लेख – आभासी जग – मेटाव्हर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अमित बागवे

मेटाव्हर्स हा आज जरी फार मोठय़ा प्रमाणात पसरला नसला तरी मेटाव्हर्स हे पुढच्या पिढय़ांचे भविष्य आहे. आज आपण जसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम व इतर मोबाईल ऍप्लिकेशन सातत्याने वापरत आहोत. खरे तर त्यातच हरवून गेलो आहोत. ते सर्व एका ठिकाणी असेल व वेळ, काळ आणि जागेच्या मर्यादेपलीकडे जाऊन माणसाच्या रोजच्या आयुष्याला स्पर्श करेल, कदाचित उद्ध्वस्त करेल. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू असते. जसा ज्याचा वापर तसा त्याचा परिणाम. मेटाव्हर्स उद्या काय घडवेल हे वेळ सांगेल.

सोप्या शब्दांत मेटाव्हर्स हे सामाजिक कनेक्शनवर केंद्रित 3D आभासी जगाचे नेटवर्क आहे आणि ते डिजिटल मीडियाच्या संकल्पनांसह ऑगमेंटेड रिऍलिटी, आभासी वास्तविकता आणि ब्लॉकचेन वापरणारे सिम्युलेटेड डिजिटल वातावरण म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. खऱया जगाची नक्कल करून एखादा वापरकर्ता परस्पर संवादासाठी जागा तयार करण्यासाठी याचा वापर करू शकतो. व्यापकपणे सांगायचे तर मेटाव्हर्सचा समावेश असलेल्या तंत्रज्ञानामध्ये व्हर्च्युअल रिऍलिटी अर्थात आभासी वास्तविकता समाविष्ट असते. या आभासी जगामध्ये तुम्ही सहभागी नसतानाही गोष्टी अस्तित्वात राहतात. तसेच ऑगमेंटेड रिऍलिटी आहे, जी डिजिटल आणि भौतिक जगाची वैशिष्टय़े एकत्र करते.

‘मेटाव्हर्स’ हा शब्द कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानाचा संदर्भ देत नाही, तर या वेगाने वाढणाऱया जगात तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कसे संपर्क आणि संवाद साधतो यामधील व्यापक बदल दर्शवतो. एका आभासी जगाची कल्पना करा, ज्यामध्ये लोक राहतात, काम करतात, खरेदी करतात आणि इतरांशी संवाद साधतात. हे सर्व भौतिक जगात त्यांच्या पलंगावर बसून अथवा झोपून अगदी आरामात. हे मेटाव्हर्स म्हणून ओळखले जाते. मेटाव्हर्स ही संकल्पना 1992 मध्ये चर्चेत आली. मेटाव्हर्स हा शब्द नील स्टीफन्सन यांनी 1992 मध्ये ‘स्नो क्रॅश’ या विज्ञानकथा कादंबरीत तयार केला होता. कोणत्याही डिजिटल जगात स्वतःला विसर्जित करण्यासाठी आणि कोणत्याही भौतिक वास्तवात, कोणत्याही वेळी सहभागी होण्याचे ठिकाण मेटाव्हर्स. आपण हजारो मैल दूर असलो तरीही काहीही पाहण्यास आणि अनुभवण्यास सक्षम असणे म्हणजे मेटाव्हर्स.

मेटाव्हर्समध्येही डिजिटल अर्थव्यवस्था वाढत आहे. या आभासी जगात एखादी व्यक्ती स्वतः वस्तू तयार करू शकते, खरेदी करू शकते आणि विकूही शकते. मेटाव्हर्स हे इंटरऑपरेबल आहे, जे तुम्हाला कपडय़ांसारख्या आभासी वस्तू एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱया प्लॅटफॉर्मवर नेण्याची परवानगी देते. भौतिक जगात, तुम्ही मॉलमधून शर्ट खरेदी करू शकता आणि नंतर तो चित्रपटगृहात घालू शकता. मेटाव्हर्स तुम्हाला व्यक्तिरेखा तयार करण्याची अनुमती देऊ शकते, जी तुम्ही सर्वत्र सहजतेने वापरू शकता तितक्याच सहजतेने तुम्ही तुमचे प्रोफाईल चित्र एका डिजिटल स्पेसमधून दुसऱया स्थानावर कॉपी करू शकता.

