मंगळ जवळ येतोय!

2008

गेल्या आठवडय़ात आपण घरच्या घरी राहून रात्रीचं आकाश कसं न्याहाळता येईल त्याचा विचार केला. पण समजा तुमच्याकडे दुर्बिण नसली तरी नुसत्या डोळय़ांनी अवकाशातली बरीचशी दौलत दिसू शकते. तिथे काय काय आहे याची थोडीशी माहिती या ‘कोरोना’ने दिलेल्या सक्तीच्या सुट्टीच्या काळात घेतली तर तो कायमचा ज्ञानाचा आणि आनंदाचा ठेवा ठरेल. 

सध्या पश्चिम आकाशात सायंकाळी ठळकपणे दिसणारा शुक्र ठाह दुर्बिणीतून त्याच्या चंद्रासारखी ‘कोर’सुद्धा दाखवतो. शुक्राचं आणखी वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे तो सध्या पश्चिमेला उगवून पचिमेलाच मावळतोय, पण शुक्रावर गेलात तर तिथे सूर्यच पश्चिमेला उगवताना दिसेल. कारण शुक्र त्याच्या अक्षाशी जवळपास 178 अंशांच्या कोन करून स्वत:भोवती फिरतो. बरं तो स्वत:भोवती इतका हळू फिरतो की, त्याच्या एका वर्षापेक्षा त्याचा एक दिवस मोठा असतो. शुक्र सूर्याभोवती 224 दिवसांत (पृथ्वीच्या दिवसाच्या तुलनेत) फिरतो, पण त्याला स्वत:भोवती फिरायला मात्र 243 दिवस लागतात. आम्ही आमच्या ‘खगोल मंडळा’च्या कार्यक्रमात ही रंजक माहिती सांगून मुलांना म्हणतो की, शुक्रावर तुमचा वाढदिवस वर्षातून दोनदा येईल. मग टाळय़ा वाजल्यावर सांगावं लागतं की, वार्षिक परीक्षाही दोन वेळा द्यावी लागेल!

विज्ञान असं गंमत गोष्टींतून सांगितलं तर ते जनसामान्यांपर्यंत सहज पोहोचतं. पुढे त्यातूनच पीएच.डी. करणारे खगोल अभ्यासक तयार होतात, असा आमचा अनुभव आहे गेल्या पस्तीस वर्षांचा!

पृथ्वीचा एक शेजारी असलेल्या शुक्रावरून आकाशदर्शन किंवा खगोलीय निरीक्षण अजिबात शक्य नाही. कारण त्याच्यावर असलेलं कार्बन आणि नायट्रोजनच्या ढगांचं दाट आवरण. आपला दुसरा शेजारी असलेल्या मंगळाचं तसं नाही. तो साधारण पृथ्वीसारखाच आहे. तो स्वत:भोवती पृथ्वीसारखाच साडेचोवीस तासांत फिरतो. सूर्याभोवती फिरायला मात्र त्याला पृथ्वीच्या दुप्पट वेळ लागतो. याचं कारण म्हणजे त्याचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर साडेबावीस कोटी किलोमीटपेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ तो पृथ्वीपासून सरासरी 7 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. परंतु ही ठाहमंडळी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने कधी ठाह सूर्याच्या जवळ (उपसूर्य) तर कधी दूर (अपसूर्य) असतात.

ज्यावेळी पृथ्वी सूर्यापासून लांब आणि मंगळ सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो आपल्याला सर्वाधिक जवळ दिसतो. या लाल आणि ध्रुव प्रदेशात बर्फाच्या शुभ्र ‘कॅप’ असलेल्या ठाहाचं मनोहारी दर्शन त्यावेळी घडतं. काही वेळा मंगळ, सूर्याच्या जवळ आला तरी पृथ्वी त्यापासून लांब असते. त्यामुळे त्याचं जवळ येणं आपल्याला दुर्बिणीतून चांगलं दिसलं तरी ते ‘फेवरेबल’ नसतं. दर दोन वर्षांनी मंगळ सान्निध्याची संधी पृथ्वीवरच्या निरीक्षकाला लाभते.

28 ऑगस्ट 2003 च्या रात्री मंगळ पृथ्वीजवळ येण्याचा योग आला. तेव्हा आम्ही त्या त्याच्या तांबडय़ा चकतीचं आणि ध्रुवीय ‘टोप्यां’चं छान दर्शन घेतल्याचं आठवतं. आता मंगळ पुन्हा जवळ येऊ लागलाय. सध्या पहाटेच्या वेळी तो मकर राशीत दिसतोय. गुरू आणि शनीसुद्धा पहाटे तीन-चार वाजता ठळकपणे दिसतील. कधी जाग आली आणि पूर्वेच्या आकाशाचं दर्शन खिडकीतून होत असेल तर जरूर बघा. अन्यथा ही माहिती नंतर केव्हातरी नक्कीच उपयोग ठरेल.

मंगळ जवळ येतो तेव्हा आपल्यापासून पाच कोटी किलोमीटरवर असतो. सूर्यापासून त्याचं अंतर तेव्हा 20 कोटी किलोमीटर एवढं होतं. तो दूर असताना तेच अंतर जवळजवळ 25 कोटी किलोमीटरपर्यंत जातं. पृथ्वी व मंगळाच्या अंतरात दोन कोटी किलोमीटरची जवळीक निर्माण झाल्याने साहजिकच तो थोडा ‘मोठा’ दिसतो. खरं तर आकाराने खूप मोठा न दिसता त्याची स्पष्टता वाढते. त्यावरील घळी (कनाली) आणि धुवीय कॅप दुर्बिणीतून दिसतात. आतापासून हे लक्षात ठेवलंत तर ऑगस्टमध्ये कमी पावसाच्या रात्री, आकाशातले ढग पांगले तर ‘जवळचा’ मंगळ पाहण्याची मजा अनुभवा.

मंगळावर वस्ती करण्याची कल्पना आता केवळ कविकल्पना राहिली नसून एलॉन मस्कसारखे अमेरिकन उद्योजक तशा मोहिमा काढण्याच्या तयारीत आहेत. 2030 पर्यंत मंगळस्वारीची महत्त्वाकांक्षी लोकांची योजना आहे. ती प्रत्यक्षात येईल तो खगोल प्रवासातला, माणसाच्या इतिहासातला महत्त्वाचा क्षण असेल. पण तो प्रवासही मंगळाची दर दोन वर्षांनी पृथ्वीशी घडणारी गणिती जवळीक लक्षात घेऊनच करावा लागेल. अर्थात या संशोधकांना त्याची जाणीव आहेच. आपण फक्त आकाशीची चमचमती आरास पाहायची. त्यासंबंधीच्या कविता आठवायच्या आणि विज्ञानही मनात साठवायचं!

आपली प्रतिक्रिया द्या