लेख – दिल्ली डायरी – मध्य प्रदेशात काय चाललंय?

>>नीलेश कुलकर्णी 

एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे तेथील राजकारण ढवळून निघाले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशात कोरोनात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारलाही मतभेदांचे ग्रहण लागलेले दिसत आहे. भाजपने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पूर्वसंध्येला मध्य प्रदेशात आपले सरकार आणले खरे, मात्र या सरकारला आता मतभेदांनी ग्रासले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यात नर्मदा प्रकल्पावरून कॅबिनेटमध्ये झालेल्या खडाजंगीमुळे मध्य प्रदेश भाजपमधील बेदिली पुढे आली आहे. शिवराज मामा नरोत्तम मिश्रा यांच्यातील मतभेद नर्मदेमध्ये विसर्जित झाले तर त्यांच्या भल्याचे ठरेल, अन्यथा उत्तर प्रदेशच्या वाटेवरून मध्य प्रदेशची वाटचाल होईल हे नक्की.

 मध्य प्रदेशमधील काँग्रेस पक्षाचे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून भाजपचे सरकार मध्य प्रदेशात सत्तेवर आले. मात्र पुन्हा मुख्यमंत्रीपद शिवराज सिंह चव्हाण यांनाच द्यावे लागले त्यामुळे दिल्लीश्वरांच्या मर्जीतील राज्याचे विद्यमान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना मुख्यमंत्री बनवू न शकल्याची सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात कायम आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच शिवराज मामादेखील एक ना एक दिवस ‘नाकापेक्षा मोती जड’ होतील, अशी भीती पक्षनेतृत्वाच्या मनात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे ए. के. शर्मा नावाच्या माजी आयएएस अधिकाऱयाला योगींच्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसाच प्रयत्न नरोत्तम मिश्रांच्या माध्यमातून शिवराजमामांना पायबंद घालण्यासाठी सुरू आहे. गृहमंत्री म्हणून नरोत्तम यांना अमर्याद अधिकार दिलेले आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या तालावर नरोत्तम सध्या शिवराज यांच्याशी डावपेच खेळत आहेत. नर्मदा योजनेवरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी हे त्याचेच द्योतक आहे. कोरोनाकाळात शिवराजसिंह यांनी तुषार पांचाल या व्यक्तीची ओएसडीपदी नियुक्ती केली. पांचाल हे प्रोफेशन कंपनी चालविणारे व्यक्ती असले तरी पूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केले होते. तुषार पांचाल यांच्या नियुक्तीला शिवराजमामाविरोधी गटाने मोदी विरुद्ध शिवराज, असे रूप दिल्याने शिवराजमामांना तातडीने एका दिवसातच तुषार पांचाल यांची नियुक्ती रद्द करावी लागली. पक्षांतर्गत लाथाळ्यांसाठी देशात काँग्रेसची ओळख आहे. आज काँग्रेससारखा सर्वात जुना पक्ष संघर्षाच्या स्थितीतून जात असतानाही त्या पक्षात अंतर्गत लठ्ठालठ्ठी सुरूच आहे. तेच पालुपद आता भाजपतही सुरू झाले आहे. विकासकामांच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशसारख्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात भाजपची पाळेमुळे घट्ट रोवली. त्याच शिवराज यांच्यावर सध्या मध्य प्रदेशात ‘आस्ते कदम’ टाकण्याची वेळ आली आहे. शिवराजमामा व नरोत्तम मिश्रा यांच्या राजकीय संघर्षात सरशी कोणाची होणार? हे येणारा काळच ठरवेल. मात्र या लढाईत भाजपची वाताहत होईल आणि 2024मध्ये ते महागात पडेल, हे लक्षात घ्यायला हवे.

