
>> नम्रता पवार
डावखुरे असणे… म्हटले तर फॅशन… म्हटले तर डावखुरे असणे… म्हटले तर फॅशन… म्हटले तर नकोसे. सचिन तेंडुलकर, बराक ओबामा, अमिताभ बच्चन ही मंडळी डावखुरी. पाहूया जरा डाव्या हाताने लिहून…
आपले दोन हात, ज्यामध्ये जग जिंकण्याचं सामर्थ्य आहे. या दोन हातांनी शस्त्र किंवा लेखणी घेऊन नवा इतिहास घडविला जातो. कवयित्री बहिणाबाई सुगरणीचं वर्णन आपल्या ओव्यांमध्ये करताना म्हणतात, ‘तिची इवलीशी चोच, तेच हात तेच दात… पण तुला दिले रे देवाने दोन हात, दहा बोटं’. खरंच आपण माणसं खूप भाग्यवान आहोत. आपण आपल्या दोन हातांनी आपापल्या कल्पनेनुसार छान कलाकृती घडवत असतो. मात्र काहीजण दोन हातांमध्ये फरक करताना दिसतात. उजवा हात म्हणजे शुभ आणि डावा म्हणजे अशुभ. अगदी घरातील एखादी वस्तू हरवली आणि सापडत नसेल तर तू नक्कीच ती डाव्या हाताने ठेवली असणार असंच सुनावलं जातं. कोणी डाव्या हाताने पैसे वा काही देत असेल तर ते त्यांना उजव्या हाताने द्यायला सांगितलं जातं.
खरं तर डावा हात म्हणजे अशुभ आणि उजवा हात शुभ असं काहीही नाहीये. फरक असेल तर तो एवढाच की, डावखुरी व्यक्ती तिचं काम डाव्या हाताने करते. याबाबत मानसोपचार तज्ञ डॉ. नेरुरकर सांगतात, डावखुरेपणा हा नैसर्गिक आहे. माझ्याकडे जेव्हा पालक मुलांच्या डावखुरेपणाची चिंता व्यक्त करतात तेव्हा मी पालकांना त्यांचा नैसर्गिक डावखुरेपणा मोडून न टाकता सहकार्य करण्याविषयी सांगतो.
एकच सांगावसे वाटते की, एखादी डावखुरी आई तिच्या घरातील व्यक्तीसाठी जेव्हा डाव्या हाताने तव्यावरची गरमागरम पोळी खाऊ घालते तेव्हा ती डावखुरी नसते. ती फक्त प्रेमाने अन्न खाऊ घालणारी आई असते. तसंही डावा हात आणि उजवा हात जोडले जातात तेव्हा नमस्कार करतो. या नमस्कारात नम्रता असते. एखाद्याच्या कौतुकासाठी वाजविलेल्या टाळय़ा या दोन्ही हातांनीच तर वाजविल्या जातात हेही तितकचं खरं आहे.
नकारात्मकता बाजूला ठेवा
परदेशात मात्र डावखुऱया लोकांसाठी खास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. अजूनही आपल्याकडे मात्र या गोष्टीकडे इतकं नकारात्मकपणे बघितलं जातं की, उपाययोजना दूरचीच गोष्ट आहे. एखादी व्यक्ती डाव्या हाताने लिहिताना वा काम करताना दिसली की ‘अरे, तू डावरा आहेस का?’ असं मुद्दामहून वा उत्सुकतेने चारचौघात विचारलं जातं. संगणकाचा कीबोर्ड, माऊस, कातर, हॉकी स्टिक, मिक्सर अशा अनेक वस्तू उजवा हात वापरणाऱयांसाठी बनविलेल्या असतात.
मुलांना प्रोत्साहन द्या
आपल्या घरात एखादं मूल वा व्यक्ती डावखुरी असेल तर त्यांचा डावखुरेपणा अबाधित राखून त्यांना प्रोत्साहन द्या. मुलांना डावखुरेपणाचा संकोच वाटू नये यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. लहानपणापासून त्यांना लिहिण्यासाठी उशी देऊन उंचावर बसवावं. त्यामुळे स्वतःचं अक्षर वाचायला सोपं जातं. वर्गात शिक्षकांनीदेखील बाकाच्या डाव्या बाजूला डावखुऱया मुलांना बसवावं जेणेकरून उजव्या हाताने लिहिणाऱयांना त्याचा त्रास होणार नाही. हस्तकलेच्या तासाला डावखुऱया मुलांना अधिकचा वेळ द्यावा. वाहतुकीचे नियम खास लक्ष देऊन शिकवावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डावखुरेपणाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता डावखुरेपणा नैसर्गिक आहे आणि तो चांगला आहे याचा आत्मविश्वास मुलांना द्यावा.
‘वर्ल्ड लेफ्ट हॅण्डर्स डे’
जगभरात 13 ऑगस्ट हा दिवस ‘वर्ल्ड लेफ्ट हॅण्डर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. डावखुरं असणं चुकीचं नाही. ती एक ओळख आहे हे सांगणारी आणि डावखुऱया व्यक्तींना बळ देणारी संस्थादेखील आहे ती म्हणजे ‘इंडियन लेफ्ट हँडर्स क्लब’.
हेदेखील डावखुरे
जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती या डावखुऱया आहेत. राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, बिल क्लिंटन, गेरार्ड फोर्ड, जॉर्ज बुश, बराक ओबामा तसेच वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन,, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, ाािहिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील डावखुरे आहेत.
काही महत्वाचे
डाव-उजवं यापेक्षा पालकांनी मुलांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं.
खरं तर डावखुऱया व्यक्तीकडे विनाकारण नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं.
जगात 10 टक्के लोक डाव्या हाताने लिहिणारी आहेत.
उजवा हात वापरणाऱ्यांच्या तुलनेत डावखुऱया व्यक्तींचा बुद्धय़ांक 140 पेक्षा अधिक आहे.
सामान्यपणे उजव्या हाताने काम करणाऱया व्यक्ती फक्त उजव्या हातानेच काम करू शकतात. मात्र डावखुऱया व्यक्ती डाव्या हाताबरोबरच उजव्या हातानेदेखील काही कामे सहजपणे करू शकतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डावखुऱया व्यक्तींचा मेंदू हा रचनात्मक असल्यामुळे तो कलाकृतींशी संबंधित असतो.
पांडवकालीन लेणी साकारणारे हात हे डावखुरे होते.
अनेक नामवंत वैज्ञानिक, अभिनेते, खेळाडू, चित्रकार हे डावखुरे आहेत































































