
>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर
मागील काही वर्षांत त्या त्या दिवसाचे महत्त्व आपण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत आलो आहोत. उदा. महिला दिन, व्हॅलेन्टाइन डे, पर्यावरण दिन इ. अनेक प्रकारचे दिवस आपण साजरे करतो, परंतु मागील काही वर्षांत उत्पादन क्षेत्रे विकसित न झाल्यामुळे पूर्वी जो 4 मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन नाही, तर सप्ताह पाळला जात असे त्यानिमित्ताने बहुतांशी कारखान्यांत विविध उपक्रम, स्पर्धा, इतकेच नव्हे तर राज्यातून Inter- Industrial Competition च्या माध्यमातून सुरक्षा, त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, त्यासंबंधीची माहिती, योग्य ते प्रशिक्षण घेतले जात असे, जेणेकरून काम करण्याच्या जागी अपघात कसे टाळता येतील.
सुरक्षेची केवळ औद्योगिक क्षेत्रात नव्हे तर ऑफिस, आपल्या दैनंदिन कामकाजातसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामाचे स्वरूप नक्कीच बदललेले आहे. तरीसुद्धा अपघात, आरोग्य, सुरक्षा याबाबत नक्कीच सावध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे, परंतु अलीकडे या औद्योगिक सुरक्षा दिनाबद्दल म्हणावी तितकी व्यापकता दिसत नाही. याचे मूळ कारण म्हणजे उत्पादन क्षेत्र कालबाह्य होऊ लागले आणि सेवा क्षेत्र विस्तारू लागले आहे. त्याच बरोबरीने तंत्रज्ञानातसुद्धा आमूलाग्र बदल होत गेल्यामुळे शारीरिक श्रम कमी होऊ लागले आहेत. माणसाची जागा आता यंत्रमानवाने घेतल्यामुळे कारखान्यातील अपघातांचे प्रमाण कमी होऊ लागले हे जरी आकडेवारी वरून स्पष्ट होत असले तरी कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, शारीरिक नाही, पण मानसिक ताण व तणाव यामुळे आरोग्यावर नक्कीच परिणाम होत आहे. संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शरीरावर अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहेत आणि हे सर्व्हेवरून स्पष्ट झाले आहे.
दैनंदिन जीवनशैली आणि होत असलेल्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून औद्योगिक सुरक्षा ही केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता जी सेवा क्षेत्रे, उदा. IT, BPO, KPO इ. सारख्या क्षेत्रात कायम बसून टार्गेट अचिव करण्याकरिता मानसिक ताण, कामाच्या वेळा, आहारातील अनियमितता आणि डोळ्यांवरील ताण यांचा विचार करता सुरक्षित आरोग्य यादृष्टीने विचार करून आद्यागिक सुरक्षा दिवसाचे औचित्य साधून कामाच्या जागी सुरक्षेसंबंधीची माहिती, विविध स्पर्धा, योग्य ते प्रशिक्षण यांचे प्रत्येक कॉर्पोरेट क्षेत्रात जर आयोजन केले गेले पाहिजे. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि प्रत्येकाची उत्पादन क्षमता नक्कीच वाढेल. सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसावा. योग्य ती माहिती, उपकरणांचे ज्ञान, त्याचे व्यवस्थापन व त्यासाठी लागणारे प्रशिक्षण घेऊन जर आपण काम केले तर नक्कीच अपघात होणार नाही, पण त्यासाठी खरी गरज आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची. मग क्षेत्र औद्योगिक असो वा कॉर्पोरेट असो किंवा घरगुती अथवा सार्वजनिक सुरक्षा सर्वप्रथम असायला हवी.
































































