लेख – भारतीय उपखंडातील बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक!

>>जयंत माईणकर

लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लिम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक. या तिन्ही देशांत निवडून येण्यासाठी अल्पसंख्याकांची मते महत्त्वाची ठरतात आणि ज्या पक्षाला अल्पसंख्याक मोठय़ा प्रमाणात मतदान करतात त्या पक्षावर इतर पक्ष अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा आरोप करतात. हा आरोप नेहमी बहुसंख्याक धर्माधिष्ठत पक्षाकडून केला जातो. हे अयोग्य असले तरीही सल्ला कोणाला देणार?

लोकशाही असणाऱ्या देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्य  असा भेद जरी करण्यात येत नसला तरीही जवळपास सर्वच लोकशाहीवादी देशांत बहुसंख्य समाजाच्या धर्माधिष्ठत पक्षाकडून इतर पक्षांवर अल्पसंख्य अनुनयाचा आरोप केला जातो.  वारंवार हा आरोप करून हे धर्माधिष्ठत पक्ष स्वतःच्या  जागा वाढवून घेतात. भारतात 1989 पासून हाच प्रकार सुरू आहे.

देशातील मुस्लिम खासदारांची संख्या 2014 मध्ये होती 23.  स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके कमी मुस्लिम खासदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असावी. 2019ला  ही संख्या 27 वर पोहोचली. सध्या देशात सुमारे 20 कोटी मुस्लिम असून त्यापैकी सुमारे 80 टक्क्यांहून अधिक मतदार आहेत. मागच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता सर्वाधिक मुस्लिम उमेदवार 2004 मध्ये विजयी झाल्याचे दिसते. 2004 च्या निवडणुकीत 34 मुस्लिम उमेदवार, 2009 मध्ये 39. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वात जास्त मुस्लिम खासदार 1980 मध्ये बनले होते. त्या वेळी मुस्लिम खासदारांची संख्या होती 49. ‘हिंदुत्व’ या शब्दाला ‘राममंदिर’ आंदोलनामुळे धार चढल्यापासून मुस्लिम खासदारांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आणि 2014 ला ती थेट 23 वर घसरली. 1989 मध्ये 86 जागा जिंकलेला भाजप 2014 ला 282 वर पोहोचला. नंतर वाढत गेला. मिश्र वंशीय लोकशाहीवादी देशात जेव्हा बहुसंख्याक लोक धार्मिक, वांशिक, भाषिक मुद्दय़ावर एकत्र येतात तेव्हा अल्पसंख्याक निवडून येण्याची शक्यता कमी होते.

भारतात घडणाऱ्या घटनांचे पडसाद अखंड भारतातील पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतही उमटतात. भारतात 100 कोटी हिंदू आणि  18 कोटी मुस्लिम आहेत. पाकिस्तानची सध्याची लोकसंख्या सुमारे 23 कोटी असून त्यातील 20 कोटी मुस्लिम आहेत. जसा भारतात हिंदूंच्या खालोखाल मुस्लिम धर्माचा समावेश  लोकसंख्येनुसार लागतो तसाच पाकिस्तानमध्ये मुस्लिम धर्माच्या खालोखाल अल्पसंख्याक म्हणून हिंदू धर्माचा नंबर लागतो. हिंदू समाज आजही पाकिस्तानमध्ये 45 ते 50 लाखांच्या आसपास आहे, तर अनधिकृत  आकडेवारीनुसार ही संख्या 80 लाख ते एक कोटीच्या दरम्यान आहे, तर 20 ते 50 हजारांच्या आसपास शीख धर्माचे लोक राहतात. बांगलादेशची लोकसंख्या सुमारे 15 कोटी  असून सुमारे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू जनसंख्या  आहे.  जसा भारतात प्रमुख अल्पसंख्याक धर्म मुस्लिम आहे तसाच पाकिस्तान आणि बांगलादेशातील प्रमुख अल्पसंख्याक आणि  बांगलादेशातील प्रमुख अल्पसंख्याक धर्म हिंदू आहे.

