ठसा – हरिभाऊ नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश उपदेव

कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नव्हे, तर कामगारांच्या संघर्षाचे ऊर्जास्रोत असलेले मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांचे नुकतेच निधन झाले. मिल कामगारांसाठी सतत लढा देणारा नेता नागपूरकरांनी गमावला आहे, कामगार चळवळीचा आधारवड हरपला. हरिभाऊंची ही शिकवण सर्वांसाठी आदर्श आहे. कामगारांसाठी सतत संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला याचे अतीव दुःख असल्याच्या भावनाही कामगारांनी व्यक्त केल्या. महात्मा गांधी, तुकडोजी महाराजांचा वारसा चालविणारे हरिभाऊ कामगार नेते होते. कामगार विश्वातले पर्व आज इतिहासजमा झाले. सदासर्वदा बैद्यनाथ चौकातील कामगार भवनात कामगारांची लगबग असायची, इंटक व काँग्रेसचे नेते असूनही स्वतःच्या सरकारविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद त्यांच्यात होती. हरिभाऊ कामगारांच्या घोळक्यात नेहमी व्यस्त असायचे. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुषाची पुण्यतिथी, कामगार दिवस हे सोहळे कामगार भवनात ते साजरे

कामगार भवनाची ही वास्तू नाईक यांच्या जाण्यामुळे ओस पडली आहे.1986 मध्ये एम्प्रेस मिल बंद पडल्यानंतर सरकारशी व प्रशासनाशी लढा उभारण्याचे काम नाईक यांनी मंत्रीपदावर असताना आणि मंत्रीपद गेल्यानंतरही केले. शासनाच्या धोरणामुळे शहरातील ऐतिहासिक एम्प्रेस, मॉडेल मिल व सूतगिरण्या बंद पडल्या हे ते ठासून सांगत. एम्प्रेस मिल आणि मॉडेल मील नागपूर शहराच्या इतिहासाची एक शान होती. विदर्भाचे पांढरे सोने कापसाची मोठी बाजारपेठ नागपूर ‘कॉटन मार्केट’ खरेदी-विक्रीची उलाढाल नागपूर शहराच्या वैभवात स्वातंत्र्याच्या आधीपासून भर टाकत होते. मॉडेल मिल-एम्प्रेस मिल कापडाला देशविदेशात मागणी होती. कापडासोबतच मिलचा भोंगा नागपूर शहराच्या जागण्याच्या-झोपण्याच्या वेळा ठरवीत होता. काळानुरूप बदल घडत गेले आणि भोंग्याची मजबूत चिमणी पाडून त्या जागेवर आज मोठे सिमेंटचे साम्राज्य उभे झाले आहे. एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल कामगारांचा नेता म्हणून नाही, तर परिवारातील ज्येष्ठ म्हणून हरिभाऊ नाईकांचा सन्मान हा त्या काळात विद्यार्थीदशेतच अनेकांनी पाहिला.

हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच विविध पदे सांभाळली. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कामगार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. 1970 दरम्यान बाभूळखेडा हा 14 क्रमांकाचा अमाप विस्तार असलेला नागपूर महानगरपालिकेचा वॉर्ड म्हणजे मजुरांच्या वस्त्या, समस्यांचे आगार होता. त्या वॉर्डाचे नगरसेवक म्हणजे समस्यांचे काटेरी टोप परिधान करण्यासारखेच होते, परंतु हरिभाऊ नाईक यांच्या काळात वॉर्डाचा बराचसा कायापालट झाला. तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल चौकात राष्ट्रसंतांचा पुतळा कॅन्सर रुग्णांच्या प्रेरणेसाठी सिमेंटचा स्वखर्चाने बसविण्याची भावना नगरसेवक म्हणून हरिभाऊ नाईकांकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा घेतलेले दुर्गादास रक्षक यांनी व्यक्त केली होती. यावेळी हरिभाऊ नाईक म्हणाले होते की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझे पण दैवत आहेत. सिमेंट पुतळा टिकाऊ राहणार नाही. आपण अष्टधातूंचा भव्य पुतळा बसवू.

सार्वजनिकरीत्या त्यासाठी फंड उभारू. अनेक राजकारणी -समाजकारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समितीत होते. दुर्गादासजी रक्षक यांच्या पाठीशी रतनचंदजी डागा आणि हरिभाऊ नाईक शेवटपर्यंत खंबीरतेने उभे राहिले. एक-एक रुपया मिल मजदुरांकडून त्यांनी राष्ट्रसंताच्या पुतळ्यासाठी जमा केला होता. दुर्गादासजी रक्षकांनी उमरेड रोड ते वंजारीनगर मार्गाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्ग नामकरण करण्याचा प्रस्ताव मनपाकडे पाठवला. हरिभाऊ नाईक यांनी नामकरण मंजूर करून घेतले. हरिभाऊ नाईकांनी आयुष्यभर मिल मजदुरांच्या भल्याचा विचार करीत कार्य केले. समाजकारण हा त्यांचा मूळ पिंड होता. हरिभाऊ नाईक आणि दादा लाबंट ही जोडी आगळीवेगळी सामाजिक कार्यातील होती. या जोडीतील दुसरा शिलेदार निसर्गाला समर्पण झाला. हरिभाऊ नाईक हे शेवटपर्यंत महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारवाटेवर जीवन जगत राहिले. ‘ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण’ त्यांच्या जीवनात हे पदोपदी अनुभवायला यायचे अशा आठवणी हरिभाऊ नाईक यांच्या सोबत काम करणारे कामगार नेते आजही सांगतात. राज्याच्या उपराजधानीत बंद पडलेल्या गिरणी कामगारांना मुंबईच्या धर्तीवर घर मिळावे हे हरिभाऊ नाईक यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.