आपण कृषिप्रधान आहोत!

>> शैलेश माळोदे

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन. हिंदुस्थानच्या कृषी क्रांतीचे जनक. शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे. शेती टिकली तर शेतकरी टिकेल. आणि हे दोन्ही सक्षम झाले तर देश खऱया अर्थाने सक्षम होईल.

“साध्या देशाला गरज आहे ती एव्हरग्रीन रिव्होल्युशनची, म्हणजेच सदाहरित क्रांतीची’’ असं प्रतिपादन करणारे पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्याशी गप्पा मारण्याचा योग प्रथम आला तो 2000 साली. पुण्यात झालेल्या हिंदुस्थानी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात.

हिंदुस्थानमध्ये हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रचणाऱया डॉ. स्वामिनाथन यांचा देशातील शेती आणि शेतकरी हा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. गप्पा मारताना प्रा.स्वामिनाथन यांच्या बोलण्यातून जे जाणवलं ते म्हणजे कालसुसंगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी आवश्यक असल्याचं तथ्य. ते म्हणाले, ‘मी जेव्हा हरित क्रांतीचा पुरस्कार करीत होतो तेव्हा देशाच्या वाढत्या लोकसंख्येचं पोट भरणं हा प्रमुख मुद्दा होता. आताची आव्हानं खूपच वेगळी आहेत. ती आहेत उत्पादन व्यवस्थापन, वितरण, तंत्रज्ञान वापर आणि आर्थिक गणितांशी निगडित. त्यामुळे जेव्हा शेतकऱयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला तेव्हा या सर्व बाबीना लक्षात घेऊन विस्तृत शिफारसी करणं क्रमप्राप्तच होतं. जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यायची काळजी आणि देशातील शेतकऱयांची परिस्थिती याबाबतही विचार व्हायला हवा. त्यानुसार धोरणांची आखणी हवी.

डॉ. मनकोम्बू सांबसिवन स्वामिनाथन हरित क्रांतीचे जनक हे बिरूद त्यांना चिकटलेलं आहे, पण ते सदाहरित क्रांतीचे पुरस्कर्तेदेखील आहेत. 1988 साली त्यांनी एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करून आपलं व्हिजन प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न आरंभ केले. ते म्हणतात, ‘‘जगाला भूक आणि दारिद्रय़ापासून मुक्ती हेच आमचं उद्दिष्ट आहे. शाश्वत विकास त्याकरिता महत्त्वाचा. हिंदुस्थानने या शाश्वत विकासासाठी शाश्वत शेतीची कास धरायला हवी. त्यामधूनच अन्न सुरक्षा लाभून जैववैविध्यही जतन केलं जाईल. हीच ती सदाहरित क्रांती. डॉ. स्वामिनाथन यांनी तांदूळ हे पीक हिंदुस्थानचे मुख्य अन्न म्हणून विशेषतः दक्षिणेकडील राज्यांसाठी निवडण्यामागे काय कारण? ते म्हणतात, ‘‘माझा जन्म कुंभकोणमचा. कावेरी खोऱयातला. हे भातशेतीचं प्रमुख क्षेत्र. मी माझ्या वडिलांकडून डॉ. एम. के. सांबसिवन यांच्याकडूनच शिकलो की, ‘अशक्य’ हा शब्द शब्दकोशात नसून आपल्या मनात असतो. इच्छाशक्तीला प्रयत्नाची जोड दिली की, मोठमोठी कामं करणं सहजसाध्य आहे. माझे वडील महात्मा गांधींचे अनुयायी असलेले सर्जन होते. त्यांनी दलित बांधवांना मंदिर प्रवेश आणि फिलारेसिससारख्या रोगाचे उच्चाटन याबाबत कुंभकोणमला खूप कार्य केलं. त्यातून माझ्यामध्ये सेवावृत्ती निर्माण झाली. त्यातून मी 1943 च्या बंगाल दुष्काळाचा अनुभव घेतला आणि मग महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झालो. मग गरीबांचं पोट भरण्यासाठी कोणतं पीक योग्य ठरेल यावर चिंतन आणि अभ्यास करून मी तांदळाबाबत संशोधन कार्य सुरू केलं.’’

1944 साली त्यांनी जीवशास्त्र्ाात बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. नंतर ते केंब्रिजला पुढील शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांची गाठ डॉ. मीना स्वामिनाथन यांच्याशी पडली. 1951 साली ते विवाहबद्ध झाले. “डॉ. स्वामिनाथन म्हणतात, मी 68 वर्षे होऊनदेखील विवाहात अत्यंत सुखी आहे. माझ्या तीन मुली, पाच नातवंडे यांच्यासोबत मी खूप आनंदी आहे.’’ आपल्या करीअरविषयी घेतलेल्या निर्णयाविषयी सांगताना ते म्हणतात, ‘‘माझ्या हरितक्रांतीच्या विचारामागे बंगालचा दुष्काळ आहे. तेव्हा मी केरळ विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. तांदळाच्या प्रचंड तुटवडय़ामुळे तेव्हा बंगालला 30 लक्ष लोक मरण पावले. मी माझ्यासारखे त्यावेळचे इतर तरुण महात्मा गांधींमुळे भारावलेले होते. मी शेतकऱयांचं उत्पादन वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून कृषी संशोधन हा करीअर मार्ग निवडला.’’

विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून आपलं योगदान दिलं. ते हिंदुस्थानी कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक आणि हिंदुस्थान सरकारचे कृषी संशोधन सचिव होते. 68 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी मिळवली आहे. विविध शोधनिबंध आणि पुस्तकं लिहून त्यांनी कृषी ज्ञानसेवाही केली आहे. जगामधील प्रथम ‘वर्ल्ड फूड प्राईझ’ त्यांना 1987 साली देण्यात आलं. युनोचे तत्कालीन महासचिव झेवियर पेरेस द क्युलर यांनी त्यांचं वर्णन ‘एक लिव्हिंग लिजंड’ म्हणून केलं. अत्यंत खेळकर स्वभावाचे डॉ. एम. ए. स्वामिनाथन त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीनं वागतात. ‘माय सन’ म्हणून त्यांनी केलेलं संबोधन लेखकाला त्याचा प्रत्यक्षानुभव आणून देणारं होतं. अशा या हिंदुस्थानी कृषी क्षेत्राच्या पितामहाकडून नवीन पिढीतील युवकांनी खूप शिकण्यासारखं आहे शेतीसमोरील हवामान बदलासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांच्यासारखे ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ आवश्यक आहे.

shailesh.malode@gmail.com