
>> डॉ. स्ट्रेंज
डब्ल्यू. एस. अँडरसनचा ‘एलियन व्हर्सेस प्रिडेटर’ हा लोकांना गुंगवणारा, थक्क करणारा असा चित्रपट! एलियन आणि प्रिडेटर अशा मानवाने यापूर्वी कधी कल्पनेतदेखील विचार न केलेल्या प्राण्यांच्या दोन जातींची आणि त्यांच्यातील शत्रुत्वाची ही कथा आहे. सायफाय चित्रपटाच्या परग्रहवासी, परग्रहावरील प्राणी या विषयाला धरून असलेला हा चित्रपट वेगळ्या विश्वाच्या सफरीचा आनंद देतो.
परग्रहवासी किंवा परग्रहावरील विविध प्राणी हे सायफाय चित्रपटांचे अत्यंत आवडीचे विषय. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्राण्यांपेक्षा अत्यंत वेगळे दिसणारे, भव्य, उडू शकणारे, तोंडातून आगीच्या ज्वाळा, अॅसिड फेकू शकणारे, मानवे शरीर असणारे असे विविध प्राणी पडद्यावर साकारणे आणि लोकांना थक्क करणे हे अशा चित्रपटांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. 2004 साली आलेला जो पाल डब्ल्यू. एस. अँडरसनचा ‘एलियन व्हर्सेस प्रिडेटर’ हा असाच लोकांना गुंगवणारा, थक्क करणारा असा चित्रपट आहे. एलियन आणि प्रिडेटर अशा मानवाने यापूर्वी कधी कल्पनेतही विचार न केलेल्या प्राण्यांच्या दोन जातींची आणि त्यांच्यातील शत्रुत्वाची ही कथा आहे.
धनवान उद्योगपती चार्ल्स वेयलँडच्या कंपनीचा एक उपग्रह अवकाशातून अंटार्क्टिकाच्या एका भागाचे थर्मल स्कॅनिंग करत असताना बर्फाच्या 2000 फूट खाली गाडले गेलेले एक पिरॅमिड दृष्टीस पडते. आता चार्ल्स ताबडतोब या पिरॅमिडच्या तपासणीसाठी विशेषज्ञांची एक टीम तयार करतो. या टीममध्ये गिर्यारोहक आणि अंटार्क्टिकाची माहिती असलेली आणि गाइडचेही काम करणारी आलेक्सा, पुरातत्व संशोधक सेबेस्टियन, इतर काही शास्त्रज्ञ आणि खासगी सैनिकांचा समावेश असतो. हे सर्व चालू असताना दुसरीकडे आपल्याला अवकाशात एक अंतराळयान दाखवले जाते. या यानातून एक लेझरची बीम ज्या ठिकाणी हे पिरॅमिड गाडलेले असते त्या दिशेला सोडल्याचे दाखवण्यात येते आणि ते यान अदृश्य होते.
स्वत वेयलँड आणि त्याची टीम आता ज्या ठिकाणी हे पिरॅमिड गाडलेले आहे, तिथे उत्खननासाठी पोहोचते. मात्र त्यांना तिथे जमिनीपासून पिरॅमिडच्या दरवाजापर्यंत खोदलेला एक सरळ आकाराचा मोठा खड्डा दिसतो आणि ते आश्चर्यचकित होतात. कारण आठवडाभरापूर्वी जेव्हा या पिरॅमिडला पहिल्यांदा शोधण्यात आलेले असते, तेव्हा तिथे असा कोणताही खड्डा बनलेला नसतो. आता प्रेक्षकांनादेखील हा खड्डा म्हणजे त्या यानातून सोडण्यात आलेल्या लेझरची कमाल असल्याचे लक्षात येते. थोडी चर्चा करून ही टीम त्या खड्डय़ात उतरण्याचा निर्णय घेते. आलेक्सा, सेबेस्टियन, वेयलँड आणि मोजके लोक सोडून इतर सर्वजण खड्डय़ापाशी थांबण्याचा निर्णय घेतात. पिरॅमिडपाशी पोहोचल्यावर सगळे पुन्हा एकदा थक्क होतात. कारण तिथे भव्य आकाराची चिन्हे आणि चित्रे कोरलेली असतात. प्राचीन लिपीमध्ये केलेले लेखनदेखील तिथे असते.
पिरॅमिडमध्ये हिंडत असताना टीममधील एका सहकाऱयाचा पाय चुकून जमिनीवरील एका खटक्यावर पडतो आणि दुसरीकडे असणाऱया एका चेंबरमध्ये साखळदंडाने बंद असलेली एलियन क्वीन एका चेंबरमधून वर येते. हजारो वर्षे ाढायोजनिक स्लिपमध्ये असलेल्या या क्वीनला आता ज्या मशीनला बांधलेले असते, ते मशीन शॉक देण्यास सुरुवात करते. त्यामुळे ही एलियन क्वीन जागी होते आणि ताबडतोब अंडी देण्यास सुरुवात करते. आपल्या चुकीमुळे काय घडले आहे याची या टीमला जाणीवदेखील नसते. मात्र अंतराळातील प्रिडेटर्सला ही गोष्ट लगेच लक्षात येते आणि तीन प्रिडेटर्स तातडीने पृथ्वीच्या दिशेने रवाना होतात. पृथ्वीवर उतरल्या उतरल्या ते सगळ्यात आधी खड्डय़ापाशी थांबलेल्या सर्व लोकांची हत्या करतात आणि पिरॅमिडकडे मोर्चा वळवतात. इकडे पिरॅमिडमध्ये हिंडणाऱया लोकांना एके ठिकाणी प्राचीन भाषेत कोरलेला मजकूर दिसतो. सेबेस्टियन तो वाचून त्याचा अर्थ लावतो आणि सांगतो की, हा एक बंद बॉक्स असून त्याच्यावरील गोलाकार कळ विशिष्टपणे फिरवल्यास तो उघडेल. सेबेस्टियन त्याप्रमाणे कळ फिरवतो आणि तो लांब बॉक्स उघडतो. आतमध्ये त्यांना अत्यंत वेगळ्या धाटणीच्या अशा बंदुका दिसतात. आलेक्सा सगळ्यांना कोणत्याही अनोळखी वस्तूला हात लावण्याची मनाई करते. मात्र वेयलँडने बरोबर आणलेले सैनिक तिची थट्टा करतात आणि त्या बंदुका ताब्यात घेतात.
एलियन क्वीनने दिलेल्या अंडय़ांमधून आता विचित्र आकाराचे जीव बाहेर पडायला सुरुवात झालेली असते. माणसावर हल्ला करून त्यांच्या मदतीने काही मिनिटांत स्वतची पूर्ण वाढ करून घेण्यास सक्षम असे हे जीव असतात. आता एलियन विरुद्ध तीन प्रिडेटर्स असा सामना सुरू होतो. हा थरार नक्की अनुभवा आणि एका वेगळ्या विश्वाच्या सफरीचा आनंद नक्की लुटा.

























































