आभाळमाया – चांदो‘बाबा’!

>> वैश्विक, [email protected]

आपल्या पृथ्वीपासून तीन लाख चौऱयाऐंशी हजार किलोमीटर एवढं सरासरी अंतर असलेला चंद्र कधीकाळी पृथ्वीपासूनच निर्माण झाला असं जगातल्या अनेकांचं भाकीत होतं. आपल्याकडच्या नवग्रह स्तोत्रात त्याला ‘क्षीरसागरातून निर्माण झालेला’ असं म्हटलंय आणि मंगळही भूमीपासून उत्पन्न झाल्यामुळे ‘भौम’ ठरला आहे. या कल्पना त्या त्या काळापर्यंत ठीकच होत्या, पण वैज्ञानिक विचार स्थितीशील नव्हे, तर गतिशील असतो. सातत्याने चिकित्सा करत नित्यनवे शोध लावत जातो. त्यातूनच विश्वाचं (आताचं) वय ठरवलं गेलं, सूर्याच्या अंतर्भागाचा पत्ता लागला, ग्रहमालेची उत्पत्ती समजली… आणि चंद्राचा जन्मही लक्षात आला.

असं म्हणतात की, पृथ्वी सुमारे चाडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. त्या वेळी एक थिया नावाचा प्रतारा (प्रोटोस्टार) आपल्या ग्रहाला धडकला. त्यातून जे द्रव्य फेकलं गेलं ते चंद्राच्या रूपात पृथ्वीभोवती फिरू लागलं. चंद्र पृथ्वीपासून आणखी काही कोटी किलोमीटर लांब असता तर कदाचित तो सूर्याभोवती फिरणारा निराळा स्वतंत्र ग्रह झाला असता, परंतु चंद्र आणि पृथ्वीचं गुरुत्वीय केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागात 1100 किलोमीटर खोलवर असल्याने चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी चंद्रासकट सूर्याभोवती फिरते, पण एक वैज्ञानिक कोडं (पझल) आम्ही आमच्या खगोल विद्यार्थ्यांसमोर ठेवतो ते असं… ‘समजा, पृथ्वी अचानक गुप्त झाली तर चंद्राचं काय होईल?’ उत्तर असं की, चंद्र आपली कक्षा थोडी बदलून सूर्याभोवती फिरतच राहील! कारण मुळात सर्व ग्रहांसकट ग्रहमालेतल्या सर्व लहानमोठय़ा गोष्टी सूर्याभोवतीच फिरत आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. आता चंद्राच्या त्या तुकडय़ाविषयी. ऑरिझोना (अमेरिका) विद्यापीठातील संशोधकांना कामो ओलेवा नावाचा एक अशनी सापडला तो 2016 मध्ये. त्याच्या वर्णपटाचं निरीक्षण करताना त्याचा जनक आपला चंद्र असावा असा निष्कर्ष निघालाय. म्हणजे चांदोबा ‘चांदोबाबा’ही आहे तर! आणि तो अशनी पिंवा एखाद्या मोठय़ा चाकाच्या आकाराचा ‘कामो’ चांदोमामाचा मुलगा म्हणजे बालकांचा मामेभाऊ ठरतो. आपल्या बालकथा नि कवितांमधून गंमत जंमत करत विज्ञान रुजवायला हवं. अचाट कल्पनारम्यतेबरोबरच (फॅन्टॅसीसह) वैज्ञानिक सत्यही सहज समजावून सांगता येईल अशी काही खगोल बालगीतं लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. ‘कामो ओलेवा’ या हवाई भाषेतील शब्दाचा अर्थ आहे हिंदोळा घेणारा तुकडा! हवाई बेटावरच्या पॅनॉरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम म्हणजे पॅनस्टार्स या हॅलेपॅला येथील दुर्बिणीद्वारे हा ‘चांद का टुकडा’ दिसून आला. त्याच्या विचित्र (अनियमित) भ्रमणकक्षेमुळे त्याच्याकडे अभ्यासकांचं विशेष लक्ष गेलं आणि चंद्राच्या या पिल्लाची माहिती समोर आली.

पृथ्वीवरून आणि पृथ्वीबाहेरूनही दृश्य प्रकाशाच्या तसंच एक्स-रे, गॅमा-रे दुर्बिणीद्वारे आपल्या विश्वाची एवढी माहिती मिळतेय की, त्याचा अभ्यास करता करता आणखी काही आगळंवेगळं ध्यानात येतंय. विज्ञानातल्या या संशोधनाकडे आणि भौतिकशास्त्र्ााकडे जरा निराळय़ा दृष्टीने पाहिलं तर त्यातही ‘काव्य’ आढळेल. विराट विश्वाची निर्मिती, त्यातलं आपलं ‘अणुरेणीया’ सूक्ष्म असं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाला विराटाचं आकलन होण्याची क्षमता यात काव्य नाही असं कसं म्हणावं? त्यातली सायन्टिफिक – पोएटिक मूल्यं साएम्पोटिक व्हॅल्यू कदाचित शोधता आली तर विज्ञान रंजक होईल.