मेलबर्नवर ऐतिहासिक विजय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

यती बऱयाचदा न्याय करते. अजिंक्य रहाणेनं मेलबर्न कसोटीच्या विजयाचा पाया घातला. कळसंही त्याच्या शुभ हाताने चढला. आणि हे सर्व झाल्यावर समाप्तीची सर्व कर्मकांड आटपून तो शांतपणे चालत पॅव्हेलियनमध्ये गेला. तो क्षण असा होता की, प्रदीपकुमार किंवा भारत भूषण यांच्या चेहऱयावरसुद्धा ऐतिहासिक विजयाचे भाव उमटले असते. रहाणेचा चेहरा ऑफिसचं काम आटपून संध्याकाळी घरी परतणाऱया कर्तव्यदक्ष माणसासारखा होता. आजचं काम झालं, आता उद्याची तयारी.

हा विजयच खूप ऐतिहासिक होता. कारण 36 ऑलडाऊनच्या पार्श्वभूमीवर राखेतून हिंदुस्थानी संघ फिनिक्स पक्ष्यासारखा वर आला होता. फिनिक्स पक्षी हा काल्पनिक आहे. हे यश काल्पनिक नव्हतं. तरीसुद्धा रहाणेची इतकी शांत संयत प्रतिक्रिया मला आश्चर्यचकित करून गेली. मी जर रहाणे असतो तर माझ्या भावना रोखू शकलो नसतो.

प्रत्येकाची रिअॅक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. रहाणे हा बोर्ग, वाडेकर, द्रविड किंवा धोनीच्या परंपरेतला खेळाडू वाटतो. किंबहुना रहाणेकडे पाहताना मला सातत्याने अजित वाडेकर आठवत होता. वाडेकर आणि रहाणेच्या शारीरिक व्यक्तिमत्त्वात काहीच साम्य नाही. वाडेकर उंच, हॅण्डसम तर रहाणे हा मध्यम उंचीचा, सडपातळ. पण मानसिक गुणाच्या बाबतीत दोघे सारख्याच स्तरावर आहेत असं मला वाटतं. 1971च्या ऐतिहासिक विजयाच्या वेळी वाडेकर असाच पॅव्हेलियनमध्ये गाढ झोपून गेला होता. जणू काही नियतीनं त्याच्या कानात सांगितलं होतं की, काळजी करू नकोस. तू जिंकणार आहेस. मेलबर्न कसोटीत रहाणेला ती संधी मिळाली नाही. दोन बाद 19 असताना त्याला फलंदाजीला यावं लागलं. लागोपाठ दोन विकेटस् गेल्यावर ऑलडाऊन 36चं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहिलं. मनात खोल कुठेतरी भीती जाणवली. पण रहाणे असा चालत आला की आपण जिंकणार आहोत, याची त्याला पूर्ण खात्री होती. जवळपास अपेक्षित असल्याप्रमाणे त्याने उसळत्या चेंडूवर एक सणसणीत हूक मारला. जणू विजयाचा पाचजन्य शंख फुंकला. त्याच्यासमोर शुभमन गिल असा खेळत होता की, तो त्याचा 25वा कसोटी सामना खेळतोय आणि टार्गेट हे घराचे दोन जिने चढण्याइतकी सोपी गोष्ट आहे. म्हटलं तर ती तशी होती. पण 36 ऑलडाऊननंतर कुठलंही टार्गेट हे थंड बियरही फुंकून प्यावं असं होतं.

हिंदुस्थानी संघ ही कसोटी जिंकलाय याला विविध कारणं आहेत. त्या कारणांकडे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय… 36 धावांच्या ऑलडाऊननंतर मी जो लेख लिहिला होता तो काहीना मिळमिळीत वाटला होता. त्यांना कोल्हापुरी लाल रश्याची माझ्याकडून अपेक्षा होती आणि मी गोड वरण ताटात टाकलंय असं वाटलं. हा हिंदुस्थानी संघ 4-0ने हरणार असं भाकीतसुद्धा अनेकांनी वर्तवलं होतं. माझा तीन गोष्टींवर विश्वास होता. 1) रहाणेच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा नव्याने उभे राहू शकतो.

