क्रांतिसूर्य महाराणा प्रताप

>> रणवीर राजपूत

मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह सिसोदिया म्हणजे विरता, त्याग, धैर्य, बलिदान, चारित्र्य, राष्ट्रभक्ती, देशाभिमान यांचे मूर्तिमंत प्रतीक होय. अशा महान क्रांतीसूर्याचा जन्म सिसोदिया राजवंशात 9 मे 1540 रोजी कुंभलगड येथे झाला. राणा प्रताप यांच्या पिताश्रींचे नाव राजे उदयसिंह, तर मातोश्रींचे महाराणी जयवंता. बाप्पा रावल, राणा खुमानसिंह, समरसिंह, राणासंग, राणाकुंभ, उदयसिंह यांचा वैभवशाली व शौर्याचा वारसा महाराणा प्रताप यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवापलीकडे जपला. म्हणूनच ते ‘क्रांतीसूर्य’ म्हणवले गेले. मेवाड व चितोड अर्थातच अखंड राजपुताना अकबर बादशहाच्या साम्राज्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी आपलं सारं जीवन पणाला लावलं. अकबर बादशहाच्या तुलनेने सैन्यबळ आणि युद्धसामग्री कमी असूनही त्यांनी सन 1576 ते 1586 या दशकात अकबर बादशहाच्या मोगल सैन्याशी प्राणपणाने लढत हळदीघाट व खमनौरच्या युद्धांत अकबर बादशाह अन् त्याच्या सैन्याला जेरीस आणत त्यांना रणांगणातून माघार घेण्यास भाग पाडले.

प्राचीन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या हळदीघाटाच्या युद्धात अकबर बादशहाला राणा प्रतापांच्या पराक्रमाची पूर्ण कल्पना असल्यामुळे नंतरच्या काळात अकबरने महाराणा प्रतापांना जिवंत पकडण्याचा नादच सोडला. युद्धादरम्यान राणा प्रताप यांच्यावर पाठीमागून वार करणाऱया मोगल सरदारवर त्यांनी मोठय़ा त्वेषाने प्रतिहल्ला करत आपल्या धारदार तलवारीच्या एकाच घावात त्या सरदाराचे आणि त्याच्या घोडय़ाचे मुंडके क्षणातच धडापासून वेगळे केले. या पार्श्वभूमीवर महाराणा प्रतापांची देहयष्टी आणि प्रबळ शक्तीचा अंदाज बादशहाला चांगल्या प्रकारे आल्याने त्याने उभ्या आयुष्यात कधीही राणा प्रतापांशी समोरासमोर येऊन युद्ध केले नाही, तर त्याजागी आपल्या सरदारांनाच पाठविले. एवढे मोठे भय होते बादशाहाला राणा प्रतापांच्या शौर्याचे आणि त्यांच्या तलवार व भाल्याचे. मित्रहो, या गोष्टीला इतिहास साक्षीदार आहे. या युद्धात राणा प्रतापचे अंगरक्षक हकीमखां सूर अन् जालौरचा ताजखां या मुस्लीम सरदारांनी तर चुनावत कृष्ण दास, झाला मानसिंह, झाला बिजा, राणा पुंजा भील, भिमसिंह रावत सांगा, रामदास, भामाशाह, ताराचंद, रामशाह व त्यांचे सुपुत्र शालिवाहन, भगवानसिंह, प्रतापसिंह आदी शूरवीर योद्धय़ांनी मोलाची कामगिरी केली. ‘प्राण गेला तरी बेहत्तर, पण शत्रूपुढे मान तुकवणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे महापराक्रमी योद्धे होते.

राणा प्रतापांचे व्यक्तिमत्त्व कोणाच्याही मनात भरण्याजोगे होते. उंच शरीरयष्टी, श्वेत रंग, भारदस्त डोळे, लांब मिश्या, पिळदार भुजा अन् निधडी छाती अशी एकूण त्यांची बलदंड प्रकृती होती. युद्धाच्या वेळी त्यांच्या अंगावर चिलखत, भाला, तलवार आदी तत्सम युद्ध साहित्याचे वजन सुमारे 120 किलो असायचे. त्यांच्या विजयश्रीत ‘चेतक’ या त्यांच्या अश्वाचादेखील मोलाचा वाटा होता. त्याची स्वामिनिष्ठा अतुलनीय व अवर्णनीय होती. या मुक्या प्राण्याने संकटप्रसंगी आपल्या धन्याचे रणांगणावर प्राण वाचविले होते. म्हणूनच राणा प्रताप हे चेतकला आपल्या गळ्याचा ताईत मानत असत. एका युद्धात अकबराच्या सैनिकांनी राणा प्रतापांना चोहोबाजूंनी घेरले असता चेतकने जखमी अवस्थेत असतानादेखील 60 फुटांहून अधिक लांब नाल्यावरून छलांग मारून मोठय़ा हिमतीने धन्याचे प्राण वाचविले होते. एका प्राण्याची आपल्या धन्याबद्दलची निष्ठा जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदली गेली. या पार्श्वभूमीवर चेतकचे बलिदान हिंदुस्थानींच्या स्मरणात सदैव राहील, हे निश्चित. कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी जारोळ येथे ‘चेतक का चबुतरा’ हे स्मृतीस्मारक उभारले आहे. थोर इतिहासकार गौरीशंकर ओझा म्हणतात, ‘‘जोपर्यंत विश्वात वीरांची पूजा होत राहील तोपर्यंत महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची गाथा लोकांच्या सदैव स्मरणात राहून प्रेरणा देत राहील.’’

हिंदुत्वाची भगवी पताका सर्वदूर फडकवत मातृभूमीचे तन- मन-धनाने रक्षण करण्याचा विडा उचलणारे महाराणा प्रताप आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात मोठे साम्य होते. दोन्ही महायोद्धय़ांनी जातीपातीवर विश्वास न ठेवता निष्ठा व युद्धप्राविण्य यास प्राधान्य दिले. तसेच धर्मद्वेष न करता आपल्या सैन्यदलात सर्व जातीधर्मातील लोकांना स्थान दिले. वेळप्रसंगी दोन्ही योद्धय़ांनी युद्ध करतेप्रसंगी ‘गमिनी कावा’ या युद्धतंत्राचा वापर केला. राणा प्रताप आणि शिव छत्रपती यांना परस्त्र्ााrबद्दल नितांत आदर होता. राणा प्रतापांनी मिर्झा खानच्या पत्नीला मातेसमान वागणूक देऊन त्यांच्या राज्यात आदराने पोहोचवले, तर शिव छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने तिच्या राज्यात परत पाठविले. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही राष्ट्रपुरुषांनी मोगल बादशहांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांचे मांडलिकत्व वा शरणागती पत्करली नाही. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ताठ मानेने जगले अन् आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून तिचे पावित्र्य अबाधित ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या