प्रासंगिक : श्री विठ्ठल – बंधुता आणि समानतेचे प्रतीक

पंढरीचा पांडुरंग हा शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, रंजल्या गांजलेल्यांचा, अनाथ-अपंगांचा, बहुजनांचा देव आहे. या देवाला अंधश्रद्धा, पशुबळी, नवसादी कर्मकांड मान्यच नाही. भोळ्या भाविकांची या देवावर भक्ती, प्रेम, श्रद्धा आहे. याच्या दर्शनाने भक्तभागवतांना परमानंद होतो. या देवाला भक्तांकडून धन संपत्तीची अपेक्षा नाही, तसेच भक्तही या देवाकडे काही मागत नाहीत. श्री विठ्ठल हे सर्व संतांच्या प्रतिभेचे, भक्तीप्रेमाचे उगमस्थान आहे.

या देवाला भक्त माऊली म्हणतात. आईला जसे बाळ तसे याला भक्त. बाळाला काय हवे-नको ते माऊलीस समजते. माता आपल्या लेकरांची काळजी घेते तसे श्री विठाई भक्तांची काळजी घेते. या देवाकडे भेदभाव नाही. स्त्री पुरुष, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, बळवंत-दुबळा, उंच-नीच जातीचा हे भेद या देवाकडे नाही. याची सर्वांवर कृपादृष्टी असते. विटेवर समचरण असलेला हा समदृष्टीचा देव आहे. हा श्री विठ्ठल न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता याचे प्रतीक आहे.

हा देव सर्वांना सर्वकाही देतो. हा देव सर्वांचे जीवन आनंदमय करतो. भक्त याचे सतत नामस्मरण करतात. याच्या दर्शनाची भक्तांना ओढ असते. आपली विठाई माऊली पंढरीस विटेवर उभी राहून आपली वाट पाहत आहे, असे भक्तभाविकांना वाटते. पंढरीस जाऊन विठाईस डोळे भरून पाहून पुन्हा आपल्या गावी येऊन भक्त प्रपंचात आनंदाने रमतो. संसारातील दुःखेही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून दुःखावर मात करतो.

महाराष्ट्रातील संतांनी या देवाच्या रूपाचे वर्णन केले. याच्या गुणांचेही वर्णन केले. याच्या दातृत्वाचे, कर्तृत्वाचे वर्णन केले. सर्व जातीभेद विसरून ते पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येऊन, हरिकीर्तने करून, विठ्ठलनामाचा जयघोष करू लागले. ज्ञानदेव-नामदेवादी संतांचे अभंग व गीता ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथातील विचाराने वारकरी पंथाचा विस्तार झाला. संतांच्या विचाराने समृद्ध असलेले श्रीविठ्ठल भक्त मानवता धर्माचे उपासक झाले. अनंत जन्माची पुण्याई असेल तरच विठ्ठलभक्तीचे भाग्य लाभते.

ज्ञानराज म्हणतात-

बहुता सुकृताची जोडी। म्हणोनि विठ्ठल आवडी।।   

संत नामदेव म्हणतात-

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला।

म्हणोनि कळिकाळा पाड नाही।। 

संतांनी श्री विठ्ठलाचे रूप, गुण, दातृत्वाचे जसे वर्णन केले आहे तसेच पंढरीचेही महात्म्य संत वर्णन करतात. पंढरी हे असे तीर्थ आहे की येथे प्रत्यक्ष परब्रह्म भेटते. या पांडुरंगाच्या समचरणाचे दर्शन, स्पर्शन करून त्या चरणांवर मस्तक टेकवताच भक्ताला ब्रह्मानंदाचा लाभ होतो. सर्वसुखाची प्राप्ती होते. पांडुरंगाला फक्त प्रेमभक्ती हवी असते.

काशी वाराणसी हे तीर्थक्षेत्र त्रिशूळावर वसविले असून पंढरी क्षेत्र सुदर्शनावर वसविले आहे. संत नामदेव एका अभंगात म्हणतात-

आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।

जेव्हा नव्हतें चराचर । तेंव्हा होते पंढरपूर ।।

जेव्हा नव्हती गोदागंगा ।
तेंव्हा होती चंद्रभागा ।।

चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ।।

नाशिलीया भूमंडळ । उरे पंढरी मंडळ ।।

असे सुदर्शनावरी ।
म्हणोनि अविनाश पंढरी ।।

नामा म्हणे बा श्रीहरी ।
ते म्यां देखिली पंढरी ।।
 

वारकरी भागवत संप्रदाय हा महाराष्ट्रातील प्रमुख भक्तिसंप्रदाय आहे. पंढरीचा पांडुरंग या पंथाची अधिष्ठात्री देवता असून, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संतचतुष्ठ्य या संप्रदायाचे प्रमुख, तर भक्त पुंडलिक हा आद्य संत आहे. वारकरी संप्रदायातील संतसाहित्यामुळे विठ्ठलभक्त अंधश्रद्धा, कर्मकांड, नवससायास, गंडेदोरे याच्या आहारी जात नाही. कुणीही बाबा, बुवा, महाराज, भोंदुसाधू त्यांची फसवणूक करू शकत नाही. संतांच्या विचारांनी विठ्ठलभक्तांची भक्ती बळकट झालेली असते. वारकरी संत विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त होते. संत तुकोबा म्हणतात,

एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम।

आणिकांपें काम नाही आतां।।

मोडुनियां वाटा सुक्ष्म दुस्तर।

केला राज्यभार चाले ऐसा।।

पूर्वीच्या काळी भक्ती उपासनेचे काटेरी, दुर्गम, अगम्य मार्ग होते. ते अविचारी, अंधश्रद्धेचे मार्ग संतांनी मोडून तोडून टाकले व खूप मोठा रस्ता तयार केला. हाच वारकरी संप्रदाय होय. या मार्गाने सामान्याला सुख मिळते.