पोलीस डायरी : असामान्य करकरे

462

>>  प्रभाकर पवार

महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे हे 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांकडून मारले गेले. त्याला आता एक दशक लोटून गेले आहे. तरीही आज त्यांच्या ‘इंटिग्रिटी’बद्दल राजकारणी शंका व्यक्त करीत आहेत याचे आश्चर्य वाटते. नागपूरचे हेमंत करकरे हे खरे तर मेकॅनिकल इंजिनीयर होते. 1975 साली मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये 1982 साली आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. अशा या अधिकार्‍यास मुंबईत उपायुक्त असल्यापासून मी ओळखत होतो. अत्यंत शांत व प्रामाणिक असलेल्या या अधिकार्‍याची जेव्हा ‘रॉ’ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमध्ये प्रतिनियुक्तीवर बदली झाली तेव्हापासून त्यांचा संपर्क तुटला. अमेरिकेत बसून जगभर फिरून, प्रसंगी वेशांतर करून करकरे यांनी 10 वर्षे गुप्तचर यंत्रणेचे काम केले आणि 2007 साली ते पुन्हा हिंदुस्थानात परतले. त्या वेळी डॉ. पी. एस. पसरिचा हे पोलीस महासंचालक होते. हेमंत करकरे हे मुंबईत परतले तेव्हा ‘आयजी’ होते तेव्हा ऍण्टीकरप्शन विभागात ‘आयजी’ची जागा रिकामी होती. रिकामी असलेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु दोन-तीन महिने लोटल्यानंतर त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागात सहपोलीस आयुक्त म्हणून गृह विभागाने नियुक्ती केली. दरम्यान, त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाली. 26 जानेवारी 2008 रोजी करकरे यांनी महाराष्ट्र अतिरेकी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. परंतु त्यानंतर त्यांचा पडता काळ सुरू झ्^ााला. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील भिकू चौक मशिदीच्या बाहेर बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात 6 मुस्लिम बांधव ठार झाले, तर 101 निरपराधी गंभीर जखमी झाले आणि करकरेंवर प्रचंड राजकीय दबाव आला.

या बॉम्बस्फोटप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मध्य प्रदेशची साध्वी प्रज्ञा चंद्रपाल सिंह (38), लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित (36), रिटायर्ड मेजर रमेशचंद्र उपाध्याय (64) यांच्यासह 12 हिंदूंना अटक केली व त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या सार्‍या आरोपींचा 29 सप्टेंबरच्या मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे एटीएसने त्यावेळी न्यायालयात सांगितले. मुंबईसह देशभरात इस्लामी अतिरेकी घडवत असलेल्या बॉम्बस्फोट मालिकांना उत्तर म्हणून आपण मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपींनी दिली असल्याचेही एटीएसने न्यायालयाला त्यावेळी सांगितले. मुंबईसह देशभरातील बॉम्बस्फोट मालिकेत यापूर्वी सुन्नी मुस्लिमांचाच मोठय़ा प्रमाणात सहभाग असायचा. परंतु हिदूंचा कधी सहभाग नव्हता. त्यामुळे भगवा दहशतवाद सुरू असल्याची हाकाटी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली. अगदी मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे व कुणालाही ‘स्पेअर’ करायचे नाही, असे आदेश एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना केंद्रातील राज्यकर्त्यांकडून देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तपासात हस्तक्षेप करून काही निरपराध्यांनाही ‘फ्रेम’ केले. त्याचा जास्त मनस्ताप हेमंत करकरे यांना झाला होता. ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते हे त्यांनी त्यांना भेटावयास गेलेल्या अनेकांना सांगितले होते. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कुणा आरोपीचा मानसिक किंवा शारीरिक छळ झाला असेल तर त्यात हेमंत करकरेसारख्या सूज्ञ अधिकार्‍याचा संबंध असेल असे वाटत नाही. राजकीय दबावामुळे कुणा खालच्या अधिकार्‍यांकडून अतिरेक झाला असेल तर त्याला हेमंत करकरे नक्कीच जबाबदार नाहीत, असेही बरेच ज्येष्ठ अधिकारी सांगतात; परंतु आज एक दशक लोटले तरी शहीद झालेल्या व अशोकचक्र प्राप्त अधिकार्‍यावर ठपका ठेवणे योग्य नाही.

ओबेराय, नरिमन हाऊस, सीएसटी आदी ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला असल्याचे कळताच करकरेंनी स्वतः बुलेटप्रुफ जॅकेट परिधान केले आणि अतिरेक्यांशी ‘सामना’ करण्यासाठी ते मैदानात उतरले. त्यात त्यांचा 26 नोव्हेंबर रोजी बळी गेला. त्यानंतर त्यांची पत्नी कविता गेल्या. सार्‍या कुटुंबाची वाताहत झाली. असे असताना आपले शाप भोवले असे कुणी म्हणणे आपल्या हिंदू संस्कृतीत बसत नाही. राज्यकर्ते सरकारी अधिकार्‍यांवर दबाव आणून हवा तसा तपास करून घेतात हे कालचे शेंबडे पोरही सांगेल. नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेली मुंब्य्राची इसरत शेख ‘इनोसंट’ होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने केला होता. तिच्या नावाने ऍम्ब्युलन्सही सुरू केली. त्यावर ‘शहीद इसरत शेख’ असेही त्या आमदाराने लिहिले होते. केंद्रीय गृहमंत्र्याने तर सीबीआय अधिकार्‍यांवर दबाव आणून इसरत शेख अतिरेकी नसल्याचे Affidavit तयार केले होते. त्यासाठी काही सीबीआय अधिकार्‍यांचाही मानसिक छळ केला होता. यूपीए सरकारचे हे कारनामे कुणीही विसरलेले नाही. हेमंत करकरेही त्याच Phase मधून जात असताना ते अतिरेक्यांकडून मारले गेले. त्यामुळे करकरे हे राज्यकर्त्यांच्या दबावाचे बळी आहेत. त्यांनीच त्यांचा मानसिक छळ केला होता. त्या टेन्शनमध्येच कसाबला कॉर्नर करायचा त्यांचा निर्णय फसला आणि त्यात ते नाहक मारले गेले. करकरे हे असामान्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर राजकारण्यांनी टीका-टिप्पणी करणे बंद केले पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास संपला आहे. दोषींविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. तरीही आज महाराष्ट्रातील एक निलंबित पोलीस निरीक्षक म्हणतो, ‘‘मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा एटीएसने केलेला तपास खोटा आहे’’, तर दुसरा रिटायर्ड आयपीएस अधिकारी म्हणतो, ‘‘हेमंत करकरेंना हिंदू संघटनांनी मारले…’’ आता बोला! म्हणजे Freedom of Speechच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही काहीही बरळावे! धन्य तो आपला देश! आणखी काय?

 

 

आपली प्रतिक्रिया द्या