‘स्थान’ माहात्म्य – श्रीलक्ष्मीनारायणाचे ‘अद्वैत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य 

श्रीदेव लक्ष्मीनारायणाचे देवालय विलक्षण आकर्षक आहे. शिल्पकला आणि स्थापत्यकलेच्या अनुषंगाने या देवालयाची वास्तू अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रशस्त सभामंडप, काष्ठ व पाषाणस्तंभाने सजलेला अंतराळ आणि श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे सान्निध्य वागवणारे गर्भगृह अर्थात गाभारा अशा तीन टप्प्यांत या देवालयाचे ‘स्थानमाहात्म्य’ विखुरलेले आहे. श्रीदेवनारायणाचे दर्शन घेण्यासाठी भक्तभाविक जिथे उभे राहतात ते सुबक व कलापूर्ण दालन ‘अंतराळ’ म्हणून ओळखण्यात येते. येथे सहा फूट उंचीचे सहा पाषाणस्तंभ आणि त्यावर कोरलेल्या देवदेवता, अष्टपाल-अष्टवसू, योगिनी आदींच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत.

वालावल देवालयातील श्रीदेव लक्ष्मीनारायणाची मूर्ती काळय़ाशार पाषाणातून घडवलेली आखीव-रेखीव, चार हातांची आहे. अन्यत्र श्रीनारायणाच्या डाव्या बाजूस लक्ष्मीदेवतेची मूर्ती असते; मात्र वालावल देवालयातील लक्ष्मीदेवता श्रीदेवनारायणाच्या उजवीकडे असल्याचे, तर डावीकडे गरुडमूर्ती असल्याचे पाहावयास मिळते. श्रीदेवनारायणाची मूर्ती अंदाजे पाच फूट उंचीची आहे; मात्र श्रीलक्ष्मीदेवतेची मूर्ती आकाराने अतिशय लहान व श्रीदेवनारायणाच्या गुडघ्यापर्यंत पोहोचेल इतकी उंच आहे. श्रीलक्ष्मीदेवतेच्या हाती कमलपुष्पाची कळी आहे. काही अभ्यासकांचे अनुमाने, ‘ही मूर्ती श्रीलक्ष्मीदेवतेची नसून पृथ्वीमातेची आहे’ असे आहे; परंतु तसा नेमका संदर्भ उपलब्ध नाही.

श्रीदेव नारायणाच्या मूर्तीचे ध्यान यौगिक स्वरूपाचे आहे. या मूर्तीद्वारे ध्यानासाठी आदर्शवत अशा ‘साक्षात’ ब्रह्मतत्त्वाची संकल्पना प्रतिबिंबित होते. वालावल येथील मूर्ती श्रीदेवांची मूर्ती ‘नारायण’रूपाने परिचित असली तरी तिचे स्वरूप पद्म-स्कंद व अग्निपुराण तसेच ‘धर्मसिंधू’ आदी ग्रंथांमध्ये वर्णन केल्यानुसार नाही. श्रीदेवनारायणमूर्तीच्या हातात असलेली शंख, पद्म, गदा, चक्र ही आयुधे घडय़ाळय़ाच्या काटय़ाप्रमाणे असतात; मात्र वालावल येथील श्रीदेवनारायणमूर्तीच्या हातातील आयुधांचा क्रम चक्र, गदा, शंख व पद्म असा उलट प्रकारे दिसून येतो. या क्रमाने आयुधे धारण करणाऱया श्रीनारायणस्वरुपाचा उल्लेख संस्कृत ग्रंथामध्ये ‘अनिरुद्ध’ म्हणून केला जातो. या कारणाने वालावल येथील श्रीदेवनारायण हा ‘अनिरुद्ध’ आहे. नजरेत वात्सल्य आणि चेहऱयावर हास्य विलसत असलेला हा कनवाळू लोभसवाणा श्रीदेव नारायण आपल्या भक्तांच्या सहाय्यार्थ सदैव जागृत असतो. म्हणूनच, श्रीलक्ष्मीनारायण देवालयात कधीही शेजारती म्हटली जात नाही. हेच कारण, येथील श्रीदेवनारायणाचे अस्तित्व ‘जागृत’ असल्याचे दर्शविते आणि या देवालयाचे ‘स्थान’माहात्म्य अधोरेखित करते.

श्रीदेवनारायणाची मूर्ती पंढरपूरनिवासी श्रीविठ्ठलाच्या मूर्तीप्रमाणे काळय़ाशार दगडातून घडविलेली आहे; मात्र दोन्ही देवतांमधील साम्य केवळ रंग आणि दगडापुरते मर्यादित नाही, तर या दोन्ही देवस्थानांचा एकमेकांप्रति असलेला ऋणानुबंधदेखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. श्रीदेवनारायण स्पर्शीत तुळशीमाळा आषाढी-कार्तिकी अथवा माघ मासातील एकादशीला पंढरपूर येथे नेऊन विठ्ठलास अर्पण करण्यात येतात. ही मानाची परंपरा वालावल परिसरातील ‘जितवणे’ येथील करमळीकर प्रभू यांच्याकडे असते. पंढरपूरच्या विठोबाला श्रीदेवनारायणाकडून तुळशीमाळ अर्पण केली जाते, नैवेद्य दाखवण्यात येतो त्याचप्रमाणे ब्राह्मणभोजन घालण्यात येते. यानिमित्ताने श्रीदेवनारायणाकडून येणारी तुळशीमाळ अर्पण करणाऱया व्यक्तीस श्रीविठ्ठलाचे वस्त्र प्रसादरूपाने देण्यात येते. श्रीदेव लक्ष्मीनारायण हा साक्षात विठ्ठलरूप आहे याविषयी ठाम भूमिका घेणारे वालावलकर ग्रामस्थ ‘श्रीदेवनारायणास सोडून पंढरपुरास जाऊ नये’ हा अलिखित दंडकही कसोशीने पाळतात.

