
>> चंद्रशेखर बुरांडे
ब्रिटिशकालीन राजवटीत समाजकल्याणाचा विशाल दृष्टिकोन ठेवून अनेक हिंदुस्थानी धनिक समाजसेवी मुंबईतील जनतेच्या कल्याणासाठी पुढे सरसावले होते. नामदार जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ ‘नाना’ त्यापैकी एक होत. नानांना मुंबईचे आद्य शिल्पकार, रेल्वेचे जनक असेही संबोधले जाते. मुंबईस आधुनिक शहर बनवण्याचे श्रेय एकटय़ा ब्रिटिशांचे नसून तत्कालीन एतद्देशीय धनिक समाजसेवी व अनेक कष्टकऱयांचेदेखील आहे. आज नानांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या महान कार्याचा आढावा.
साधारणतः एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई शहराच्या जडणघडणीस सुरुवात झाली होती. शहरनिर्मिती व प्रशासकीय अंमलबजावणीचा दांडगा अनुभव असलेले तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर व अभ्यासू वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून प्रस्तावित मुंबई शहराचा नकाशा बनला. ही जडणघडण होत असताना उर्वरित महाराष्ट्र व मुंबईतील सामाजिक स्थिती मध्ययुगीन कालखंडापेक्षा निराळी होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन मुंबई व शहर, समाज एकत्र घडत होता. नवीन शहर निर्मिती करणारे राज्यकर्ते परकीय होते व एतद्देशीयांत मुंबईचे मूळ रहिवासी व देशभरातून स्थलांतरित झालेला सर्वधर्मीय समाज होता. याच काळात दातृत्व व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजसेवेच्या नवनव्या परंपरा निर्माण झाल्या. अशा मिश्र वातावरणात शासकीय इमारती उभारल्या जात होत्या तर धनिक उद्योजकांच्या निजी योगदानातून शैक्षणिक इमारती, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, सार्वजनिक प्याऊ इत्यादी वास्तूंची जोड मिळत गेली. अशा रीतीने राज्यकर्ते व उद्योजकांच्या संमिश्र योगदानातून पडिक व दलदलीच्या भूभागास चैतन्य प्राप्त झाले.
या काळात मुंबईतील एतद्देशीय धनिक परंतु दानशूर लोकांमध्ये नाना जगन्नाथ शंकर शेट यांचे नाव मोठे होते. समाजकार्य एका विशिष्ट समाजापुरते अथवा कार्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या व्यवसायामुळे ते राज्यकर्ते व जनतेच्या सतत संपर्कात असत. नानांनी व्यवसाय व समाजसेवा कार्याची उत्तम प्रकारे सांगड घातली होती. त्यांनी राजकीय, सामाजिक व धार्मिक विषयाशी निगडित असलेले अनेक प्रश्न शासनासमोर निष्पक्षपातीपणे मांडले. त्यामुळे राज्यकर्ते व एतद्देशीय बांधवांत त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. नानांचे समकालीन ज्येष्ठ स्नेही व थोर समाजसुधारक जमशेटजी जीजीभाई यांनी हॉस्पिटल, धर्मशाळा, उच्च कला शिक्षण संस्था काढल्या. तसेच कावसजी जहांगीर, फ्रामजी कावसजी, प्रेमचंद रायचंद, डेव्हिड ससून यांनी सामाजिक गरजेची पूर्तता करणाऱया महत्त्वपूर्ण इमारती स्वेच्छेने व स्वखर्चातून बांधल्या व समाज उद्धारही साधला. यातून मुंबई एक दर्जेदार शहर बनवले. नानांनी मुंबईसाठी केलेल्या महत्त्वाच्या योगदानाची यादी बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाच्या नोंदी अशा – राणीचा बाग व डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, सतीच्या चालीचे निर्मूलन, स्त्र्ााrशिक्षण, नागरिकांचे आरोग्य व नागरी सुविधा पुरवण्यासाठी बोर्ड ऑफ कॉन्झर्व्हन्सीची स्थापना इत्यादी. याच बोर्ड ऑफ कॉन्झर्व्हन्सीचे नाना हे एकमेव हिंदुस्थानी सभासद होते. त्याचेच नगरपालिकेत रूपांतर झाले. मुंबईतील नागरिकांचा व पालिकेतील कर्मचाऱयांचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून नानांनी व्हिक्टोरिया टर्मिनससमोरील मोकळ्या जागेचे आरक्षण करण्याची शिफारस केली होती. नानांच्या निधनानंतर 28 वर्षांनंतर (इ.स. 1893) मुंबई महापालिकेची इमारत त्याच भूखंडावर उभी राहिली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे तैलचित्र पालिकेच्या मुख्य सभागृहात लावले आहे. वरील उदाहरणातून नानांची समाजनिष्ठा, दूरदृष्टी व समाजकार्यातील विविध पैलू दिसून येतात.
