सुरक्षित प्रवासात एसटीच अव्वल स्थानी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीरंग बरगे

दर 1लाख किलोमीटरला एसटीच्या चालकांचे अपघाताचे प्रमाण 0. 17 टक्के इतके आहे. त्यामध्ये समोरील वाहनांची चुकी असल्याने झालेल्या अपघाताचे प्रमाण 90 टक्के असल्याने एसटीचा चालक निश्चितच अपघात विरहित सेवा देण्याबद्दल अव्वलस्थानी आहे. ही गौरवाची बाब आहे व त्याचा अभिमान बाळगला पाहिजे! चालकाच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच प्रवाशांना सुरक्षित प्रवास आणि निश्चित प्रवासाची हमी केवळ एसटीच देऊ शकते व तीच एसटीची मोठी उपलब्धी आहे. एस.टी. महामंडळातर्फे 11 ते 25 जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेनिमित्त…

जानेवारी महिन्यात देशभर ‘रस्ते सुरक्षा अभियान’ चालविण्यात येते. त्याचे औचित्य साधून एसटी महामंडळसुद्धा प्रतिवर्षीप्रमाणे 11 ते 25 जानेवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम राबवीत असते. प्रशिक्षण, तंदुरुस्ती, मनस्वास्थ्य या त्रिसुत्रींवर महामंडळ जास्त भर देत आहे व त्यामध्ये चालकाला केंद्रबिंदू मानूनच हे अभियान राबविण्यात येते. त्यांनाच परिस्थितीला अनुरूप अशा नवनवीन येणाऱ्या अनुभवातून धडे दिले जातात. त्याकरिता महामंडळाकडे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विभाग असून त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, त्यांची नित्यनेमाने शारीरिक तपासणी करणे व मानसिक तंदुरुस्तीसाठी समुपदेशन करीत राहणे असे उपाय करीत आहेत व त्यामध्ये सातत्यसुद्धा राखले जात आहे. सुरक्षिततेची धुरा सांभाळणाऱ्या चालकाला ‘देवदूत’ समजून त्याच्या कामासाठी पूरक वातावरण निर्माण करणे, हे त्या संस्थेचे मूलभूत कार्य असते व तेच एसटी महामंडळ वर्षानुवर्षे करीत आहे. तथापि दुर्दैवाने समोरच्याच्या चुकीने, त्याचसोबत अत्यंत खराब रस्ते व तांत्रिक चुका यांमुळे रस्त्यावर अपघात घडतात. त्यामध्ये आर्थिकहानी बरोबर कधीही भरून न येणारी जीवितहानी होते. हे सगळे पूर्णतः थांबवणे जरी आपल्या हातात नसले तरी त्यांचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा कमी करून, किमान जीवितहानी वाचवण्यासाठी प्रयत्न झाले तर अशा अभियानाचे सकारात्मक फलित भावी पिढीला आपण देऊ शकतो, याचे समाधान आपल्याला मिळेल. तसाच प्रयत्न महामंडळ गेली 74 वर्षे सातत्याने करीत आहे.

