आभाळमाया – सूर्यमालेतील चंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा. आपल्या देशात सर्वत्र चांद्रमासावर आधारित कॅलेंडर वापरले जाते. काही ठिकाणी अमावास्येनंतर नवा महिना सुरू होतो, तर काही ठिकाणी पौर्णिमेनंतर, पण कालगणना चंद्राच्या कलांवरच आधारित. संक्रांत वगळता आपले सर्व सणसुद्धा चंद्रकलेशीच निगडित असतात. या महिन्यातली शुक्ल चतुर्थी म्हणजे गणपती उत्सवाचा आरंभ. आजची चंद्रकोर संध्याकाळी पश्चिमेला अतिशय बारीक आणि ढगाळ हवामान असेल तर दिसणार नाही. उद्याची द्वितीया किंवा बीजेची कोर पाहता आली तर ती अत्यंत रेखीव दिसेल.

अशा अनेक तिथींच्या महत्त्वातून चंद्र आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असा ‘चांदोबा’ आहे. भरती-ओहोटी आणि चंद्राचं नातं याबद्दल या स्तंभातून आपण पूर्वीच माहिती घेतली आहे. आपल्या पृथ्वीच्या अगदी जवळ असलेला चंद्र खगोलीय दृष्टीने फारच महत्त्वाचा. त्याचा आकार, पृथ्वीपासूनचं त्याचं आणि सूर्याचं अंतर या गोष्टी ‘खग्रास’ सूर्यग्रहण कशा घडवतात हे जाणून घेणं विस्मयकारी आणि ज्ञानवर्धक आहे.

आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे. तसे चंद्र आपल्या सूर्यमालेमधल्या इतर ग्रहांनाही आहेत. मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून यांना अनेक चंद्र आहेत, तर पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या आतल्या कक्षेत असणाऱया बुध आणि शुक्र या ग्रहांना चंद्र किंवा नैसर्गिक उपग्रह नाहीत.

आपलं उद्याच्या वसाहतीचं लक्ष्य असलेल्या मंगळाला फोबो किंवा डिमो असे दोन चंद्र आहेत. मात्र ते खूपच लहान असल्याने मंगळावरून सूर्याचं खग्रास ग्रहण कधीच दिसणार नाही. फोबो म्हणजे भीती आणि डिमो म्हणजे धास्ती अशी ही ग्रीक नावं. अर्थात त्यांची भीती वाटावी असं प्रत्यक्षात काहीच नाही. यापैकी फोबोचा व्यास अवघा 22 किलोमीटर आहे, तर डिमोचा त्याहूनही कमी म्हणजे 12 किलोमीटर इतकाच भरेल. फोबो मंगळाच्या जवळच्या कक्षेतून फिरतो. त्याला मंगळाभोवती फेरी मारायला साडेसात तास लागतात. डिमो लांबून फिरत असल्याने त्याला मंगळाभोवती फेरी पूर्ण करायला तीस तास लागतात. ‘फोबो’चं मंगळापासूनचं अंतर 9377 किलोमीटर आणि डिमोचं 23580 किलोमीटर आहे. आपला चंद्र आणि पृथ्वी यातलं सरासरी अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे.