2) ऑस्ट्रेलियाची कमपुवत फलंदाजी आणि
3) हिंदुस्थानची दर्जेदार गोलंदाजी.

विराट कोहली आणि रहाणे यांच्या नेतृत्वामध्ये एक मूलभूत फरक आहे. विराट कोहली हा मला चांगला कर्णधार कधीच वाटला नाही. हुशार विद्यार्थी वर्गाचा मॉनिटर होतो तसा तो सर्वोत्तम फलंदाज म्हणून देशाचा कर्णधार झाला. संघाला बरोबर घेऊन जायची जी कला असते, जी 1971मध्ये अजित वाडेकरनी दाखवली तीच या कसोटीत रहाणेने दाखवली. त्याने गोलंदाजांना आत्मविश्वास दिला. ते सेटल होऊ शकतील असे स्पेल दिले. विकेट काढण्यासाठी आणि भागीदाऱया तोडण्यासाठी त्याने बुमराहचा धक्का देणारा गोलंदाज म्हणून जास्त उपयोग केला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची गोलंदाजीसुद्धा खुलली. त्याला हवी ती क्षेत्ररचना मिळाली. गोलंदाजीतले बदल बिनचूक होते. एकंदरीतच नेतृत्वाचा स्तर उंचावला होता. त्याने आणि टीम मॅनेजमेण्टने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल होतं हिंदुस्थानी संघाची योग्य निवड. ही निवड सोपी नव्हती. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे चारही प्रमुख खेळाडू उपलब्ध नव्हते. दोन नव्या खेळाडूंना संधी द्यायला लागणार होती. एकाच वेळेला दोन खेळाडूंना संधी देणं हे तेवढं सोपं नसतं. पण रहाणेने एक मास्टरस्ट्रोक खेळला. फार कमी कर्णधार जगात ही जोखीम घेतात. तो चक्क पाच गोलंदाज घेऊन खेळला. त्यासाठी त्याला के. एल. राहुलला बाजूला ठेवावं लागलं आणि जाडेजाला संघात घ्यायला लागलं. जाडेजाच्या कसोटी फलंदाजीवर त्याला विश्वास टाकायला लागला. निव्वळ फलंदाजीचा विचार केला तर राहुल हा जाडेजापेक्षा जास्त दर्जेदार फलंदाज असेलही. पण त्याने जाडेजाच्या अनुभवावर आणि फलंदाज म्हणून बदललेल्या रूपावर जास्त विश्वास टाकला होता. तो जाडेजाने सार्थ ठरवला. फलंदाज म्हणून पाच वर्षांपूर्वीचा जाडेजा आणि आजचा जाडेजा याच्यात बराच फरक आहे. ज्याला शिकायचं असतं तो अनुभवातून शिकत असतो. तुम्ही नुकताच सिनेमात आलेला अक्षयकुमार आठवा आणि आताचा अक्षयकुमार आठवा. तुम्हाला त्याच्या अभिनयात झालेला प्रचंड बदल जाणवेलं. जाडेजाच्या फलंदाजीचंसुद्धा तसंच झालं. साहाऐवजी यष्टिरक्षक रिषभ पंतला घेण्याचा निर्णयसुद्धा यशस्वी झाला. साहा हा रिषभ पंतपेक्षा नक्कीच उजवा यष्टिरक्षक आहे. साहा हा वाईट फलंदाजसुद्धा नाहीए. पण रिषभ पंत आल्यामुळे थोडी आक्रमकता हिंदुस्थानी फलंदाजीत आली. या हिंदुस्थानी संघाला थोडय़ा आक्रमकतेची गरज होती. कारण पहिल्या कसोटीत आपली फलंदाजी खूपच कोशात गेली होती. कोशातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिकदृष्टय़ा आक्रमक फलंदाज लागतात. दोन डावखुरे फलंदाज आल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांची दिशा वारंवार बदलायला लागली. शुभमन गिलच्या फलंदाजीने आनंद दिला. त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण मी पुढे कधीतरी करीन. पण नव्या पिढीतला फलंदाज असल्यामुळे तो अधिक आक्रमक आहे. पण आक्रमकपणे खेळतानासुद्धा त्याचं तंत्रसुद्धा तसं भक्कम आहे. अर्थात विविध प्रकारच्या खेळपट्टय़ांवर तो कसा खेळतो यावर त्याचं भवितव्य अवलंबून राहील. पहिल्या डावात तो चांगला खेळलाच. पण दुसऱया डावातसुद्धा छोटा का होईना पाठलाग करताना आणि दोन बळी पटकन गेल्यानंतर त्याच्या फलंदाजीचा प्रवाह पुठेही कमी झाला नाही.

हिंदुस्थानी संघाने 300 धावा केल्या तर संघ या ऑस्ट्रेलियन संघाला हरवू शकतो कारण इतकी कमकुवत ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी पूर्वी कधी पाहिलेली नाही. एक स्मिथ सोडला तर मोठी कसोटी खेळी खेळायची क्षमता या क्षणी तरी कोणामध्ये दिसलेली नाही. विशेषतः हिंदुस्थानी संघाच्या आक्रमणाच्याविरोधात. हिंदुस्थानी संघाच्या आक्रमणामध्ये वैविध्य आहे. सिराजनेसुद्धा ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर उत्तम जुळवून घेतलं,क्षेत्ररचनेप्रमाणे गोलंदाजी टाकली. त्यामुळे दुसऱया डावात उमेश यादव जायबंदी होऊनसुद्धा हिंदुस्थानी संघाला ती उणीव फारशी वाटली नाही.

स्मिथ या मालिकेत वारंवार लवकर बाद झाला. तो आता प्रचंड दबावाखाली दिसतोय. तो नेहमी ऑफस्टम्पच्या बाहेर सरपून खेळतो. आणि त्याचा लेग स्टम्प उघडा राहतो. त्यामुळे पूर्वी गोलंदाज त्याचा लेग स्टम्प उडवण्याचा प्रयत्न करत. पण ते कधीही यशस्वी झाले नव्हते. पण मेलबर्न कसोटीत त्याच्या लेग स्टम्पवरची बेल बुमराने अलगद उडवली. इतके झेल टाकणारा ऑस्ट्रेलियन संघ मी कधीही पाहिलेला नाही. किंबहुना हिंदुस्थानी विजयामध्ये सोडलेल्या झेलांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांच्या ताकदवान गोलंदाजीची कवचकुंडलंच काढून घेतली गेलीय. एकदा सावरकरांनी असं म्हटलं होतं महाराष्ट्राने हिंदुस्थानचं खड्गहस्त व्हायला हवं. क्रिकेटच्या बाबतीत महाराष्ट्र अनेक वेळेला हिंदुस्थानचं खड्गहस्त ठरलाय. वाडेकर, गावसकर, वेंगसरकर, तेंडुलकर ही त्या खडगहस्ताची काही नावं. त्यात आज रहाणेच्या नावाची भर पडली.

36 ऑलडाऊनकडे आता जखम म्हणून पाहायचं नाही. ती आठवणसुद्धा विसरायची नाही. ही ठिणगी म्हणून ती आठवण राहिली पाहिजे. हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्यावर हिरोशिमा बेचिराख झालं होतं. आज वैभवशाली हिरोशिमा पाहायला पुन्हा मिळतं. पण म्हणून अणुबॉम्ब विसरलेला नाही. तशीच ही ठिणगी विसरली जाता कामा नये.

धारावी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थाद्वारे संचालित छत्रपती शिवाजी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने यांच्या प्रेरणेने माध्यमिक विभागातील गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांना अॅण्ड्रॉईड मोबाईल फोन व टँबचे वितरण इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वाती होलमुखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, कोषाध्यक्ष प्रमोद माने व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.