दर 1लाख किलोमीटरला एसटीच्या चालकांचे अपघाताचे प्रमाण 0. 17 टक्के इतके आहे. त्यामध्ये समोरील वाहनांची चुकी असल्याने झालेल्या अपघाताचे प्रमाण 90 टक्के असल्याने एसटीचा चालक निश्चितच अपघात विरहित सेवा देण्याबद्दल अव्वलस्थानी आहे. ही गौरवाची बाब आहे व त्याचा अभिमान बाळगला पाहिजे! चालकाच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच प्रवाशांना सुरक्षित प्रवास आणि निश्चित प्रवासाची हमी केवळ एसटीच देऊ शकते व तीच एसटीची मोठी उपलब्धी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या वाहतुकीचा विचार केल्यास अंदाजे 35 हजार अपघात वर्षाला होत असून 12 ते 15 हजार जण यामध्ये मृत्युमुखी पडतात, पण एकूण अपघातांच्या तुलनेत एसटीच्या अपघाताचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळेच दररोज लाखो प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची हमी मिळत असल्याने एसटी हाच प्रवासाचा सुरक्षित व सर्वोत्तम पर्याय आहे. खासगी वाहनांचे वाढते प्रमाण व दररोज भरमसाट येणारी नवीन वाहने यांमुळे रस्त्यांवर होणार अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अकुशल, हौशी चालक हा या अपघातांचे मुख्य कारण आहे. यावर उपाय म्हणून काही उपाययोजना तत्काळ केल्या पाहिजेत, हेसुद्धा या निमित्ताने सुचवावेसे वाटते. जगातील काही देशांनी वाहतूक करवसुली करून सार्वजनिक वाहतूक सुविधा मोफत दिल्या आहेत. त्याच पद्धतीने यासाठी कररूपाने निधी वसूल करून आपल्याकडेसुद्धा नागरिकांना मोफत व सुलभ प्रवास देता येईल का? यावर विचार झाला पाहिजे. तीच काळाची गरज आहे. निव्वळ आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास खासगी वाहनांमुळे रस्त्यावर दररोज हजारो अपघात होतात. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी, बेस्ट, रेल्वे, यांच्या अपघातांचे प्रमाण अत्यल्प असून एसटीमध्ये तर प्रशिक्षण पूर्ण करूनच एसटीच्या चालकांना प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेतले जाते. त्यांना अपघात विरहित सेवेबद्दल वेळोवेळी प्रोत्साहित केले जाते. तसेच विशिष्ट कालावधीनंतर त्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे त्यांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीमध्ये दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडून येत आहेत. याचा परिणाम म्हणून एसटीच्या अपघातांची संख्या इतर कोणत्याही परिवहन संस्थेपेक्षा व खासगी वाहनांपेक्षा अतिशय कमी असून सुरक्षित वाहन चालवण्याचे कौशल्य एसटीच्या चालकांनी आत्मसात केल्यामुळे कोटय़वधी प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळत आहे. एकंदरीत सध्या दळणवळण व वाहतूक क्षेत्रातील चालक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र खासगी वाहने चालविणाऱया चालक किंवा गाडीचे मालक यांना वाहन कसे चालवावे व प्रदूषण कसे रोखता येईल किंवा अपघात कसे टाळता येतील, याबाबतचे प्रशिक्षण देण्याची कुठलीही यंत्रणा आजतागायत अस्तित्वात नाही. त्यामुळे एक दिवस गाडी चालवून त्याआधारे गाडी चालवण्याचा परवाना दिला जात आहे. पुन्हा नंतरच्या काळात तो गाडी व्यवस्थित चालवतो का? त्याची शारीरिक व मानसिक स्थिती जाणून घेतली जात नाही. त्याचप्रमाणे खासगी वाहने चालविणाऱया चालक, मालक यांच्या डोळय़ांची तपासणी केली जात नाही. त्यामुळेसुद्धा अपघात वाढले असून देशात दररोज 426 लोकांचे अपघाती मृत्यू होत आहेत, तर दर तासाला 18 लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. हेसुद्धा अनेक संस्थांनी काढलेल्या निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. या शिवाय मोठय़ा प्रमाणात वाहतूक समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. अपघातांसोबत प्रदूषणसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढले असून हे सर्व रोखायचे असेल तर काही कडक निर्बंध घालण्यात येऊन मोठय़ा प्रमाणात उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. आज तरी एसटी महामंडळ सुरक्षित सेवा देण्यामध्ये अव्वल स्थानी असल्याचे विविध सर्वेक्षणात दिसून येत आहे व अजूनही तरी सर्वोच्च स्थानी आहे. त्यात वृद्धी व्हावी व प्रवाशी जनतेला सुरक्षित सेवा मिळेल अशी अपेक्षा करूया.
(लेखक महाराष्ट्र एस. टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत)