लेख : मराठीचे मराठीपण आणि मानसन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वामन भोसले

मराठी भाषा दिनाचा उत्सव साजरा करताना मराठीचे मराठीपण, मान-सन्मान, भाषेचा विकास जपण्यासाठी मराठी भाषा दिन फक्त एक दिवस साजरा होऊ नये. किंबहुना मराठीचा मान रोजच कसा राखला जाईल हे पहायला हवे. म्हणजे मराठी भरजरी शालू नेसून उभी राहील.

महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन आज 59 वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणसाची, मराठी भाषेची सद्यस्थिती काय आहे याचा विचार केल्यावर जाणवते की, मुंबईसह महाराष्ट्रात इंग्रजी आणि हिंदी भाषेचे मराठी भाषेवरील आक्रमण वाढतच चालले आहे. इंग्रजी व हिंदीचा दुस्वास नको, परंतु मराठीला मोकळा श्वास घेऊ द्या असे मराठी माणसाला वाटते. मुंबईत परप्रांतीयांचा टक्का वाढलेला असून मराठी भाषिकांचा टक्का कमी कमी होत चाललाय. त्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक पावले उचलेल यासाठी न थांबता मराठी माणसाने एकत्रित राहून संघटितपणे मराठी टक्का वाढवला पाहिजे.

मराठी भाषेचे हे चित्र सरकार बदलेल यावर मराठी माणसाने अवलंबून न राहता आपल्या मातृभाषेची वाढ होण्यासाठी मराठी माणसांनीच पुढाकार घ्यायला हवा. मराठी माणसाने मंत्रालय, महानगरपालिका, नगर परिषद, सर्व स्तरावरील न्यायालये आदी सरकारी कामकाजात शंभर टक्के मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरावा. इंग्रजी परिपत्रकाच्या धेडगुजरी मराठी अनुवादाचे परिपत्रक स्वीकारू नये. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ मराठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांशी आणि अमराठी कर्मचाऱ्यांशीसुद्धा मराठीतूनच संवाद साधावा. मराठीतूनच सर्व पत्रव्यवहार करावेत. भेटकार्ड, एसएमएस, मेल, व्हॉटस्ऍप आदी मराठीतूनच असावेत. बँकांचे व्यवहार मराठीतूनच करावेत. काही जणांना म्हणजेच आजच्या मराठी तरुणांना हे जड जाईल; परंतु हळूहळू सवय होईल. मराठी माणसाने एकमेकांशी बोलताना मराठीतूनच संवाद साधावा. भेटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणून स्वागत करावे. आपल्या आस्थापनांत, बँकांत सरकारी-निमसरकारी आस्थापनांत त्रिसूत्री भाषासूत्राच्या अंमलबजावणीसाठी दक्ष असावे. मराठी माध्यमाच्या शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देऊ नयेत. त्यासाठी अतिरिक्त निधी राखण्यासाठी भाग पाडावे. देशातील विविध राज्यांनी खासकरून दक्षिणेकडील राज्यांनी त्यांच्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी, भाषा संस्कृतीचा ठेवा जपून ठेवण्यासाठी त्या त्या राज्यात ‘भाषा भवन’ उभारले आहे. मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी रंगभवन धोबी तलावजवळील जागाही निश्चित केली गेली, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आता जागा बदलली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी विद्यमान सरकार पावले उचलत आहे. गेली दहा वर्षे मराठी भाषा भवन कुठे उभारायचे यात वाया गेली. भाषा भवनासाठी आणखी किती काळ वाट पाहायची?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ शके 1212 मध्ये नेवासीक्षेत्री पूर्ण केला, परंतु अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळाला नाही. आजपर्यंत तामीळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगू व मल्याळम (2013) आणि ओरिसा (2014) अशा एकूण सहा हिंदुस्थानी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सरकारने अभिजात भाषेच्या दर्जासाठी लागणारे सर्व निकष पुराव्यांसह सादर केले आहेत, परंतु केंद्र सरकारने नेहमी नकाराचे तुणतुणे वाजवले. शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून निवेदन दिले, पाठपुरावा केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिवसेना आग्रही आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असे जरी सांगितले असले तरी मराठी खासदारांनी एकत्रित येऊन अभिजात दर्जा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवावा. कारण 2012 साली केंद्र सरकारने मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास नकार दिला होता. त्या वेळी केंद्रात आणि केरळात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत होते. केरळाचे काँग्रेस नेते वायलर रवी, मणी आदींनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन मल्याळम भाषा अभिजात कशी हे पटवून दिले. त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि 2013 साली मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. दक्षिणेतील पाचही द्राविडी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. राज्य सरकार, मराठी लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील मराठी भाषाप्रेमींनी एक चळवळ उभारून मे महिन्यात येणाऱ्या नव्या सरकारवर दबाव निर्माण केला तर मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याशिवाय केंद्र सरकारला गत्यंतर उरणार नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे सर्व निकष, पुरावे सादर केल्यानंतरही जर अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नसेल तर मराठी हिसका दाखवावा लागेल. तशी तयारी मराठी भाषिकांनी ठेवावी. किमान दोन हजार वर्षांपासून ही मराठी मुलखाची लोकभाषा आहे. म्हणून ती अभिजातच आहे.

मराठी भाषा दिनाचा उत्सव साजरा करताना मराठीचे मराठीपण, मान-सन्मान, भाषेचा विकास जपण्यासाठी मराठी भाषा दिन फक्त एक दिवस साजरा न करता 365 दिवस साजरा करावा. म्हणजे मराठी भरजरी शालू नेसून उभी राहील, मराठी भाषेचा जयजयकार सर्वत्र होईल.