
वैश्विक, [email protected]
मंगळ नावाचा शेजारी लाल ग्रह माणसाला अनेक वर्षे खुणावतो आहे. आता तर मंगळवाऱ्या करण्याचे मानवी मनसुबे प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसतायत. ‘नासा’सारख्या संस्था, इतरही काही देश मंगळाकडे झेपावण्याच्या तयारीत आहेत आणि अमेरिकेतील इलॉन मस्क या महत्त्वाकांक्षी उद्योजकाने ‘स्पेस’ ट्रव्हलमध्ये मंगळाचीही वर्णी लावली आहे. येत्या दशकात की पुढच्या दशकात ‘मंगळवारी’ होणार? एवढाच प्रश्न आहे.
सूर्यापासून सुमारे 22 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला मंगळ जवळपास पृथ्वीसारखाच आहे. त्यामुळेच कधीकाळी त्याच्या पृष्ठभागावर पाणी, जीवन होतं असं वारंवार म्हटलं जातं. पृथ्वी सोडून इतरत्र जयाचं तर मंगळ सर्वात जवळ आणि सोयीचा असल्याने शास्त्र्ाज्ञांपासून संभाव्य पर्यटकांपर्यंत सर्वांनाच तो आकर्षित करतो.
मंगळावर आतापर्यंत अनेक ‘रोव्हर’ पोहोचली. व्हायकिंग – 1 पासून ते ‘पाथफाइन्डर’सारख्या अनेक यानांनी 1976 पासून मंगळाच्या अंतरंगात डोकावण्याची सुरुवात केली. यामागचा उद्देश एकच. कोणे एकेकाळी मंगळावर सजीव होता का? तो आपल्या पृथ्वीवरच्या सजीवासारखा असेल तर त्याला जगण्यासाठी पोषक असं वातावरण तिथे होतं का? पृथ्वीवरचे प्राचीन जीवाष्म (फॉसिल्स) किंवा अतिप्राचीन पाषाणांची अवस्था आपल्याला पृथ्वीच्या जैविक इतिहासात डोकावण्याची संधी देतात. पृथ्वीवरच्या अतिप्राचीन पाषाणातील रासायनिक रचना दर्शवितात की, त्यावेळी पृथ्वीवर फारच कमी प्राणवायू (ऑक्सिजन) होता (पृथ्वीवरच्या साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या पाषाणाचे अवशेष दाखवणारी गिल्बर्ट टेकडी मुंबईतही आहे).
‘पाथफाइंडर’ रोव्हरने (सोजर्नर) तसेच ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉर्च्युनिटी’ रोव्हरनीसुद्धा मंगळपृष्ठावर अनेक किलोमीटर प्रवास केला. त्यानंतरच्या दहा-बारा वर्षांत तर मंगळाची आणखी कितीतरी माहिती आपल्या संग्रहात आली आहे. ‘व्हायकिंग’ यानाने पहिल्यांदा मंगळाभोवती फेऱ्या मारून त्याची जी छायाचित्रे घेतली त्यातूनच मंगळावर एकेकाळी पाणी असल्याचे समजले होते. जिथे सेडिमेन्टरी म्हणजे विविध थरांचे खडक सापडतात तिथे पाण्यात खनिजे जमा झालेली असतात. ‘ऑपॉर्च्युनिटी’ यानाला मंगळपृष्ठावर असे खडक आढळले.
वातावरणाच्या अभावामुळे कॉस्मिक किरणांनी मंगळाचा पृष्ठभाग भाजून काढला आणि तेथील एकेकाळचे पाणी नष्ट झाले. मात्र ‘ओडिसी’ यानाने केलेल्या पाहणीत असं आढळलं की, मंगळभूमीत काही ठिकाणी हायड्रोजन आहे आणि त्यामुळे पाणी असण्याची शक्यता अधिक. तसं असेल तर फार पूर्वी मंगळावर पाणी आणि त्यात वाढणारे सूक्ष्म जीवही असतील. मंगळपृष्ठाखाली जिथे खोलवर कॉस्मिक किरणांचा उपसर्ग झाला नसेल तिथे एकपेशीय किंवा तत्सम सूक्ष्म जीवही असतील. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं ‘जीवन’ निर्माण झालं तसं जरी मंगळावर झालं नसलं तरी तिथल्या जमिनीखाली एकेकाळी ‘सजीव’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘जीवसृष्टी’ म्हणावं एवढा पसारा एखाद्या ग्रहावर तयार होतो. त्याची सुरुवात अशा सूक्ष्म जीवांपासूनच होते. पृथ्वीवरही अशीच जैविक शृंखला विकसित होत गेली. मंगळपृष्ठाखालच्या ‘हायड्रोजन’ने तिथे सजीव जगवला असणार.
यावर आता अधिक संशोधन सुरू आहे. ते वेळोवेळी आपल्यापर्यंत येत राहील. मंगळ आता अतर्क्य ग्रह राहिलेला नाही. कालांतराने तिथे वसाहत करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांना कदाचित एच. जी. वेल्स यांची ‘लिटिल ग्रीन मेन’ ही गोष्ट आढळत असेल. ही विज्ञानकथा एकोणीसशे तीसच्या दशकामधली.
मंगळपृष्ठाखाली हिरव्या रंगाची अंगठय़ाएवढी ‘माणसं’ राहतात आणि ती केव्हातरी पृथ्वीवर हल्ला करतील अशी काहीशी कथावस्तू. ही कथा ज्यावेळी अमेरिकेत रेडिओवरून प्रसारित होत होती तेव्हा त्या कथानकाने भारावलेल्या अनेकांचा या बुटक्या ‘मंगळा’च्या अस्तित्वावर विश्वास बसला होता आणि ते आपल्यावर (पृथ्वीवर) चालून येतील याची भीती दाटली होती. नाही तरी अमेरिकन चित्रपटांमधूनही परग्रहवासी त्यांनाच धडक देतात असं कथानक असतं. शेवटी या काल्पनिक कथेने निर्माण झालेला ‘फोबिया’ ओसरला. आता मात्र मंगळपृष्ठाखाली फार पूर्वी खरेच (सूक्ष्म) सजीव असल्याचे संकेत मिळतायत. ते अर्थातच अत्यंत प्राथमिक अवस्थेतील होते. आता तसे काही मायक्रोब्स तिथे आहेत का हे पुढच्या संशोधनात समजेल. मंगळाबद्दलचे माणसाचे कुतूहल दिवसेंदिवस वाढतेय हेच खरे. मंगळावर जाऊ इच्छिणाऱ्या उत्साही जनांच्या संभाव्य आनंदावर विरजण घालणारी एक बातमी म्हणजे फार दिवसांचा अंतराळ प्रवास आणि मंगळ-निवास आपल्या (म्हणजे तिथे जाणाऱ्यांच्या) पचनसंस्थेवर आणि मेंदूवरही विपरीत परिणाम घडवू शकतो. ते नेमकं कसं याविषयी पुन्हा केव्हातरी. कारण अशा संभाव्य समस्यांचा अभ्यास करून त्यावर आधीच उपाय शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. कारण मंगळावर जाण्यासाठी आतापासूनच पर्यटकांची ‘रांग’ लागलीय!


























































