
>> अरविंद बुधकर
धरणग्रस्त विस्थापितांच्या संघर्षाची व्यथा ही अत्यंत जुनी आणि अजूनही न सुटलेली आहे. महाराष्ट्रात 1920 नंतर जे धरण प्रकल्प उभे राहिले ते मात्र धरणग्रस्त लोकांचे मरण घेऊन आले. अनेक सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येमुळे कुटुंबे उद्ध्वस्त, विस्थापित झालीत. आईवडील मुले विखुरली जाऊन कौटुंबिक वादाची कहाणी झाली. अशा धरणग्रस्तांची कहाणी सुरू झाली ती मुळशी पट्टय़ातील -मुळशी धरणामुळे. 2024 हे मुळशी धरणाचे शताब्दी वर्ष. अनिल निवृत्ती पवार हे मुळशीचे असल्याने, कोरोना काळात त्यांनी मुळशी धरणाचा, लोकांच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला. मुळशी पट्टय़ातील मावळातील मावळ्यांची संघर्षाची माहिती संकलित करून जाहीर जनतेसमोर मांडावी अशी कल्पना सुचली. त्यातून निर्माण झालेले ‘सह्याद्रीचे अश्रू’ हे विविध लेखांचे संपादित पुस्तक. ह्या पुस्तकाला डॉ सदानंद मोरे यांची अभ्यासपूर्ण माहिती असलेली प्रस्तावना लाभलेली आहे.
पुस्तकात लेखांची रचना असा घडला मुळशी सत्याग्रह, मुळशी सत्याग्रहाचे विविधांगी विश्लेषण, धरणग्रस्त विस्थापितांसाठी संघर्ष करणारे लढवय्ये, मुळशी धरणग्रस्तांचा वर्तमानातील हुंकार, विभिन्न धरणग्रस्तांची कैफियत अशी पाच भागात केलेली असून अनेकांच्या लेखांचे संकलन केलेले आहे. ह्या पुस्तकात 1920 च्या मुळशी धरणग्रस्त विस्थापित ते नर्मदा धरणग्रस्त विस्थापित लोकांच्या संघर्षावर आधारित समस्या विस्ताराने मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात, कुठलीही चळवळ अथवा लढा ह्यात जे बाधित असतात त्यांच्या हाती काही लागत नाही. सरकारदरबारी न्याय मिळत नाही, सरकार कधी सुस्पष्ट भूमिका घेऊन प्रश्न सोडवत नाही. 70 वर्षे झाली तरी सर्व धरणग्रस्तांची हीच भूमिका आजही आहे. हे पुस्तक म्हणजे विस्थापितांच्या पराभवाची कहाणी जरी असली तरी अशा संघर्षातून सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास नक्कीच होतो.
सह्याद्रीचे अश्रू (धरणग्रस्त विस्थापितांचा संघर्ष )
संपादक ः अनिल निवृत्ती पवार
प्रकाशक ः कृष्णा पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे ः 784 n किंमत ः 1000/- रुपये