
>> सुनील कुवरे
महाराष्ट्र सरकार एकीकडे कोरोनाशी, दुसरीकडे निसर्ग, तौकते चक्रीवादळाशी सामना करीत असताना, कधी गारपीट, तर कधी ढगफुटी होत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात यंदा दोनदा महापूर आला. राज्य सरकार या सर्व संकटांशी सामना करीत असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी भागांना ’गुलाब’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. नेहमीच दुष्काळी भाग असणाऱया मराठवाडा, विदर्भात आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. जुलै महिन्यात रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिह्यात झाले, तेच मराठवाडय़ात झाले. मराठवाडय़ातील 446 महसूल मंडळांपैकी 361 मंडळांत अतिवृष्टी झाली, तर मराठवाडय़ातील 11 पैकी 10 मोठय़ा प्रकल्पांतून सुमारे 2 लाख 65 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याने मराठवाडा, विदर्भातील नद्या, नाले भरून पूर आले. मनुष्यहानी झाली. दुभती जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली. रस्ते, पूल वाहून गेल्याने संपर्क यंत्रणा ठप्प झाली. शेतकऱयांचे होत्याचे नव्हते झाले. सध्या शेतकरी मोठय़ा संकटात आहे. या संकटाचे वर्णन करायला ‘उद्ध्वस्त’ हा शब्द कमी पडावा अशी परिस्थिती निर्माण आहे. ग्रामीण भागातील शेतकरी किती मोठय़ा संकटाचा सामना करत आहे! कारण त्याचे जीवनच खरीप पिकांवर असते हे लक्षात घेतले पाहिजे.
अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱयांचे तसेच पशुपालन, लहान व्यावसायिक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 25 लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतशिवारात शिरल्यामुळे जमिनी वाहून गेल्या. मूग, कापूस,मका, सोयाबीनचा पिके आडवी झाली.35 लाखांच्या वर शेतकरी बाधित झाले.अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर कोसळले.यंदा विविध ठिकाणची धरणे भरली.पावसाने शेतकऱयांची पाण्याची तहान भागवली, पण तोंडचा घास हिरावून घेतला. मराठवाडय़ात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र राज्यावर गेली दोन-तीन वर्षे नैसर्गिक संकटे येत आहेत. ही संकटे अभूतपूर्व अशी आहेत. कधी चक्रीवादळ तर कधी गारपीट, ढगफुटी, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांतून महाराष्ट्र जात आहे. या नैसर्गिक संकटांमुळे महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य काही वर्षे मागे गेले. याला कारण अलीकडे पावसाचा लहरीपणा वाढलाय. एकूणच निसर्गाची लहर बदलत चालली आहे, परंतु नैसर्गिक बदलाला आपण थांबवू शकत नाही. बदलते हवामान, वाढते तापमान याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करीत आहोत. त्यामुळे आपत्तीला आमंत्रण मिळते,
बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन वित्तहानी होते, परंतु त्याचा परिणाम फक्त शेती किंवा शेतकऱयांवर होत नाही, तर एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होतो. तेव्हा याबाबतीत अभ्यास करून नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. ही गरज आज ओळखली नाही, तर भविष्यात परिणाम भोगावे लागतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘‘धीर सोडू नका. तुम्हाला संकटातून बाहेर काढू’’ असा शब्द देऊन संबंधित अधिकाऱयांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाले तरी आपद्ग्रस्तांना संकटाच्या वेळी केली जाणारी मदत वेळेवर मिळत नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तसेच शेतकऱयांसाठी पीक विमा योजना आहे, परंतु त्याचा लाभ खरोखर किती मिळतो हे सरकारने तपासून पाहावे. महाविकास आघाडी सरकार संवेदनशील आहे. त्यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱयांना तत्काळ मदतीची अपेक्षा आहे, परंतु नुकसानीची व्याप्ती लक्षात घेऊन कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकदिलाने शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे यायला हवे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत,
अतिवृष्टीने सर्वांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.तेव्हा राज्य सरकारने पंचनामे करण्याऐवजी मदत करायला हवी. केंद्र सरकारनेसुद्धा तातडीने मदत करायला हवी. कारण कोकण, प. महाराष्ट्रानंतर मराठवाडा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. अशा दुहेरी संकटातून शेतकऱयांना वाचविण्यासाठी मदतीची गरज आहे. आजवरच्या अस्मानी संकटांच्या मालिकेतील हे संकट आहे. तसेच विरोधी पक्षांनी केंद्राकडून शेतकऱयांच्या मदतीसाठी प्रयत्न करावेत.































































