लेख – हिंदूंना न्याय द्या!

492

>> केशव आचार्य  

एकाच खुनाची अनेकजण कबुली देतात, जेलमध्ये जातात आणि तरीही आणखी गुन्हेगार पकडले जातात आणि तेही खुनाची कबुली देतात हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. याला पोलीस खात्याचा बेजबाबदारपणा आणि ‘आपल्याला कोणाचीही भीती नाही’ ही मग्रुरी वृत्ती आहे. आपले पोलीस खाते कार्यक्षम आहे. पूर्वी अनेक चांगले पोलीस अधिकारीही होऊन गेले, परंतु सध्याच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नैतिक मूल्ये, न्यायप्रियता, राष्ट्रप्रेम यांचा कमालीचा अभाव दिसून येतो. ‘हिंदू दहशतवाद’ ही काँग्रेसची आवडती, परंतु चुकीची संकल्पना राबवण्यासाठी ज्यांनी  देशासाठी मोठी जोखीम पत्करून आयएसआय आणि. सिमी यांच्याविरुद्ध कारवाई करून प्रचंड राष्ट्रकार्य केले अशा सेनाधिकारी ले. कर्नल पुरोहित यांना एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मालेगाव 2008 बॉम्बस्फोट खटल्यात गोवून टॉर्चर केले. ‘एनआयए’ या राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच हे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रात सांगितले आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या महिलेलाही अत्यंत निर्दयपणे टॉर्चर करण्यात आले. एका निलंबित अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत याला दुजोरा दिला आहे. हे आरोप इतके गंभीर आहेत की, महाराष्ट्र शासनाने ते खोटे असतील तर नाकारावेत आणि आरोप करणाऱ्या चॅनेल आणि त्या अधिकाऱ्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरावा. परंतु सगळ्यात गमतीची आणि अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या काळात 2011 साली शासनाने एक जीआर काढून ‘माहितीचा अधिकार 2005’ मधून दहशतवाद वगळण्याचा बेकायदा आणि घातक निर्णय घेतला. वास्तविक देशाची सुरक्षा ज्यामुळे धोक्यात येऊ शकते केवळ अशाच गोष्टी ‘माहितीचा अधिकार 2005’ मध्ये येत नाहीत. बाकी सर्व माहिती जनतेला देऊन जनतेचे हात बळकट करणे आणि भ्रष्ट नोकरशहांच्या गैरकारभाराला चाप बसविणे हा माहिती अधिकाराचा मूळ हेतू आहे, पण या जीआरमुळे जनतेच्या अधिकाराला वेसण घातली आहे आणि भ्रष्ट, हिंदूविरोधी मंत्री आणि त्यांच्या संगनमताने हिंदूविरोधी पोलीस अधिकारी यांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम केले आहे. राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि हिंदूंना न्याय द्यावा, असे वाटते.  

आपली प्रतिक्रिया द्या