आभाळमाया – ‘त्या’ पृथ्वीवर…

526

>> दिलीप जोशी

जोपर्यंत अवकाशातल्या एखाद्या ताऱयाभोवती दुसरी ‘पृथ्वी’ सापडत नाही तोपर्यंत आपल्या पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलं एकमेवाद्वितीय स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे या विश्वातली आपणच एकमेव जीवसृष्टी आहोत याचं कौतुक अनेकांना वाटतं, तर आपल्याला विराट अंतराळात कोणीतरी भावंडं असावं किंवा असेल यावर कित्येक जण विश्वास ठेवतात.

दोन्ही गोष्टींना आपण पन्नास टक्के मानूया. कारण जोवर पृथ्वीसदृश अन्य ग्रह निश्चितपणे दृष्टिपथात (हबलच्या) येत नाहीत तोपर्यंत आपण ‘एकमेव’ आहोत असं मानायला काहीच हरकत नाही; परंतु आपल्याच आकाशगंगेतले अब्जावधी तारे आणि अशा कोटय़वधी दीर्घिका यांचं गणित मांडलं तर आपल्या गॅलॅक्सीमध्येच सुमारे दहा हजार ताऱयांभोवती पृथ्वीसारखे ग्रह सापडू शकतात. त्यावर सजीव आहे का आणि तो आपल्याइतका किंवा आपल्यापेक्षा प्रगत आहे का, हा पुढचा प्रश्न. ‘कुणीतरी आहे तिथं’ याची उत्सुकता आणि भीती या दोन्ही गोष्टी माणसाच्या मनात डोकावतात.

संशोधकांना यापलीकडचा विचार करून अलिप्तपणे काम करावं लागतं. ‘नासा’ ही अमेरिकेची त्यासंदर्भात काम करणारी मोठी संस्था. त्यांचा ‘टेस’ नावाचा उपग्रह केवळ आपल्या ग्रहमालेपलीकडील ग्रह शोधण्याच्या कामी नेमला आहे. त्याला या वर्षाच्या सुरुवातीला पृथ्वीसारखा ‘वसाहतयोग्य’ आणि पाणीदार ग्रह सापडल्याचं ‘नासा’ने जाहीर केलं. या ग्रहाचं वैज्ञानिक नाव ‘टीओआय-700डी’. तो त्याच्या जनक ताऱयासकट आपल्यापासून 100 प्रकाशवर्षे दूर आहे.

‘टेस’चं कामच पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याचं आहे. या कृत्रिम उपग्रहाने काही काळापूर्वी एका ताऱयाचा आणि त्याभोवतीच्या ग्रहमालेचा वेध घेऊन ते पृथ्वीकडे पाठवले, परंतु काही हौशी खगोल अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी ‘टेस’च्या निष्कर्षांमधली गफलत नजरेस आणून दिली. ‘टेस’ने एका ताऱयाभोवतीचे मोठे आणि उष्ण भासणारे, परंतु तसे नसणारे ग्रह पाहिले आणि त्यांचं तसं वर्गीकरणही केलं. त्यावर काही अव्यावसायिक खगोल अभ्यासकांनी अधिक विचार करून ‘त्या’ ग्रहांचे आकार लहान असल्याचं आणि त्यातील शेवटचा ग्रह आपल्या पृथ्वीसारखाच जलसमृद्ध असल्याचं निष्पन्न झालं. यावर नंतर स्पिट्झर दुर्बिणीने शिक्कामोर्तब केलं.

असेच काही ग्रह यापूर्वीही केप्लर दुर्बिणीने शोधून काढले आहेत. 2018 मध्ये अवकाशात गेल्यापासून ‘टेस’ने शोधलेला हा पृथ्वीसारखा पहिलाच ग्रह आहे. या ‘डी’ नावाच्या ग्रहाचा तो जनक तारा आहे त्याचं नाव टीओआय-700. तो आपल्या सूर्याच्या 40 टक्के एवढय़ा आकाराचा असून त्याचं तापमान सूर्याच्या निम्मं आहे. आपल्या सूर्याचं गाभ्यातील तापमान दीड कोटी सेल्सियस (केल्विन) आणि पृष्ठभागावरचं तापमान 6000 अंश सेल्सियस आहे.

सूर्यापेक्षा आकाराने व उष्णतेनेही कमी असलेल्या ताऱयाच्या ग्रहमालेतील ‘हॅबिटेबल झोन’ किंवा वसाहतयोग्य कक्षा आपल्या पृथ्वीच्या तुलनेत निराळीच असणार. या छोटय़ा ताऱयाच्या वसाहतयोग्य ग्रहाची कक्षा पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा कमी अंतरावर असून तेथे अतिथंड किंवा अतिउष्ण वातावरण नसल्याने पाणी निर्माण होऊन ते टिकून राहिलं असण्याची शक्यता आहे, अन्यथा तेथे नेपच्यूनसारखा बर्फाचा गोळा झालेला ग्रह किंवा बुधासारखा शुष्क ग्रह दिसला असता.

अशा ‘त्या’ पृथ्वीचा जनक तारा लहान असला तरी ती ‘पृथ्वी’ मात्र आपल्या पृथ्वीपेक्षा आकाराने मोठी आहे हे विशेष. हा ग्रह त्या ताऱयाभोवती 37 दिवसांत फिरतो. म्हणजे ‘त्या’ पृथ्वीवरचं वर्ष केवळ 37 दिवसांचं. या ‘डी’ नावाच्या ग्रहाला जी ऊर्जा त्याच्या ताऱयाकडून मिळते ती सूर्य पृथ्वीला देतो. त्या ऊर्जेच्या तुलनेत 86 टक्के म्हणजे 14 टक्के कमी असते.

‘नासा’तील संशोधकांच्या सांगण्यानुसार या ग्रहावर समुद्रात प्रचंड कार्बन डायऑक्साईड असावा. या ताऱयाचा आणि त्याभोवती फिरणाऱया ‘त्या’ पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास सुरू असून तेथे सजीव निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे का आणि विश्वातील तो एक जीवसृष्टी निर्माण करू शकणारा ग्रह आहे का, अशा प्रश्नांची उत्तरं भविष्यकाळात मिळतील.

आपल्या पृथ्वीपेक्षा आकाराने 20 टक्के मोठा असणारा हा पाणथळ ग्रह तिथे सजीव निर्माण करू शकत असेल तर कालांतराने आपलं भावंड (किंवा स्पर्धक) कोणीतरी सापडेल… अशाच एखाद्या ग्रहावरचे ‘कुणीतरी’ आपलाही असाच शोध घेत असले तर…! …तर बरे किंवा वाईट कोणतेही परिणाम संभवतात.

आपली प्रतिक्रिया द्या