विज्ञान रंजन – उपकारक कांदळवने

>> विनायक

गच्च भरलेल्या आणि सागरकिनारी असलेल्या महानगरात तुफानी पाऊस पडत असेल तर भरतीच्या वेळी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यातही ते शहर मुंबईसारखं बेटावर वसलेलं असेल तर मुळातच चहुबाजूच्या पाण्यात असतं. त्यात आणि पावसाची भर, मग दरवर्षीचीच जलव्यथा.

जगातली कित्येक महानगरं सध्या या समस्येने त्रस्त आहेत. टोकियोमध्ये त्यांनी भूमिगत पावसाळी बोगद्याचं जाळं निर्माण करून पाऊस पडेल तेव्हा पाणी भूपृष्ठावर न तुंबता त्या बोगद्यांमध्ये साठेल आणि ओहोटीच्या वेळी ते उपसा (पंपिंग) करून समुद्रात सोडता येईल अशी व्यवस्था केल्याचं ऐकिवात आहे.

नेदरलँडसारखे काही देश तर समुद्रसपाटीपेक्षा नैसर्गिक सखलता असलेल्या शहरांचे. तिथे समुद्राचं पाणी आत येऊ नये म्हणून भिंती घातलेल्या आढळतात. अर्थात ही झाली पावसाळी पाण्याच्या उत्पातापासून बचाव करण्यासाठी केलेली सोय. परंतु ‘त्सुनामी’ नावाचा प्रकार गेल्या दोन-तीन दशकांत जगाने मोठय़ा प्रमाणावर अनुभवलाय. जपानला या लाटांचा वारंवार तडाखा बसतो. ‘त्सुनामी’ शब्द त्यांचाच. ‘त्सु’ म्हणजे बंदर आणि ‘नामी’ म्हणजे सागरी महालाट!

काही वर्षांपूर्वी तर त्यांच्या फुकुशिमा आण्विक प्रकल्पालाच त्सुनामीची धडक बसली. आपल्याकडे ओरिसा, तेलंगणा, तामीळनाडूनेही अक्राळ-विक्राळ त्सुनामींचा अनुभव घेतला आहेत. प्राचीन काळी अशा त्सुनामी लाटा उसळत नसतील काय? निश्चितच असतील. मग त्याची चर्चा तेव्हा व्हायची का? ठाऊक नाही. कदाचित आता मात्र अक्षरशः हाती आलेल्या बातम्यांची त्सुनामी गॅझेटवरून क्षणोक्षणी नव्या वृत्ताची धडक देत असते. त्यामुळे ही वृत्ते क्षणात सर्वदूर पसरतात आणि कंठाळी चॅनल ती आणखी ‘मसालेदार’ करतात. दुसरी गोष्ट म्हणजे सन 1800 पर्यंत अवघ्या एक अब्ज मनुष्यवस्तीत आता आठपट वाढ झाली असून किनारपट्टीच्या तुरळक, विरळ मानवी वस्त्याच्या जागी समुद्र (आणि नद्यांच्या पात्रातही) नवी बांधकामं घुसखोरी करताना दिसतात. ‘लँड रिक्लेमेशन’च्या प्रकल्पात जगात अनेक ठिकाणी समुद्र ‘हटवण्याचे’ उद्योग सुरू असतात. परंतु कवी यशवंतांच्या शब्दांत सांगायचं तर ‘काय हटवूनि हटतो सागर, हटेल एकीकडे; उफाळेल तो दुसरीकडूनि गिळून डोंगरकडे’ हे शब्दशः खरं ठरतंय. समुद्र हटवता येतो, आटवता येत नाही हे ‘प्रगत’ जगाला कळेल तो सुदिन!

मात्र प्राचीन काळी सागरकिनाऱयांचं रक्षण मानवनिर्मित भिंती नव्हे तर कांदळवन, तिवर किंवा ‘मॅनग्रव्ह’च्या झुडुपांच्या नैसर्गिक ‘भिंती’ करत असत. आमच्या घाटकोपरच्या खाडीकिनारी असलेल्या कांदळवनाच्या झुडुपांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी चमचमत्या काजव्यांचे हजारो पुंजके दिसत. आता ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ या कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे सर्वत्र (एलईडीसकट) झगमगाट आहे… आता ते कांदळवनच नाही तर काजवे कुठले!

गुंतागुंतीची, खाऱया पाण्यात बुडालेली आणि खारटपणा सोसूनही फोफावलेली कांदळवने किंवा तिवरांची झुडुपं इतकी चिवट असतात की ती त्सुनामीसारख्या तीव्र लाटाही फोडतात! पृथ्वीवर कांदळवनाची वाढ सुमारे 75 कोटी वर्षांपासूनची आहे असं म्हटलं जातं. खाऱया पाण्यात बुडूनही तग धरणाऱया कांदळवनाच्या झुडुपाचं श्वसन कमी ऑक्सिजनवर चालतं आणि जास्त ‘श्वास’ घेण्यासाठी त्याची काही मुळं पाण्यावरच्या खोडावर लोंबकळत असतात. त्यांचे स्टील्ट, प्रॉप आणि बट्रेस असे प्रकार असतात. ही ‘श्वास-मुळं’ हे झुडुप ताजंतवानं ठेवतात. तिवराच्या मुळांची रचना तुम्हाला समुद्र किंवा खाडीकिनारी जाऊन आजही पाहता येते. थंडीच्या दिवसात या झुडुपांवर येणारे स्थलांतरित पक्षी किंवा ओसरत्या पावसात दिसणारे ‘काजवे’ पाहायला मुंबईसारख्या महानगरातले रहिवासी किती वेळा आवर्जुन जातात? ही निसर्गाची दौलत फुकट उपलब्ध असते. कधीतरी एक नजर तिकडेही जायला हवी इतपंच. तिवरं पिंवा कांदळवनाची वैशिष्टय़पूर्ण संरक्षक आणि किनारपट्टीची धूप रोखणारी, अनेक छोटय़ा मत्स्य जिवांचं ‘घर’ असलेली झुडुपं, पृथ्वीवर विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 8 अक्षांशापर्यंत सर्रास, दाट स्वरूपात आढळतात. पण महाराष्ट्राच्या साडेसातशे किलोमीटरच्या सागरकिनारी ती 22 अक्षांशापर्यंतही दिसतात. 2010 मध्ये जगात कांदळवनाने सुमारे 137,600 चौरस किलोमीटर किनारा व्यापला होता. 2022 पर्यंत त्यातलं 3300 चौरस किलोमीटर कांदळवन नष्ट झालं. हे असंच होत राहिलं तर पर्यावरणाचा ऱहास होईल. जैविक चक्रात बाधा उत्पन्न होईल आणि मुख्य म्हणजे जर कधी त्सुनामी उसळलीच तर त्या महाकाय सागरी लाटांना नैसर्गिकरीत्या थोपवणारी भिंतच नसेल. ती ‘जाईल’ याची व्यवस्था करून दगडविटांची भिंत बांधावी लागणं हे चित्र विचित्र आहे. देशात सुमारे 1 कोटी 15 हजार, तर महाराष्ट्रात 76 हजार एकरांवर तिवरं किंवा कांदळवनं असल्याचा अंदाज आहे. ही वनश्री म्हणजे सागरी प्रकोपाचा धोका कमी करणारी नैसर्गिक शक्ती आहे. मात्र ती जतन करावी असं जगाला वाटलं तर!