मंगळाच्या चंद्रांचा वेध गॅलिलिओला घेता आला नाही. कारण ते आकाराने अगदीच नगण्य आहेत. या दोन्ही मंगळ चंद्राचा शोध तसा अलीकडे म्हणजे 1877 साली लागला. गेल्या 12 आणि 18 ऑगस्टला डिमो आणि फोबोचा अनुक्रमे शोध लागून 153 वर्षे झाली. ऍसॅफ हॉल या संशोधकाला निरीक्षणातून वॉशिंग्टनच्या नेव्हल ऑब्झर्वेटरीमधून दिसले. हॉल यांनी त्यावेळी अशी नोंद केली की, ‘‘11 ऑगस्टच्या रात्री मला मंगळाचा डिमो ‘चंद्र’ दिसला, पण लगेच गायब झाला. नंतर 12 तारखेला पुन्हा दिसला.’’ अशा सातत्यपूर्ण निरीक्षणातून मंगळाच्या या उपग्रहांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. मंगळ आपल्या खूप जवळचा शेजारी. तेव्हा त्याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती हवीच. मंगळापलीकडचा विशालदेही ग्रह गुरू! त्याच्यावरील वादळाचा मागोवा गेल्याच अंकात घेतला. या गुरूला तब्बल 79 ‘चंद्र’ आहेत. त्यातले आयो, युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमिड हे चार मोठे चंद्र गॅलिलिओच्या पहिल्यावहिल्या दुर्बिणीतूनही दिसले होते. उरलेले 75 त्या मानाने नगण्यच असले तरी गुरूभोवती त्यांचे स्वतंत्र भ्रमण सुरूच असते. ‘गुरू’ची ही चंद्रावळ ‘ज्युपिटर फॅमिली’ म्हणून ओळखली जाते. यात उल्लेखलेले मोठे चंद्र आपणही दुर्बिणीतून पाहू शकतो. या चंद्राबाबतची विशेष गोष्ट म्हणजे, सायमन मेरियस या संशोधकाला गॅलिलिओच्या निरीक्षणानंतर दुसऱयाच दिवशी गुरूचे चार चंद्र दिसले होते, परंतु 1614 पर्यंत त्याने त्याबद्दल सांगितले नाही. मात्र त्याने दिलेली या चंद्रांची नावे नंतर सर्वमान्य झाली. त्यानंतर 1904 पासून 2015 पर्यंत गुरूचे चंद्र वाढत वाढत (म्हणजे निरीक्षणातून सापडत) संख्या 79वर पोचली. यापैकी युरोपाचं जवळून दर्शन मानवी अंतराळयानाला 1970च्या दशकात झालं. आपल्या चंद्रापेक्षा थोडासाच लहान असलेल्या युरोपावर लोह-निकेलचा साठा आणि बर्फ आहे. त्यामुळे मंगळानंतरचं वस्तीस्थान ‘युरोपा’ असू शकतं. मात्र गुरूचा ‘गॅनिमिड’ हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ‘चंद्र’ आहे. गुरूपलीकडचा ग्रह आहे तो कडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला शनी. शनीला 82 चंद्र आहेत. त्यापैकी टायटन हा शनीचा चंद्र तर बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. 82 पैकी 13 चंद्रांचा व्यास 50 किलोमीटरपेक्षा जास्त असून बाकीचे खूपच लहान आहेत. आकाराच्या बाबतीत ‘टायटन’चा क्रमांक गॅनिमिडनंतर दुसरा लागतो. व्हॉयेजरपासून कॅसिनीपर्यंत अनेक अंतराळयानांनी शनीच्या अनेक चंद्रांचं जवळून निरीक्षण केलंय. विल्यम हर्शल याने 1889 मध्ये शोधलेला शनीचा एक चंद्र ‘एन्सेलेडस’ हासुद्धा आपल्या ग्रहमालेतला पुढचा वसाहतयोग्य टप्पा असू शकतो. तो आकाराने सहाव्या क्रमांकावर असला तरी त्याचा व्यास 500 किलोमीटर असून त्यावर स्वच्छ बर्फाचा थर आढळतो. शनीपलीकडच्या युरेनसला 27 चंद्र. त्यापैकी 13 मोठे आहेत. नंतरच्या नेपच्यूनला 14 चंद्र असून त्यातील ट्रायटन सर्वात मोठा असून तो पूर्वी खुजा ग्रह होता व नंतर नेपच्यूनच्या तावडीत सापडला असं म्हटलं जातं. शेवटचा प्लुटोच आता ‘खुजा’ ग्रह ठरला असून त्याचा उपग्रह असलेला शेरॉन ही अशा दोन खुजा ग्रहांची जोडगोळी आहे. शेवटी पृथ्वीचाच चंद्र केवळ अजोड आहे हे निश्चित!