श्रीदेव लक्ष्मीनारायणाचे देवालय विलक्षण आकर्षक आहे. शिल्पकला आणि स्थापत्यकलेच्या अनुषंगाने या देवालयाची वास्तू अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रशस्त सभामंडप, काष्ठ व पाषाणस्तंभाने सजलेला अंतराळ आणि श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे सान्निध्य वागवणारे गर्भगृह अर्थात गाभारा अशा तीन टप्प्यांत या देवालयाचे ‘स्थानमाहात्म्य’ विखुरलेले आहे. श्रीदेवनारायणाचे दर्शन घेण्यासाठी भक्तभाविक जिथे उभे राहतात ते सुबक व कलापूर्ण दालन ‘अंतराळ’ म्हणून ओळखण्यात येते. येथे सहा फूट उंचीचे सहा पाषाणस्तंभ आणि त्यावर कोरलेल्या देवदेवता, अष्टपाल-अष्टवसू, योगिनी आदींच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत. गाभाऱयाच्या महाद्वारावर सूर्य, कुबेर आदी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या असून महाद्वाराच्या दोन्ही बाजूंस जय-विजय यांच्या मूर्ती आहेत, तर मध्यभागी शेषशायी श्रीविष्णूची मूर्ती आहे. सभामंडपातून बाहेरच्या बाजूस दिसणाऱया पाच भव्य दगडी दीपमाळांवर हत्ती, पशुपक्षी आणि कलशाकृती कोरलेल्या आहेत.

श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या देवालयानजीक सुंदर आणि विस्तीर्ण तलाव आहे. देवकार्यासाठी वापरण्यात येणारे पाणी सहजगत्या उपलब्ध व्हावे या हेतूने देवालयाशेजारी तलाव राखण्याची पूर्वापार परंपरा कोकण, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरातील अनेक मंदिरांमध्ये दिसून येते. श्रीदेवनारायण देवालयामध्ये सर्व पारंपरिक उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. आषाढ अष्टमी ते शुद्ध दशमीपर्यंत ‘पावणेर’ आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा मोठा उत्सव येथे संपन्न होतो. यावेळी भक्तांची अलोट गर्दी उसळते. स्थानिक आणि नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले मूळ ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. अडीअडचणीच्या काळात श्रीदेवनारायणाचरणी नवस केले जातात. तर प्रसंगी प्रसाद (कौल) लावून श्रीदेवाकडून मार्गदर्शनही घेतले जाते. ज्याचे कुलदैवत श्रीदेवनारायण आहे त्याने अन्यत्र कोणत्याही क्षेत्री देवसेवेकरिता जाऊ नये असा नियम आहे. देवालयाच्या आवारात भांडणतंटे, वादविवाद करू नये, अपशब्द बोलू नये, देवालयाच्या चौकाबाहेर मुखशाळेत लावलेली घंटा ठरावीक वेळी वाजवण्यात येते, त्यामुळे ती विनाकारण अन्य वेळी वाजवू नये, दर्शनार्थींनी सभामंडप किंवा पाखाडीत पादत्राणे घालून प्रवेश करू नये तसेच श्रींच्या पालखी मिरवणुकीत पादत्राणे घालून येऊ नये. श्रीदेव नारायणाच्या मूर्तीवर अक्षता वाहू नये. गाभाऱयात बसून आचमन करू नये अशी अनेक बंधने व रीती-नियमांचे भान पाळून इथे भाविक एकवटतात ते केवळ श्रीदेव लक्ष्मीनारायणावरील प्रेमापोटी. साक्षात पुराणकाळापासूनचे अस्तित्व आणि माहात्म्य जागवणारी श्रीलक्ष्मीनारायणाची मूर्ती आपल्या गावात स्थापन झालेली आहे याचा अभिमान म्हणूनच प्रत्येक वालावलकर मंडळींच्या नजरेतून ओसंडताना दिसतो.

श्रीदेवनारायणामुळे ‘वालावल’चे स्थानमाहात्म्य सर्वत्र सर्वदूर पोहोचलेले आहे. ‘वालावल’ गावाचा उल्लेख होताच डोळय़ासमोर श्रीदेवनारायणाची मूर्ती येते व श्रीदेवनारायणाचे ‘स्मरण’ करताच ‘वालावल’ची आठवण येते असे सुरेखसे ‘अद्वैत’ यानिमित्ताने जुळलेले आहे.

n [email protected]