गझलसम्राट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद साडेकर

गायक जगजितसिंग यांचे वडील सरदार अमरसिंग धिमान हे लोकनिर्माण विभागात (Public Works Division) सुपरवायझर होते. त्यांचे स्वप्न होते की, आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी व्हावे. जगजितसिंग यांनीही त्यांचे पदव्युत्तर शिक्षण घेतले ते एम.ए. (इतिहास) होते.

वडिलांना गाण्याची आवड होती. त्यामुळे तो गुण आपसूकच जगजितसिंग यांच्यात आला, पण त्या वेळेस स्वप्नातही वाटले नसेल की, आपले टोपणनाव ‘जीत’प्रमाणे आपण आपल्या गझलगायनाने खरंच जगाला जिंकू.

जगजितसिंगजी पंजाबी शीख होते, परंतु त्यांचा जन्म गंगानगर (राजस्थान) इथे झाला होता. तिथेच त्यांनी शास्त्राrय संगीताचे शिक्षण पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडे घेतले आणि त्यांनी उस्ताद जमालखान साहेब यांच्याकडून ख्याल, ठुमरी, ध्रुपद यांचे शिक्षण घेतले. त्यांचे जालंदरचे प्रिन्सिपल सूरजभान यांनी त्यांना ‘‘मुंबईला जा, तिथे तुझ्या गुणांना वाव मिळेल’’ असे सांगितले. अशा रीतीने वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली, 1965 सालची ही गोष्ट.

मुंबईला तर स्वप्न घेऊन आले, पण रोजीरोटीचे काय? मग पेइंग गेस्ट म्हणून ठिकाणी राहू लागले आणि खरा संघर्ष सुरू झाला. इथे जिंगल गायक म्हणून काम करत होते. 1967 ला त्यांची ओळख चित्रा सिंग यांच्याशी झाली. त्या विवाहित होत्या, देबुप्रसाद दत्ता हे त्यांच्या पतीचे नाव. त्यांचे पतीशी पटत नव्हते. त्यांना एक मुलगी होती मोनिका नावाची. दोघांनी घटस्फोट घेतला आणि जगजितसिंगजी यांनी चित्रा सिंग यांना लग्नाची मागणी घातली. आणि 1970 ला दोघांनी विवाह केला. जगजितसिंगजी उच्चभ्रू लोकांच्या घरगुती मैफलीत गायन करत असत. त्यांना खरी ओळख मिळाली, लोकप्रियता लाभली ती 1976 साली, जेव्हा त्यांची रेकॉर्ड (Longplay) प्रकाशित झाली, नाव होते, ‘द अनफॉरगेटेबल’.

ज्यावेळी गझलप्रेमी मंडळी बेगम अख्तर, उस्ताद मेहंदी हसन, तलत मेहमूद यांच्या शास्त्राrय बैठक असलेल्या गझलांचा आस्वाद घेत होती, त्याच वेळी जगजितसिंग यांनी गझलांची बंदिस्त चौकट मोडून तिला खुले आकाश दाखवण्याचे मोठेच काम केले. गझलांतील रागदारी, आलापांना आणि साथसंगतीच्या पारंपरिक वाद्यांना फाटा देत गायकीचा वेळ कमी करून नव्या रूपात त्यांनी गझलेला रसिकांसमोर पेश केले. जगजितसिंगांनी गझलेच्या जुन्या फॉर्मेटला छेद दिल्याचा आरोप प्रस्थापितांनी त्यावेळी केला, पण रसिकांनी मात्र जगजितजींचा हा प्रयोग डोक्यावर घेतला.

1990 पर्यंत त्यांना त्यांच्यासमवेत पत्नी चित्रा सिंग यांनी साथ दिली होती, परंतु 18 वर्षांचा एकुलता एक मुलगा अपघातात ठार झाला, त्याचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत आणि त्यांनी गायन बंद केले.
जगजितसिंग यांनी चित्रपटात गायनही केले. 1981 साली ‘प्रेमगीत’, तर 1982 ला ‘अर्थ’ या चित्रपटांना संगीत दिले आणि सर्वच्या सर्व गाणी 40 वर्षांनंतरही सदाबहार आहेत. तसे त्यांनी अनेक भाषांत गायन केले आहे.
जगजितसिंग यांनी जवळपास 43 गझलचे, 7 पंजाबी भाषेतील, 5 भक्तिगीतांचे अल्बम काढले. त्यांनी शास्त्राrय गायनाचा मजबूत पाया असल्यामुळे अनेक गझला रागदारीवर संगीतबद्ध केल्या, तर कबीर भजने ते अगदी पॉप साँग्जपर्यंत सर्व संगीत प्रवाहांना न्याय दिला होता. त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले होते.

2014 मध्ये केंद्र सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन डाक तिकिटे काढली तर राजस्थान सरकारने मरणोत्तर ‘राजस्थान रत्न’ हा सर्वेत्तम नागरी पुरस्कार दिला. या जगाला आपल्या आवाजाने जिंकणाऱया जगजिंतसिंगवर 10 ऑक्टोबर 2011 रोजी मस्तिष्क रक्तस्रावाने (Brain Hemorrhage) मृत्यूने घाला घातला. जोपर्यंत गझल या जगात कायम आहे, तोपर्यंत जगजितसिंग हे नाव अमर राहील.