गाथेच्या शोधात – दगडात कोरलेली करुणा

>> विशाल फुटाणे

[email protected]

कर्नाटकातील गुट्टाला येथील चंद्रशेखर मंदिराजवळ सापडलेला इसवी सन 1539 चा शिलालेख मानवी शोकांतिका मांडतो. या शिलालेखाजवळ कोरलेले, डोक्यावर दोन-तीन मृतदेह असलेली टोपली वाहून नेणारे शिल्प म्हणजे मानवी संवेदनांचा गोठलेला क्षण आहे.

इतिहास म्हणजे केवळ राजे, युद्धे, सत्तांतर आणि साम्राज्यांची नोंद नव्हे; इतिहास म्हणजे माणसांच्या जगण्याचा, त्यांच्या यातनांचा आणि संकटांपुढील तग धरण्याचा आरसा असतो, पण हा आरसा आपल्यासमोर फार क्वचितच इतक्या स्पष्टपणे येतो. कर्नाटक राज्यातील हावेरी जिह्यातील गुट्टाला येथे चंद्रशेखर मंदिराजवळ सापडलेला इसवी सन 1539 चा शिलालेख हा अशाच एका अस्वस्थ करणाऱया, पण अत्यंत महत्त्वाच्या वास्तवाचा साक्षीदार आहे. दुष्काळामुळे तब्बल 6,307 लोकांचा मृत्यू झाल्याची थेट नोंद करणारा हा शिलालेख भारतीय इतिहासातील एक दुर्मिळ आणि विलक्षण दस्तऐवज ठरतो.

आज आपण नैसर्गिक आपत्तींमधील मृत्यूंची आकडेवारी वृत्तपत्रांच्या मथळ्यांत किंवा सरकारी अहवालांत पाहतो; पण 16व्या शतकात एखाद्या समाजाने हा आकडा दगडावर कोरण्याइतकी तीव्रता अनुभवली याचा विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. हा शिलालेख शके 1461, विकारी संवत्सर, भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच 18 ऑगस्ट 1539 रोजीचा असल्याचे दिसून येते. कन्नड भाषा आणि लिपीत कोरलेला हा लेख `बारा’ म्हणजे `दुष्काळ’ या शब्दाभोवती फिरत असला तरी त्यामागे लपलेली मानवी शोकांतिका शब्दांच्या पलीकडे जाते. या शिलालेखात केवळ मृत्यूंची संख्या दिलेली नाही, तर त्या मृत्यूंशी संबंधित एक माणूसही इतिहासाच्या प्रकाशात येतो मारुलैया ओडेया. गुट्टावलाल येथील नानीदेव ओडेया यांचा हा पुत्र, त्या भयावह दुष्काळात मृत्यू पावलेल्या लोकांचे मृतदेह टोपल्यांमध्ये भरून दफनासाठी घेऊन जात होता अशी नोंद या शिलालेखात आहे. शिलालेखाजवळ कोरलेले शिल्प या कथेला अधिक जिवंत करते. डोक्यावर दोन-तीन मृतदेह असलेली टोपली वाहून नेणारी मानवी आकृती पाहताना इतिहास अभ्यासकही क्षणभर थबकतो.

डोक्यावर दोन-तीन मृतदेह असलेली टोपली वाहून नेणारी मानवी आकृती ही केवळ एक शिल्पात्मक रचना नाही; ती मानवी संवेदनांचा गोठलेला क्षण आहे. त्या आकृतीकडे पाहताना इतिहास अभ्यासकही क्षणभर थबकतो. कारण येथे इतिहास शब्दांत नाही, तर देहबोलीत व्यक्त झालेला आहे. डोक्यावर ठेवलेली टोपली म्हणजे भार फक्त मृतदेहांचा नाही, तर सामूहिक दुःखाचा, उपासमारीचा आणि असहायतेचा आहे. त्या माणसाच्या वाकलेल्या मानेत दडलेली थकवा आहे, पावलांत भीती आहे आणि तरीही पुढे जाण्याची एक अनामिक जबाबदारी आहे. हे शिल्प पाहताना करुणा शब्दात उरत नाही, ती थेट मनावर आदळते. या शिल्पात करुणा आणि कर्तव्य यांचे विचित्र संमेलन दिसते. मृत्यू इतका सर्वसामान्य झाला आहे की, तो वाहून नेणे हे रोजचे काम बनले आहे, पण तरीही त्या मृतांना माती देण्याची जबाबदारी कोणीतरी घेतो हीच माणुसकीची शेवटची रेषा येथे अधोरेखित होते.