अल्पसंख्याक समाज जगात कुठल्याही लोकशाहीवादी देशात गठ्ठा मतांसाठी जाणला जातो आणि हा समाज आपल्याला सुरक्षा, प्रतिनिधित्व पक्षाकडे झुकलेला असतो. ही वास्तविकता अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्व लोकशाहीवादी देशात सारखी आहे आणि म्हणूनच अमेरिका, इंग्लंडमधील भारतीय मुख्यत्वे डेमोक्रेटिक आणि लेबर पक्षाला अनुकूल असतात. भलेही ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे नारायण मूर्ती यांचे जावई सध्या इंग्लंडचे कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान असतील.

भारतीय उपखंडातील तिन्ही देशांतील अल्पसंख्याकसुद्धा आपल्याला सुरक्षा आणि प्रतिनिधित्व देणाऱ्या पक्षाला जवळ करतात. या तिन्ही देशांत एकसारखेपणा आहे. या तिन्ही देशांत अल्पसंख्याकांनी पारिवारिक पक्षालाच जवळ केलेलं आहे. भारतात आजही मुस्लिम समुदाय नेहरू गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला  अनुकूल आहे आणि म्हणूनच या पक्षावर मुस्लिमांचा अनुनय करण्याचा आरोप भाजपद्वारे  केला जातो. तर पाकिस्तानमध्ये हिंदूंसाठी हीच जागा भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पक्षाची आहे, तर बांगलादेशमध्ये हीच जागा शेख मुजिबुर रेहमान प्रणीत अवामी लीग या पक्षाची आहे. बेनझीर पुत्र बिलावल यांचा  पाकिस्तानातील शंकराच्या मंदिरात अभिषेक करतानाचा फोटो चांगलाच गाजला होता, तर 1971 ला शाळकरी असलेल्या बेनझीर आपले वडील झुल्फिकारअली भुट्टो यांच्याबरोबर सिमला कराराला हजर होत्या. शेख हसीना या  आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातून वाचू शकल्या. कारण तेव्हा त्या दिल्लीत शिक्षणासाठी होत्या.

हिंदूबहुल भारतात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून डॉ. झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम, अहमद पटेल यांच्यासारख्या मुस्लिमनेत्यांची मांदियाळी दिसते तशी जरी नाही तरीही काही प्रमाणात या दोन्ही देशांत हिंदू नेतृत्व दिसते. पाकिस्तानमधील अमरकोट किंवा उमरकोट या हिंदूबहुल आणि हिंदू लोकप्रिनिधी असलेल्या भागात आजही करणीसिंग सोधा या नावाचं  नेतृत्व दिसतं. त्यांचे वडील राणा चंद्रसिंग हे पाकिस्तानात चक्क सातवेळा खासदार होते आणि भुट्टो मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा होते. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लिम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक.  तीन देश मिळून शंभर ते 102 कोटींच्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे, तर सुमारे 55 कोटी मुस्लिम. अर्थात निवडून येण्यासाठी या तिन्ही देशांत अल्पसंख्याकांची मते महत्त्वाची ठरतात आणि ज्या पक्षाला अल्पसंख्याक मोठय़ा प्रमाणात मतदान करतात त्या पक्षावर इतर पक्ष अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा आरोप करतात. हा आरोप नेहमी बहुसंख्याक धर्माधिष्ठत पक्षाकडून केला जातो. हे अयोग्य असले तरीही हा सल्ला कोणाला देणार? समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी भारत – पाक संघराज्याचा विचार मांडला होता 1960 च्या  दशकात. पुढे 1989 ला जर्मनी एक झाला. मात्र युगोस्लाव्हियाचे सात तुकडे पडले, पाकिस्तान दोन भागांत विभागला गेला, बांगलादेश अस्तित्वात आला. संघराज्याच्या विचार कागदावरच राहिला. तिन्ही देशांतील नेते या प्रस्तावावरची धूळ झटकतील का? हा प्रश्नच आहे.