
>> दिलीप जोशी
माणसं बोलतात कोणी कमी, कोणी जास्त. आपल्या भावना व्यक्त करण्याचं सोपं साधन म्हणजे आपली मातृभाषा. जन्मजात लाभलेली, बालपणापासून सतत कानावर पडणारी ही भाषा आपण नकळत आत्मसात करतो. भाषेचं व्याकरण वगैरे खूप नंतर समजतं. भाषेच्या अभ्यासासाठी ते समजणं गरजेचं, पण ते ठाऊक नसलं तरी माणसं बोलत असतातच. एखादा निरक्षर असला तरी तो बोलून व्यक्त होत असतो. अगदी न बोलता येणार्यांचीही सांकेतिक भाषा असतेच.
सजीवांची संदेशवहनाची भावभावना इतरांपर्यंत पोहोचवण्याची जी नैसर्गिक उैर्मी असते त्यात भाषेचा वाटा खूपच मोठा. पशू-पक्षीही ध्वनीच्या माध्यमातून परस्परांना ‘साद’ घालतात. प्रसंगी सावध करतात. ती त्यांची भाषाच असते. पक्ष्यांमध्येही काही अबोल तर काही सतत ‘ट्विट’ करणारे वटवटे पक्षी असतात. माणसांच्या जगातही अबोल माणसं असतात तशी धो धो बोलणारीही असतात.
बोलण्याच्या या पद्धती व्यक्तिसापेक्ष असतात. कैसे बोल बोलावे ते ज्याच्या त्याच्या भाषज्ञानावर, भाषेचा उपयोग करण्याच्या शैलीवर आणि मुख्यत्वे स्वभावावर अवलंबून असतं. काहीजण भरपूर ज्ञान असूनही अगदी मितभाषी असतात. विचारलेल्या प्रश्नाला मोजक्या शब्दांत नेमकं उत्तर देतात. काहींना आपल्या ज्ञानाचा अंदाज नसला तरी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडण्याचा मोह काही टाळता येत नाही. विद्वानांच्या चर्चेत मुद्देसूद चर्चा होते तर वितंडवाद घालताना ‘शब्द बापुडे केवळ वारा’ अशा पद्धतीची बडबड घडते.
तरीसुद्धा ‘बोलण्या’च्या कौशल्यावर माणसांच्या जगात भर दिला जातो, कारण बोलण्याच्या विविध पद्धतींनी माणसांचं जीवन संवादमय, समृद्ध आणि समाधानी व्हायला मदत होते. कुशल शिक्षक अशा ‘शब्दात’ शिकवतात की, ‘अमक्या सरांचा किंवा मॅडमचा तास चुकवावासा वाटत नाही’ असं विद्यार्थी म्हणतात. अभिनयासह संवादफेकीत तरबेज असलेल्या अभिनेत्यांची वाहवा होते. उत्कृष्ट वक्ते राजकीय फड गाजवून जनमानसावर गारुड करतात. रसाळ प्रवचनकार नजरेसमोर एखादा प्रसंग सहीसही उभा करतात.
बोलण्याला लय प्राप्त झाली की, उमटणार्या गाण्याची मोहिनी तर प्रत्येकाला सुखावते. हे बोल-पुराण सुचण्याचं कारण म्हणजे एक बातमी म्हणते की, आपण जे किंवा ‘जसं’ बोलतो ते आपल्या पूर्वजांच्या जबडय़ाची ठेवणं जशी विकसित झाली त्यावर आधारित आहे. आपल्या म्हणजे एकूणच मानवजातीच्या उक्रांतीच्या टप्प्यातून आपले सर्वांचेच प्राचीन पूर्वज गेले आहेत. टोळीने राहताना ठरावीक ध्वनीद्वारे प्राण्यांप्रमाणेच संपर्क साधताना, शिकार करून उदरनिर्वाह करताना आपल्या पूर्वजांच्या जबडय़ाची रचना जशी होती त्यात आणि माणूस शेती करून स्थिर जीवन स्वीकारून स्वस्थ जीवन जगायला लागला त्यामध्ये फरक पडत गेला. काही ओष्टय़ (प-फ) आणि तालक (क-ख) असे ध्वनी नंतर विकसित झाले किंवा वापरात येऊ लागले असं एक मत आहे, मात्र यावर ‘एकमत’ होईलच असे नाही.
एकूणच जैविक उक्रांती होत असताना माणूस नावाच्या प्राण्यातही हजारो वर्षांमध्ये परिस्थितीजन्य बदल होणार हे सहाजिक आहे. तोंडातील ऍकॉस्टिक्स किंवा ध्वनिशास्त्र्ाावर आपलं बोलणं ठरत असतं. स्वरयंत्र, जबडा यावर आवाजाची पट्टी, स्पष्टता ठरते. काहींचा आवाज किनरा असतो तर काहींचा भारदस्त. एखाद्या अभिनेत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाची तारीफ होते ती त्यासाठीच.
‘व्हॉइस कल्चर’च्या माध्यमातून बोलण्याचाही ‘रियाज’ करून कसं बोलावं ते शिकता येतं. काही अक्षरं, शब्द यांचे उच्चार (डिक्शन) सुधारता येतं. अधिक परिणामकारी करता येतं. वाक्यातील कोणत्या शब्दावर कधी वजन द्यायचं म्हणजे कोणता अर्थ समोरच्यापर्यंत पोचेल याचंसुद्धा तंत्र असतं. बहुतेकवेळा रोजच्या बोलण्यातून ते आपल्याला लहानपणापासूनच अवगत होते. पण ते आपल्या आसपासच्या मंडळींवर अवलंबून असतं. तुटक बोलणं, हेल काढत बोलणं किंवा भरभर बोलणं या गोष्टी मुलं नकळत त्यांच्या जवळच्या मंडळींकडून शिकतात. बोलण्याची ठरावीक लकब आत्मसात करतात. त्यातही प्रत्येकाच्या स्वरयंत्राची आणि जबडय़ाची नैसर्गिक रचना काम करतेच. त्यावर हुकूमत आली की माणसं अनेक भाषात अस्खलित बोलू शकतात.
उत्कृष्ट वक्ता होऊन आपलं म्हणणं इतरांपर्यंत प्रभावीपणे पोचवायचं असेल तर ते प्रयत्नांनी शक्य असतं. प्रत्येकाचाच आवाज भारदस्त किंवा भारून टाकणारा होईल असं नाही, पण बोलण्याचं तंत्र नक्की सुधारता येईल. इतकं सगळं झालं तरी हे वाक्तंत्र ‘काय बोलणार?’ ते मेंदूतील विचारांवर ठरत असतं. विचार जेवढे स्पष्ट, बोलण्याच्या विषयाचा अभ्यास जेवढा सखोल तेवढी वाचिक (बोलून घडणारी) अभिव्यक्ती अधिक प्रत्ययकारी. शेवटी इतरांना सुखावणारे, धीर देणारे बोल बोलता आले तर बरं. अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि भाता’ला फुटणार्या उकळ्या ही तर नित्याचीच बाब.
































