मेटाव्हर्सचा फायदा म्हणजे प्रदूषित हवेत लांबचा प्रवास न करता किंवा वेगवेगळ्या प्रसंगी कपडे न बदलता संवाद साधता येतो. मुले विविध विषयांचा आणि मॉडय़ूल्सचा त्यांच्या गतीने अभ्यास करू शकतील आणि त्यांची क्षितिजे पारंपरिक अभ्यासक्रमात सध्या शक्य नसलेल्या गोष्टींच्या पलीकडे वाढवू शकतील. भविष्यातील मेटाव्हर्स अनेक बाबींमध्ये आपल्या वास्तविक जगासारखे काहीतरी असेल आणि काही वास्तविक जगातील कामेदेखील मेटाव्हर्स बदलेल. त्यामुळे वापरकर्ते आणि निर्माते दोघांनाही खूप फायदा होतो आणि नॉन-फंजिबल टोकन्स (NFTs) खेळातील मालमत्तेमध्ये समाविष्ट केल्यास हे आणखी वाढू शकते, जेणेकरून आभासी अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण एक वास्तविकता बनू शकेल.

मेटा अर्थात फेसबुक कंपनीने पुढील वर्षभरात मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर 10 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे. मेटाव्हर्स नेव्हिगेट करण्यासाठी फेसबुकने आधीच त्याची लाखो Oculus VR हेडगियर युनिट्स विकली आहेत. बार्बाडोसने मेटाव्हर्समध्ये राजनयिक दूतावास उघडण्याची योजना आखली आहे. विशेषतः ऑनलाइन जग ‘डेसेंट्रलँड.मायक्रोसॉफ्ट’ आधीपासूनच व्यावसायिक सेवा फर्म असेंचरसोबत मेश-सक्षम इमर्सिव्ह स्पेस तयार करण्यासाठी काम करत आहे. असेंचर दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त लोकांना कामावर घेते आणि नवीन कर्मचाऱयांना कामावर घेण्यासाठी मेश वापरते. नायके कंपनीने व्हर्च्युअल स्नीकर्स आणि पोशाख तयार करण्यात आणि विकण्यात मदत करण्यासाठी सात ट्रेडमार्क अर्ज दाखल केले आहेत.

नॉनफंजिबल टोकन (NFTs) मेटाव्हर्सची उपयुक्तता आणि लोकप्रियता यामध्ये मोठी भूमिका बजावतात. NFTs क्रिप्टो करन्सीद्वारे वापरल्या जाणाऱया समान ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मालमत्तांचा एक सुरक्षित प्रकार आहे. चलनाऐवजी NFT कलाकृती, गाणे किंवा डिजिटल रिअल इस्टेटच्या स्वरूपात असू शकते. NFT मालकाला एक प्रकारचा मालकीचा पुरावा देतो, जो मेटाव्हर्समध्ये खरेदी किंवा विकला जाऊ शकतो. ज्यामुळे विविध चलनांच्या आदान प्रदानाची अडचण दूर होणार आहे.

मेटाव्हर्समध्ये आपला ‘होलोग्राम’ बनवला जातो म्हणजेच ‘आभासी अवतार’ बनवला जातो. हा अवतार बनवण्यासाठी व्यक्तीची 360 डिग्री स्कॅनिंग केली जाते. मेटाव्हर्समध्ये लोक स्वतःचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अवतार वापरतात. म्हणजेच आपण आज जसे दिसतो, त्याहून वेगळे दिसण्याची सोय मेटाव्हर्समध्ये आहे. रंग, उंची, लिंग, वय, शिक्षण व इतर सर्व मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्याला हवे तसे इतरांना दाखवू शकतो. मेटाव्हर्समध्ये सध्या स्पर्श अनुभवण्याचीसुद्धा सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे काही लैंगिक अत्याचाराच्या घटनासुद्धा नोंदल्या गेल्या आहेत.
मेटाव्हर्सचा सर्वात मोठा धोका यामुळे निर्माण होतो की, आपण जसे हवे तसे इतरांना दाखवू शकतो. आज रोजचे आयुष्य जगताना प्रत्येकाला अनेक अडचणींना, त्रासांना, आजारांना सामोरे जावे लागते. बऱयाचदा आत्ममग्नता, समाजातील रूढींबद्दल राग, व्यक्तींबद्दल आकस किंवा गैरसमज यामुळे माणूस रोजच्या जगण्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी जर मेटाव्हर्सच्या आहारी ती व्यक्ती गेली तर अशी भीती निर्माण होते की, मेटाव्हर्समध्ये मिळणाऱया आनंदामुळे ती व्यक्ती खऱया आयुष्यापासून दूर जाईल व मेटाव्हर्समध्येच पूर्णपणे रमून जाईल.

धर्म, जात, रंग, उंची, लिंग, वय, शिक्षण, गरीब – श्रीमंत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकत्र येऊन जगणे ही खरे तर काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाची निर्मिती त्याचसाठी केली जाते, परंतु खऱया आयुष्यात आपण ही दरी रुंदावत आहोत आणि आभासी जगात ही दरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे दुर्दैवी आहे. जितक्या लवकर आपल्याला या सर्वांची जाणीव होईल तितके चांगले. सुज्ञास सांगणे न लगे !

(लेखक ‘अर्थसंकेत’ या संस्थेचे संस्थापक आहेत व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.)