नानांनी समाजासाठी केलेल्या कार्याचे मूल्यमापन झालेच तर हिंदुस्थानातील पहिली रेल्वे कार्यान्वित करण्यात दाखवलेली दूरदृष्टी व कल्पकतेस पहिले स्थान जाते. दुसरे स्थान क्वीन्स रोड, सोनापूर येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या संरक्षणासाठी जनतेच्या बाजूने यशस्वीपणे दिलेल्या लढय़ास द्यावे लागेल. नानांनी राज्यकर्त्यांशी लढा देऊन जनतेच्या अडचणी सोडवल्या व न्यायही मिळवून दिला. सर्वधर्मीय देशबांधवांचे हक्क व त्यांच्या उद्धारासाठी लढणाऱया नानांनी केलेल्या अनेक कार्यांपैकी मुंबईकरांच्या दीर्घकाल सेवेत व स्मरणात राहणारी ही दोन कार्ये आहेत.
नानांनी जमशेटजी जीजीभाई व अन्य सहकाऱयांच्या मदतीने सन 1843 साली हिंदुस्थानातील ‘ग्रेट वेस्टर्न रेल्वे’ कंपनी स्थापन केली. त्याचदरम्यान इंग्लंडमध्ये सन 1845 साली ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला’ या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. शेवटी या दोन्ही कंपन्यांच्या सहकार्यातून 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई-ठाणे पहिली रेल्वे धावली. मुंबईतील उद्योगास गती देणाऱया या महत्त्कार्यात ज्या दहा संचालकांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी दिलेल्या योगदानाप्रीत्यर्थ त्यांच्या अर्धप्रतिमा मध्य रेल्वे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवल्या आहेत. या दहा मान्यवरांत हिंदुस्थानी रेल्वेचे आद्य संचालक नाना शंकरशेट व जमशेटजी जीजीभाई हे दोघे आहेत.
जीवन आणि मृत्यू या मानवी जीवनातील दोन महत्त्वपूर्ण घटना मानल्या जातात. मुंबईतील हिंदू व इतर धर्मीय बांधवांचे मरणोत्तर अंत्यविधी रीतसर व्हावेत यासाठी नानांनी घेतलेले कष्ट व परकीय सत्ताधाऱयांशी दिलेला लढा हे होय. मृत्यू कुणाचाही असो, मृतदेहाचे दहन अथवा दफनविधी नीटनेटकेपणे व्हायला पाहिजे असे नानांचे ठाम मत होते. त्यासाठी नानांनी सध्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकासमोरील व वाळकेश्वर येथील मालकी हक्क व व्यवस्था असलेली जमीन हिंदू बांधवांच्या मरणोत्तर अंत्यविधीसाठी देऊन समस्त मुंबईकरांवर अनंत उपकार केले आहेत. या योगदानातून जनतेच्या सुखदुःखाविषयीची तळमळ दिसून येते.
थोर चरित्रलेखक पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी यांनी नामदार नाना शंकरशेट यांचे चरित्र ‘काळ व कामगिरी’ या चरित्रग्रंथात विस्ताराने मांडले आहे. चरित्रकारांनी नानांच्या जीवनातील प्रसंग, समाजकार्य व मरणोत्तर प्रसंगावरही विस्तृतपणे लिहिले आहे. या पुस्तकातील नानांच्या अखेरच्या घटकेचे वर्णन खूपच हृदय हेलावून टाकणारे आहे. अखेरची घटका या सदराखाली ते लिहितात-समर्थ रामदास म्हणतातः –
मृत्यु न म्हणे हा बलाढय़। मृत्यु न म्हणे हा धनाढय़।
मृत्यु न म्हणे हा आढय़। सर्वगुणे।
मृत्यु न म्हणे हा विख्यात। मृत्यु न म्हणे हा श्रीमंत।
मृत्यु न म्हणे हा अद्भुत। पराक्रमी।
नानांचे निधन होऊन 155 वर्षे उलटली. आयुष्यभर आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणारे नाना एकाच वेळी अनेक कार्यात सहभागी असत. नानांच्या स्मृतीतील मुंबईची झपाटय़ाने वाढ होत राहिली. हा वेग आजतागायत कायम राहिला आहे. पुरातन दक्षिण मुंबईतील अनेक वैशिष्टय़पूर्ण जागा कालौघात नष्ट होत आहेत, तर काही या ना त्या कारणांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नानांच्या पश्चात त्यांची स्मृतिज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य ‘नाना शंकरशेट प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सुरू आहे. या कार्यात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वडाळा येथील भूखंडावर नानांचे कायमस्वरूपी स्मारक उभे करणे व केंद्र सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ असे नामकरण व्हावे म्हणून स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सुरेंद्र वि. शंकरशेट, सचिव ऍड. मनमोहन चोणकर पदाधिकारी प्रयत्नात आहेत. प्रतिष्ठान उभारणीसाठी लागणारी आर्थिक मदत केंद्र/राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने करावी ही अपेक्षा.































