कलात्मक दृष्टीने पाहिले तर हे शिल्प सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना छेद देते. येथे सौंदर्य आहे, पण ते वेदनेचे सौंदर्य आहे. रेषा, आकार आणि संतुलन यांचा वापर करून कलाकाराने एक असह्य वास्तव स्वीकारण्याजोगे केले आहे. दगडाच्या कणखरपणात मानवी कोमलता पकडण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच हे शिल्प पाहताना आपण केवळ इतिहास पाहत नाही, तर त्या काळातील श्वास ऐकतो, उपासमारीची चाहूल घेतो आणि मृत्यूच्या सावलीत उभ्या असलेल्या समाजाची जाणीव अनुभवतो. हा केवळ कलात्मक अवशेष नाही, तर समाजाच्या सामूहिक वेदनेचे दृश्य रूप आहे. त्या काळात अन्नधान्याचा अभाव, रोगराई, स्थलांतर आणि सामाजिक अस्थैर्य यांचा एकत्रित परिणाम झाला असावा याचा अंदाज या एका दगडी नोंदीवरून येतो. साहित्यिक ग्रंथांत दुष्काळांचे वर्णन आढळते, पण इतक्या नेमक्या आकडय़ांसह आणि सामाजिक प्रतिसादासह नोंद फारच दुर्मिळ आहे. म्हणूनच गुट्टालाचा हा शिलालेख भारतातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मानवी मृत्यूंची पहिली ठोस ऐतिहासिक नोंद मानली जाते.

हा शिलालेख शोधणारे हंपी येथील राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक आर. शेजेश्वर यांचे कार्य केवळ एक पुरातत्त्वीय शोध नसून इतिहासाच्या सामाजिक बाजूला उजाळा देणारे आहे. आज आपण जेव्हा हवामान बदल, दुष्काळ, पूर आणि महामारी यांवर चर्चा करतो तेव्हा हा शिलालेख आपल्याला सांगतो की, अशा संकटांचा अनुभव समाजाने शतकानुशतके घेतलेला आहे. मारुलैया ओडेया याने बसवेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन सीमाधीश तिम्मरस स्वामींच्या अधिकारक्षेत्रात हे कार्य केले, ही नोंद त्या काळातील धार्मिक भावना, प्रशासन आणि सामाजिक कर्तव्य यांचे गुंतागुंतीचे नाते स्पष्ट करते.

पुरातत्त्व विभागाच्या शिलालेख शाखेने देशभरातून अगदी दुर्गम जंगलांमधूनही एक हजाराहून अधिक शिलालेख शोधून काढले आणि त्यांची प्रतिलिपी केली आहे, तर याच वर्षात शंभरहून अधिक नवीन शिलालेख सापडले आहेत. हे आकडे दर्शवतात की, भारताचा इतिहास अजूनही जमिनीखाली दडलेला असून शिलालेख शास्त्राच्या माध्यमातून तो पुन्हा उलगडत आहे.

 गुट्टालाचा शिलालेख आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारतो, `आपत्ती येते तेव्हा समाजाची जबाबदारी काय असते?’ आज आकडे फाईलमध्ये नोंदवले जातात तेव्हा ते दगडावर कोरले गेले, पण मृत्यूची वेदना, उपासमारीचे चटके आणि माणुसकीची गरज तेव्हाही तीव्र होती, आजही आहे. म्हणूनच हा शिलालेख केवळ भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर वर्तमानालाही आरसा दाखवतो.

(लेखक प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)