
>> प्रवीण आरोसकर
प्रवीण आरोसकर. नाटय़-चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ हातातील चित्रकलेच्या जोरावर आज मान्यवरांच्या चेहऱ्यांचे रंगकाम सहज करतात.
माझ्या घरी कोणी रंगभूषाकार कोणीही नव्हतं. मी तांत्रिक क्षेत्रात काम करत होतो. एसी, फ्रीज दुरुस्त करायचो, मात्र या क्षेत्रात नोकरी मिळत नव्हती म्हणून या क्षेत्रात आलो. शाळेत असल्यापासूनच माझी चित्रकला चांगली होती. त्यामुळे रंगभूषेची कला लवकर आत्मसात करू शकलो. चित्रकलेत रंगांचं ज्ञान असतं. या कलेतही रंग…व्यक्तिरेखा साकारायला उपयोगी पडतात. रंगांचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं ते कसे वापरायचे हे कळणंही महत्त्वाचं आहे. ते मला चित्रकलेमुळे आलं. त्यावेळी ऍकॅडमी, संस्था काहीही नव्हतं. आम्ही अशोक शिरसाट, प्रमोद नलावडे, अशोक परमार या रंगभूषाकारांच्या हाताखाली काम करून ही कला आत्मसात केली, शिकलो.
‘पाहुणा’ या नाटकासाठी प्रशांत दामले, उषा नाडकर्णी, ‘हसत खेळत’ नाटक, ‘डॉक्टर तमे पण’, ‘अफलातून’ हे गुजराती नाटक, काही कॉमेडी नाटकं…अशी सुरुवातीची आठ वर्षे मराठी, गुजराती, इंग्रजी नाटकातील कलाकारांना मेकअप करू लागलो. या कलेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दौऱ्यावर जाण्याचीही संधी मिळाली. हे सर्व करत असताना अचानक माझ्या कामाला एक वेगळंच वळण लागलं. राजकमल स्टुडिओला एका मेकअप आर्टिस्टची गरज होती. तिथे अशोक शिरसाट यांनी माझं नाव सुचवलं. तेव्हापासून जाहिरीतील कलाकारांची रंगभूषा करण्यासाठी माझं पहिलं पाऊल पडलं. त्यांच्या मेकअपमधील बारकावे शिकायला मिळाले. फोटोशूट, लायटिंग, जाहिरातीचा मेकअप, कॅमेऱ्यासाठी मेकअप अशी मेकअपची अनेक दालनं माझ्यासाठी खुली झाली. हळूहळू मी स्वतंत्र्यरीत्या रंगभूषा करू लागलो. सध्या मी यू टीव्ही, जाहिराती, खासगी कंपन्या याकरिता रंगभूषा करतो. कोणत्याही कलाकाराला रंगभूषेद्वारे साकारताना व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो. म्हातारीची भूमिका असेल तर पांढऱ्या केसांचा विग, चेहऱ्यावर सुरकुत्या कुठे, कशा दाखवायच्या हे अभ्यासून त्याप्रमाणे रंगभूषा आम्ही करतो. नाटकाच्या रंगभूषेचं वैशिष्टय़ म्हणजे, यासाठी उठावदार रंगभूषेची आवश्यकता असते. कारण कलाकाराला शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत व्यक्तिरेखा पोहोचवायची असते. त्यामुळे रंगमंचावरील कलाकृती सादर करणाऱ्या कलाकाराचा मेकअप थोडा हेवी असावा लागतो. यातून मुद्रा, डोळ्यांचे हावभाव स्पष्ट दिसतात.
व्यक्तिरेखेसाठी केला जाणारा मेकअप आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी केला जाणारा मेकअप यामध्ये फरक असतो. यामुळे ‘रंगभूषा’ म्हणजे मी असं सांगेन की, एखाद्याच्या चेहऱ्यावरच्या नकारात्मक गोष्टी काढून टाकून त्यांना सकारात्मक रूप देणे.



























































