मित्र आणि मार्गदर्शक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार श्रीनिवास पाटील

शरद पवार हे एक हळवे कुटुंबप्रमुख आहेत, त्याचबरोबर कला, साहित्य, संस्कृती व क्रीडा या सर्वच क्षेत्रांबद्दल प्रचंड अभ्यास व आस्था असणारे राजकीय नेते आहेत. ते सतत काही ना काही वाचत असतात. आजही या वयात शरदराव सकाळी जनतेला भेटीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळेच पवार सगळ्याहून वेगळे ठरतात आणि अनेकांना आधार वाटतात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातून येऊन देशाचे राजकीय क्षितिज त्यांनी व्यापले आहे. माझ्यापुरते बोलायचे तर माझ्यासाठी ते माझे जिवाभावाचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मी कराडहून 1957 साली शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि पुढच्याच वर्षी शरद पवार हेही शिक्षणासाठी बारामतीहून पुण्याला आले. त्यावेळी मी कराड आणि सातारा परिसरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था करण्याच्या दृष्टीने माझ्या वतीने छोटेखानी प्रयत्न करत असे. शरदराव बीएमसीसीमध्ये शिकत होते, तर मी सर परशुरामभाऊमध्ये. इतरांसाठी काहीतरी करावे हा जसा माझा स्थायिभाव तसाच शरद पवारांचाही. त्यामुळेच बीएमसीसीमध्ये शिकत असताना विद्यार्थी चळवळीतून त्यांनी आपला जम चांगलाच जमवला. त्यावेळी आम्ही दोघेही पोरसवदा होतो. आम्ही मित्र बनलो. पवारांच्या दोन बहिणींचे सासर आमच्या कराडकडचे. त्यामुळे पवारांचे बहिणींकडे येणे-जाणे असायचे. त्यामुळे पुढच्या काळात अनेकदा शरदराव व मी सातारामार्गे पुणे असा एसटी बसने प्रवास केला, मात्र हा जीवनप्रवास पुढे राजकीय कारकीर्दीत परावर्तित होईल व आमची बस एकच असेल अशी कल्पनाही त्यावेळी मी केली नव्हती. पुढे जाऊन आपला मित्र राज्याचे व देशाचे राजकारण गाजवेल आणि माझीही साथसोबत त्याच्यासोबत राहील याची पुसटीशीही कल्पना मला त्यावेळी नव्हती.

विद्यार्थी चळवळीतून आणि पुण्यासारख्या काव्यशास्त्रविनोदाच्या नगरीतून शरद पवारांचे नेतृत्व घडत होते. यशवंतराव चव्हाण हे आम्हा दोघांचे आदर्श. आमच्या मैत्रीतील हेही एक महत्त्वाचे साम्यस्थळ होते. शरद पवार युवक कॉंग्रेस चळवळीत जोमाने पुढे जात होते. माझी वाटचाल प्रशासकीय सेवेच्या दिशेने गेली. पवारांमधील स्पार्क ओळखून त्यावेळी त्यांना बारामतीमधून विधानसभेला संधी देण्याचा विचार यशवंतरावांच्या मनात घोळत होता, मात्र शरद पवारांना संधी मिळू नये यासाठी त्यावेळी तिकडचे काही प्रस्थापित राजकारणी प्रयत्न करत होते. त्यांचे हे अडवाअडवीचे राजकारण लक्षात आल्यानंतर स्वतः यशवंतरावांनीच पवारांच्या नावाला विरोध करणाऱ्या नेत्यांना ‘‘आपली एक सीट कमी येईल इतकेच ना, मग ठीक आहे’’, असे सांगत शरद पवारांनाच उमदेवारी दिली. त्यानंतर पवारांनी राजकीय आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. आमदार व मंत्री म्हणून काम करताना पवारांनी मोठी मेहनत घेतली. वसंतदादा पाटील, आबासाहेब कुलकर्णी यांनी पवारांना सातत्याने प्रोत्साहन दिले. प्रसंगी शाबासकीची थाप दिली. त्याच्या जोरावर शरदराव एकेक राजकीय सोपान चढत गेले. त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत गेली. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी मूलगामी निर्णय घेतले. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक राज्याने व देशाने वेळोवेळी पाहिली, मात्र त्याहीपेक्षा पवारांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

शरदरावांकडे गुणग्राहकतेचा मोठा गुण आहे. त्यामुळे अनेक कलाकार, साहित्यिक, खेळाडूंना त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजवर मोठी मदत केली आहे. बीसीसीआय व आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी जागतिक क्रिकेटचे रूपडे बदलले. एक कसोटी सामना खेळणाऱ्या खेळाडूलाही भरघोस पेन्शन मंजूर केली. एका अर्थाने अनेकांच्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यात पवार यांनी आनंदाचे क्षण आणले. महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन राजकारण गाजविणारे आपले गुरू यशवंतरावांच्या पावलावर पाऊल टाकून शरदरावांनी दिल्लीचे राजकारणही गाजवले. यशवंतरावांचे दिल्लीतील निवासस्थान हे मराठी माणसासाठी हक्काचे ठिकाण असे. अलीकडच्या काळात शरद पवारांचे दिल्लीतील निवासस्थान हे मराठी माणसांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. पद्म पुरस्कार विजेत्यांना तसेच इतर क्षेत्रांत मानसन्मान प्राप्त केलेल्या मंडळींना घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार करण्याची परंपरा शरदरावांनी जोपासली आहे. त्यामुळे शरद पवार हे अनेकांना आधार वाटतात. आजही या वयात शरदराव सकाळी जनतेला भेटीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळेच पवार सगळ्याहून वेगळे ठरतात. महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीचा एक देशाच्या राजकारणाला वेगळे वळण देणारा प्रयोग झाला. शरद पवारांनी मुत्सद्दीपणा दाखवत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावली. शरद पवार या नावाचा करिश्मा त्यांनी दाखवून दिला. राजकारणात काहीही अशक्य नसते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातून येऊन देशाचे राजकीय क्षितिज व्यापणाऱ्या या जिवाभावाच्या मित्र, मार्गदर्शक नेत्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.

शब्दांकन – नीलेश कुलकर्णी