
>> स्मिता धुरी
कपडे वारंवार धुतल्याने पर्यावरणाची अतोनात हानी होत आहे, असा ’सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीज’च्या रसायन तज्ञांचा निष्कर्ष नुकताच वाचनात आला. केवळ एकदा धुलाई यंत्र वापरल्यावर अंदाजे 7 लाखांहून अधिक ’मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिक फायबर’ पाण्यावाटे नदीनाल्यातून महासागरांत जाते. याचा पाण्यातील जलचरांवर अनिष्ट परिणाम होतो. या प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या महासागरातील प्रदूषणामध्ये कपडे धुण्याचा वाटा तब्बल 35 टक्के आहे. पाण्यातील प्रदूषणाची भयावहता त्यामुळे स्पष्ट होते. नियमित कपडे धुण्याने होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कपडे आवश्यक तेवढेच घ्यावेत, ते कमीत कमी धुवावेत आणि एकदा घातलेले कपडे परत परत वापरावेत असा सल्ला रसायनतज्ञांनी दिला आहे.
कपडे वारंवार धुण्याबरोबरच कपडय़ांचे पालटते प्रकार यास कारणीभूत आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आज सुती, रेशमी कपडय़ांबरोबरच रसायनांच्या सहाय्याने बनवलेले ’सिंथेटिक’ कपडे वापरले जातात. यात पॉलिस्टर, नायलॉन, ऑक्रिलिक इत्यादी कपडय़ांचा जास्त प्रमाणात वापरही केला जातो. त्यांच्या धुण्यानेच ’मायक्रो प्लास्टिक’ पाण्यात मिसळते.
आपल्या ’हिंदू धर्मा’त इतर सर्व गोष्टींबरोबरच ’जिवाला घडवताना’ त्याच्यावर कोणती वस्त्रे संस्कार करू शकतील याचेही धर्मशिक्षण दिलेले आढळते. शरीराला स्पर्श करणारे वस्त्र शुद्ध व सात्त्विक तसेच सात्त्विक आकार-रूपासह असेल, तर त्याने आपल्याला लाभ होतात. जर आपण सुती किंवा रेशमी वस्त्र घातले असेल, तर हे कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले असल्याने यांचा स्पर्श मऊ असतो. त्वचेच्या आरोग्याला पोषक असतो. ही वस्त्रे आपल्या सभोवतालच्या वातावरणातून, ईश्वराच्या चैतन्य लहरी सर्वात जास्त प्रमाणात ग्रहण करून आपल्या देहाला पुरवतात. या धाग्यात हे चैतन्य जास्त काळ धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आपण जास्त काळ ’शुद्ध आणि पवित्र’ राहतो. आपले मन प्रसन्न राहते. आपल्याकडून प्रत्येक कृती ईश्वराला आवडेल अशी होते. आपल्याला शालीनता प्राप्त होते. त्याने आपण ईश्वराच्या अधिक जवळ जातो. त्यातून घाम लगेच शोषला गेल्याने त्वचा चिकट होत नाही. ती निरोगी व तुकतुकीत राहते. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर वात प्रपृती असणाऱ्याला संरक्षणाच्या दृष्टीने रेशमी कपडे, पित्त प्रकृती असलेल्याला सुती कपडे आणि कफ प्रकृती असलेला लोकरीचे कपडे घालण्याने जास्त फायदा होतो. हे कितीही वेळा धुतले तरी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असल्याने याचे धागे निघत नाहीत आणि जलचरांना मोठय़ा प्रमाणात धोका पोहोचत नाही.
न धुतलेले कपडे घातल्याने मोठय़ा प्रमाणात हवेतील नकारात्मक लहरी खेचल्या जातात, एकत्रित होतात. त्यांच्या स्पर्शाने आपल्या शरीराला हानी तर होतेच, पण मनही अनेक असात्त्विक विचाराने ग्रासून जाते. नायलॉन, टेरेलिंन, रेऑन,पॉलिस्टर या कृत्रिम धाग्यापासून बनवलेल्या कपडय़ांमध्ये रासायनिक घटक अधिक असल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होण्याचे प्रमाण कमी असते. धाग्यात वाईट लहरी आकर्षून घेण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चिडचिड होते. देहाभोवतीचे वातावरण अशुद्ध होते. हे कपडे धुताना ’मायक्रोस्कोपिक प्लास्टिक फायबर’ महासागरांत मिसळून जलचरांना हानी पोहोचते.
म्हणूनच पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर आपण पारंपरिक सुती व रेशमी वस्त्रे वापरणेच योग्य ठरते.



























































