
>> सीमा खंडागळे
हाँगकाँगच्या कुंग फू चित्रपटसृष्टीतील बुस ली या दिग्गज कलाकाराचे आयुष्य केवळ 32 वर्षांचे होते. मात्र या अल्पावधीत त्यांनी जगभरात इतर कोणत्याही कलाकारापेक्षा अधिक लोकप्रियता मिळवली. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, ब्रूस लीला हॉलीवूडमध्ये प्रमुख नायकाची भूमिका करण्याची पहिली संधी तत्कालीन भारत सरकारमुळेच मिळाली होती.
जगात एक काळ गाजविलेले दिग्गज अभिनेते ब्रूस ली आयुष्य केवळ 32 वर्षांचे होते. मात्र या अल्पावधीत त्यांनी जगभरात इतर कोणत्याही कलाकारापेक्षा अधिक लोकप्रियता मिळवली. उद्या त्यांची पुण्यतिथी. आपल्या देशातही 80 आणि 90 च्या दशकात त्यांच्या चित्रपटांच्या व्हिडीओ कॅसेट्स आणि केबल टीव्हीवरील प्रसारणामुळे प्रेक्षकांना अक्षरशः चित्रपटांचे वेड लागले होते. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, ब्रूस लीला हॉलीवूडमध्ये प्रमुख नायकाची भूमिका करण्याची पहिली संधी तत्कालीन भारत सरकारमुळेच मिळाली होती.
1970च्या दशकात भारतात कार्यरत असलेल्या परदेशी स्टुडिओंसमोर एक अडथळा होता. त्यांनी भारतात कमावलेली रक्कम रुपयांमध्ये गोळा होत असे, पण ती रक्कम देशाबाहेर नेण्यास सरकारकडून परवानगी नव्हती. मात्र भारत सरकारने या रकमेची पुनर्गुंतवणूक भारतातच चित्रपट निर्मितीद्वारे करण्याची मुभा दिली होती. अशा परिस्थितीत वॉर्नर ब्रदर्ससारख्या प्रख्यात स्टुडिओचे कोटय़वधी रुपये भारतात अडकून पडले होते.
यावर उपाय म्हणूनच वॉर्नर ब्रदर्सने पटकथालेखक स्टार्ंलग सिलिफंट, ब्रूस ली आणि अभिनेता जेम्स कोबर्न यांच्या सहलेखनातून साकारत असलेल्या ‘द सायलेंट फ्लूट’ या मार्शल आर्टस्वर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी सहमती दर्शवली. मात्र एका अटीवर की, संपूर्ण चित्रपट निर्मिती भारतातच व्हावी. ब्रूस लीसाठी, जेव्हा हॉलीवूडमधील चिनी वंशवाचक अडथळ्यांमुळे मोठय़ा भूमिका मिळत नव्हत्या, तेव्हा हा चित्रपट केवळ एक संधी नव्हती, तर तो त्याच्या संपूर्ण करीअरसाठी आशेचा एक प्रकाशकिरण होता. कारण त्या वेळेपर्यंत त्याने अमेरिकेत केवळ टीव्हीवरील दुय्यम भूमिका केल्या होत्या आणि हाँगकाँगच्या चित्रपटसृष्टीत लहान वयाच्या मुलाच्या भूमिका केल्या होत्या.
‘द सायलेंट फ्लूट’ हा चित्रपट केवळ मार्शल आर्टस्वर आधारित नव्हता. तो एका योद्धय़ाच्या अंतर्मनातील संघर्ष, आत्मभान आणि आध्यात्मिक प्रवास यांची रूपकात्मक मांडणी करणारा होता. ब्रूस लीच्या दृष्टिकोनातून या चित्रपटात ‘पूर्व आणि पश्चिम’ या दोन भिन्न संस्कृतींमध्ये वैचारिक सेतू उभारण्याचा प्रयत्न होता.
