बुद्धीचं लेणं लाभलेला प्राणी. जगातल्या सर्व माणसांना हे वरदान लाभलेलं आहे. परिस्थितीनुसार त्या बुद्धीचा आविष्कार करण्याची संधी किंवा विचारपूर्वक प्रगतीची संधी प्रयत्नांती प्राप्त करणे हेसुद्धा बुद्धीवरच अवलंबून. प्रत्येकाला कसली ना कसली आवड, कला, ज्ञान उपजतच असतं. शिक्षणाने त्याला एक दिशा मिळते आणि प्रावीण्य कष्टपूर्वक मिळवावं लागतं. तिथे शॉर्टकट नसतो.

अलीकडेच आशियाई क्रीडा स्पर्धांत आपल्या अनेक क्रीडापटूंनी यशाची मोहर उमटवली. ‘यूपीएससी’सारख्या परीक्षांमध्ये दिव्यांगसुद्धा किती यश मिळवू शकतात याचं दर्शन घडलं आणि यात महाराष्ट्र मागे नाही. ज्या बुद्धिकौशल्याच्या बळावर माणूस कर्तृत्ववान बनतो त्या बुद्धीबाबत आधुनिक विज्ञान काय म्हणतं? विज्ञानाची आधुनिकतेपर्यंत सतत होत जाणारी प्रगती हादेखील माणसाच्या विचारशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचाच आविष्कार. गणेशाला अथर्वशीर्षामध्ये ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ असं म्हटलंय. विज्ञान म्हणजे ज्ञानाचे विशेष रूप. माणसाच्या इवल्याशा मेंदूमध्ये असलेल्या अब्जावधी न्यूरॉन्सचं कार्य आजही पूर्णपणे समजलेलं नाही. आपल्या मेंदूचा ‘शोध’ आपण आपल्याच मेंदूने घेत आहोत. नित्यनवं संशोधन करून भोवतीच्या परिस्थितीत लक्षणीय बदल करण्याची शक्ती प्राप्त करणं फक्त माणसालाच जमतं. जगभरची माणसं, विविध विस्मयकारी शोध लावणारे विचार कसा नि कुठून करतात? सागरतळापासून अंतराळापर्यंतचा शोध घेण्याचा ध्यास कसा निर्माण होतो? संगीत, कला, काव्य, साहित्य यांची निर्मिती मेंदूतून कशी होते? हे काय गणिती कोडं आहे?

काही अमेरिकन-युरोपीय संशोधकांनी सुमारे अडीच लाख माणसांच्या डीएनएचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की, विशिष्ट 538 जीन, बुद्धीचं देणं माणसाला देतात आणि ‘जिनोम’मधल्या सुमारे 180 ठिकाणी माणसाची विचारशक्ती दडलेली असते. यातला क्लिष्टपणा जाऊ द्या. मुळात माणूस हा बुद्धिमान आणि विचारशील प्राणी आहे हे सत्य त्यातून अधोरेखित होते. आता प्रश्न येतो तो माणूस विचार कसा करतो? इथेच खरी गोम आहे. विचार सुष्ट-दुष्ट, रचनात्मक-विध्वंसक कसेही असू शकतात. मानवी इतिहासाने मानवी बुद्धीचे असंख्य सृजनशील आणि विध्वंसक आविष्कार अनुभवले आहेत. अंतिमतः आत्मनाशाकडे जाणारा विचार मानवी समूहाला परवडणारा नाही. माणसाला स्वतःबरोबरच इतरही सजीवसृष्टीचं जतन करायचं आहे. त्यासाठी सकारात्मक विचार हवेत. रचनात्मक कार्य हवं. तसं अनेक ठिकाणी होताना दिसतं. त्याचं अनुकरण हवं. म्हणूनच म्हणायचं,‘दे दयानिधे बुद्धी चांगली’. यातलं ‘चांगली’ हे अत्यंत  महत्त्वाचं!

[email protected]