सेल्फ गोल

 jatin-prasadजितीन प्रसाद नावाचे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे तरुण नेते हे मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री होते, याची जनतेला नुकतीच उजळणी झाली. त्याचे कारण म्हणजे या जितीन प्रसाद यांनी काँग्रेसमधून भाजपतमध्ये मारलेली उडी. केंद्रीय मंत्री म्हणून वगैरे जेवढी कीर्ती जितीन यांना मिळाली नाही तेवढी प्रसिद्धी त्यांना भाजप प्रवेशावेळी मिळाली. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाचे सर्वात मोठे नेते, असा आव आणत असलेले जितीन प्रसाद 2014पासून एकही निवडणूक जिंकलेले नाहीत. मात्र जितीन प्रसाद नावारूपाला येण्यास कारणीभूत ठरली ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कार्यपद्धती. योगींच्या राजवटीत ब्राह्मणांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र उत्तर प्रदेशात निर्माण झाले. त्याचा फायदा उठवत जितीन यांनी ‘ब्राह्मण चेतना परिषदे’ची स्थापना करून योगींविरोधात रान पेटवायला सुरुवात केली. अर्थात योगींची ठाकूरधार्जिणी व ब्राह्मण, ओबीसीविरोधी भूमिका यामुळे या चेतना परिषदेत चांगलीच ‘चेतना’ निर्माण झाली. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात भाजपचा हा मतदारवर्ग नाराज झाला. त्यांची नाराजी दूर करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे ‘एका दगडात दोन पक्षी’ मारत ब्राह्मण समाजातील असंतोष विखरून टाकत भाजपने जितीन यांच्यावर जाळे फेकले. केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देणाऱया योगींना यानिमित्ताने दिल्लीश्वरांनी घरातच सवत निर्माण केली. ही खेळी यशस्वी ठरली असली तरी जितीन यांच्या पदरात काय पडणार आहे? आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता त्याच पक्षाचे नेते धुडकावून लावत आहेत. अशा स्थितीत अल्पकालीन मंत्रीपदासाठी जितीन यांनी ‘सेल्फ गोल’ केला असेच म्हणावे लागेल.

तेलही गेले, तूपही गेले…

trivedi‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’, या म्हणीचा अनुभव सध्या तृणमूल सोडून भाजपवासी झालेले माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी घेत आहेत. सर्व काही सुखनैव सुरू असताना या त्रिवेदी महाशयांना पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड गुंडागर्दी करत असल्याचा साक्षात्कार झाला. त्यातून संसदेच्या अधिवेशनात भर राज्यसभेतच त्रिवेदी यांनी तिरमिरीत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे भाजपला अपेक्षित असलेली सनसनाटी निर्माण झाली. मीडियाला ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाली. आता बंगालचे निकाल लागल्यानंतर त्रिवेदींच्या दाव्याचाही परस्पर निकाल लागला. बंगालमध्ये ममतादिदी तर बहुमताने जिंकल्याच; शिवाय आता त्यांनी मुकुल रॉयसहित अनेक महत्त्वाचे भाजप नेते गळाला लावले आहेत. काँग्रेसमधून विभक्त होऊन ममतादिदींनी तृणमूलची स्थापना केली त्यावेळी मुकुल रॉय आणि दिनेश त्रिवेदी हे त्यांचे ‘डावे उजवे’ हात मानले जायचे. या दोघांनाही रेल्वेमंत्री बनविण्याचा पराक्रम दिदींनी करून दाखविला होता. त्रिवेदी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ममतादिदींनी त्यांना मंत्रीपदावरून हटवले, मात्र त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली होती. तथापि भाजपच्या नादाला लागून राज्यसभेची तब्बल पाचेक वर्षे शिल्लक असताना त्रिवेदी महाशयांना ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ सुचली आणि त्यांनी राज्यसभेवर उदक सोडले. आता त्रिवेदींची उर्वरित टर्म ममतादिदी मुकुल रॉय यांना देणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. रेल्वेमंत्रीपदीही त्रिवेदींच्या जागीच मुकुल रॉय यांची वर्णी ममता बॅनर्जींनी लावली होती. आताही त्रिवेदींच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर मुकुल बाबू जातील. इतिसाहाची पुनरावृत्ती होते ती अशी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या