फेब्रुवारी 1971 मध्ये ब्रूस ली, स्टार्ंलग सिलिफंट आणि जेम्स कोबर्न भारतात आले. प्री-प्रॉडक्शन आणि शूटिंगसाठी योग्य ठिकाणं शोधण्यासाठी त्यांनी मुंबईहून उत्तर भारतात प्रवास सुरू केला. मात्र प्रत्यक्षात भारतातील सामाजिक वास्तवाने त्यांना मानसिकदृष्टय़ा हादरवून टाकले.
राजस्थानच्या वाळवंटातील प्रवासादरम्यान एका छोटय़ा ढाब्यावर ते थांबले होते. ब्रूस लीने मांसाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती, पण त्याला ते जेवण आवडलं नाही. त्याने उरलेले अन्न एका शांत कुत्र्याला देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे अन्न कुत्रा पोहोचण्याआधीच ढाब्याचे कर्मचारी धावत आले व कुत्र्यासमोरील ते मांसाहारी अन्न उचलून परत ढाब्यात नेले. तसेच ढाब्यातील कर्मचारी हे ब्रूस लीवर रागानेच ओरडले, “आमच्याकडे मुलांना खायला अन्न नाही आणि तुम्ही कुत्र्याला खाऊ घालताय ?’’ हा प्रसंग ब्रूस लीसाठी एक जबर मानसिक धक्का ठरला. त्याने गरिबी पाहिली होती, पण इतकं कठोर वास्तव कधीच अनुभवलं नव्हतं. शिवाय त्या काळातील उत्तर भारतातील पायाभूत सुविधा पाहून हॉलीवूडचे हे तीन पाहुणे हिरमुसले होते.
त्यानंतर तिघे मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे गेले. तेथील चित्रपटसृष्टीतील काही स्टंटमनना ‘द सायलेंट फ्लूट’ चित्रपटासाठी छोटय़ा मोठय़ा कामावर घेता येईल का? हे पाहण्यासाठी त्यांनी ऑडिशन घेतली. मात्र जेव्हा त्या स्टंटमननी सादरीकरण केलं तेव्हा ब्रूस ली फार निराश झाला. तरीही त्याने त्यांना मार्शल आर्टस्मधील मूलभूत तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याच्या चपळतेपुढे थक्क झालेले ते कलाकार ब्रूस लीसमोर नतमस्तक झाले.
उत्तर भारतातील गरिबी आणि सांस्कृतिक धक्क्यांनंतर तसेच चेन्नईमधील परिस्थिती पाहिल्यानंतर ते गोव्याला पोहोचले. तेथे अमेरिकन व युरोपियन हिप्पींसाठी ब्रूस ली आधीच ‘ग्रीन हॉर्नेट’ मालिकेमुळे प्रसिद्ध होता. गोव्यात हिप्पी संस्कृतीचे स्वागत पाहून ब्रूस ली अधिक आशावादी झाला. तो ‘द सायलेंट फ्लूट’बाबत खूप उत्साही होता.
पण ज्यांच्यावर संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी होती ते पटकथा लेखक स्टार्ंलग सिलिफंट – भारतातील परिस्थिती पाहून नाखूश झाले. त्यांना वाटलं, अशा अटींमध्ये इतका प्रगत चित्रपट साकारता येणार नाही. त्यामुळे त्यांनी वॉर्नर ब्रदर्सना यासंदर्भात सूचित केलं आणि थोडय़ाच वेळात वॉर्नर ब्रदर्सने प्रकल्पातून माघार घेतली. परिणामी ब्रूस लीचे हॉलीवूड नायक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, पण या धक्क्यामुळे ब्रूस ली खचला नाही. तो हाँगकाँगला परतला आणि तिथूनच त्याने आपली मार्शल आर्टस् चित्रपट कारकीर्द सुरू केली. लवकरच तो संपूर्ण आशियात आणि जगात सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.
दुर्दैव असे की, केवळ 32व्या वर्षी 20 जुलै 1973 रोजी ब्रूस लीचा हाँगकाँगमध्ये उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. एक असा कलाकार, ज्याची हॉलीवूडमधील झेप भारतातच सुरू होऊ शकली असती, पण त्याचे स्वप्न काळाच्या कसोटीत अडकलं.