आभाळमाया – मंगळ-दर्शन!

>> दिलीप जोशी

आपल्या सूर्यमालेतील आपल्या पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. त्यामुळे ते कधी सूर्याजवळ जातात तर कधी त्यापासून दूर. या जवळिकीच्या आणि दूरस्थ असण्याच्या अंतराचं गणित सूर्यमाला आज आहे तशी स्थिरावली त्याच वेळी निश्चित झालेलं आहे. आपल्या पृथ्वीचे उदाहरण घेतले तर ती उपसूर्य म्हणजे सूर्यापासून जवळच्या कक्षेत असते तेव्हा सूर्य-पृथ्वी अंतर 14 कोटी 71 लाख किलोमीटर असतं. मात्र लंबवर्तुळाकार कक्षेमुळे पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजे अपसूर्य स्थानावर पोचते तेव्हा हे अंतर 15 कोटी 21 लाख किलोमीटर एवढे भरतं. खगोलशास्त्र्ााच्या सूर्य-पृथ्वी सरासरी अंतर हे खगोलीय एकक किंवा एक ‘ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट’ (एयू) म्हणून वापरलं जातं. ते सुमारे 15 कोटी (14 कोटी 96 लाख) किलोमीटर आहे.

आपला एकमेव चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेतच फिरतो. त्याचं पृथ्वीपासूनचं सरासरी अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर असलं तरी तो पृथ्वीपासून जवळ असताना 3 लाख 63 हजार किलोमीटर तर दूर असताना 4 लाख 500 किलोमीटर एवढय़ा अंतरावर जातो. तो जवळ आला की 42 हजार किलोमीटरनी अंतर कमी झाल्याने ‘सुपर मून’ दिसतो. एकाच इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की दुसऱया पौर्णिमेचा चंद्र ‘ब्लू मून’ समजण्याची पाश्चात्य प्रथा आहे. आपल्याकडे तसं काही नाही.

हे जरा विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे सध्या आकाशात संध्याकाळच्या वेळी तीन ग्रह अगदी ठळकपणे दिसतायत. साधारण सायंकाळी सातनंतर अगदी डोक्यावर मकर राशीच्या पार्श्वभूमीवर चमकणारा गुरू ग्रह आणि त्याच्या जवळच शनी ग्रहाचं दर्शन घडतं. त्याचबरोबर आता सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिज सहज दिसत असेल तर लाल रंगाचा आपला बाहय़ शेजारी मंगळ चमकताना दिसेल तर पहाटेच्या आकाशात पूर्वेलाच आंतरग्रह असलेला गुरू तेजस्वी रूपात दिसेल.

पावसाचा मोसम संपत आलाय. अधेमधे येणारी वादळं आणि देशाच्या पूर्व किनाऱयावरील बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे हाहाकारी पाऊस घेऊन येतायत. हा लेख लिहीत असताना पुन्हा एकदा हैदराबादपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने थैमान घातल्याचं वृत्त आहे. त्याचा परिणाम सर्वत्र होतो. आकाश थोडंसं ढगाळ असलं तरी ग्रह अस्पष्ट दिसतात किंवा दिसतच नाहीत. आज सूर्यास्तानंतर लगेच मंगळ किंवा इतर ग्रह नाही पाहता आले तरी पाऊस (बहुदा) आठवडाभरात निरोप घेईल आणि मग स्वच्छ निरभ्र आकाशात हे ग्रह नुसत्या डोळय़ांनीही छान दिसतील. दुर्बिण लावून गर्दी करण्याचा हा काळ नाही. त्यामुळे एकटय़ानेच ते पाहणे इष्ट.

तर मंगळ पृथ्वीच्या खूप जवळ आला आहे ही सध्याची महत्त्वाची अवकाशस्थ घटना. ही रात्रभर आकाशात दिसणार आहे. मंगळ आता सूर्यापासून जवळ म्हणजे उपसूर्य स्थानी आहे. त्याच वेळी पृथ्वी सूर्य आणि मंगळ यांच्यामध्ये मंगळाच्या जवळच असल्याने ही मंगळाची सूर्याशी प्रतियुती (फेवरेबल ऑपॉझिशन) असून तो आपल्याला अगदी ठळक दिसतोय.

या कथा गणितात मंगळ सूर्यापासून सरासरी 22 कोटी 79 लाख किलोमीटर अंतरावर असला तरी दूर गेला की 24 कोटी 492 किलोमीटर एवढय़ा अंतरावर जातो आणि सूर्याजवळ असताना त्याचे अंतर 20 कोटी किलोमीटर असते. साहजिकच पृथ्वीपासून सुमारे 7 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला मंगळ सुमारे 1 कोटी 40 लाख किलोमीटरनी जवळ येतो. तेव्हा तो आपल्यापासून 5 कोटी 60 लाख किलोमीटरवर असतो. ही गोष्ट तो ‘मोस्ट फेवरेबल ऑलॉझिशन’ म्हणजे उत्तम प्रतियुतीच्या ठिकाणी असताना होते. मंगळ पृथ्वीजवळ येण्याचा काळ साधारण 22 महिन्यांनी (780 दिवसांनी) येतोच. सध्या तो त्यातल्या त्यात बराच जवळ असल्याने छान दिसतोय.

मात्र 2003मध्ये आम्ही ‘मोस्ट फेवरेबल’ स्थितीत असलेल्या मंगळाचं दर्शन दुर्बिणीतून घेतलं होतं. 28 ऑगस्टला पावसाचे दिवस असले तरी सरत्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने मुंबईजवळच्या वांगणी येथून आम्हाला दुर्बिणीतून मंगळाचं मनोहारी दर्शन घेता आलं. मंगळाच्या ध्रुव प्रदेशात असलेल्या ब्रीजलेल्या कार्बच्या बर्फाळ शुभ्र टोप्याही ‘कॅप’ दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होत्या. आता मंगळाची अशी ‘मोस्ट फेवरेबल’ ऑपॉझिशन किंवा प्रतियुतीची स्थिती यायला काही शतकांचा अवधी लागेल.

खगोलीय घटनांबाबतची जागृती आता होत असली तरी रोजच्या कामाच्या वेळा सांभाळून ठरावीक दिवशी प्रदूषित शहर सोडून दूर निरभ्र, अंधाऱया जागी जाता येतंच असं नाही. त्यातच एखादा अवकाळी पाऊस उल्कावर्षावही झाकोळून टाकतो. मंगळ मात्र आता बरेच दिवस दिसणार असल्याने रात्री दहानंतर खिडकीतून आकाश दिसलं तर दिसतो का पहा. आपण ‘वैश्विक’ असल्याचा आनंद तो देईल!

आपली प्रतिक्रिया द्या