ओपन सोर्स सॉफ्टवेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अभय मोकाशी

फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या लिनस तोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने 1991 साली स्वतःचा नवीन संगणक चालविण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. तोरवाल्ड्सने 21व्या वर्षी विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याची सर्व सांकेतिक रचना त्याने सर्वांसाठी विनामूल्य खुल्या केल्या. या पद्धतीला ओपन सोर्स म्हणतात. कारण त्या सॉफ्टवेअरचे सर्व सोर्स सर्वांसाठी खुले केले जाते.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाटय़ाने प्रगती होत आहे. एकीकडे नवनवे हार्डवेअर विकसित होत आहे आणि त्याचा उपयोग आपण वापरत असलेल्या विविध उपकरणांत होत आहे. त्यामुळे संगणक आणि मोबाईल फोनमध्ये बदल होताना दिसत आहे. परिणामी या उपकरणांची कार्यक्षमता वाढत आहे. विशेष म्हणजे संगणक आणि लॅपटॉपची क्षमता अनेक पटींनी वाढत आहे तरी त्यांची किमत तुलनेने कमी होत आहे. मात्र असे संगणक चालविण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टिम अजून महागच आहे. सर्वात लोकप्रिय असणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे विन्डोज, ज्याची किंमत अजून जास्तच समजावी. कारण विन्डोजकडून वेळोवेळी नवीन घटक टाकून ती सिस्टम अपग्रेड केली जाते आणि त्याचा लाभ घेणाऱयांना त्याची आर्थिक किंमत मोजावी लागते.

फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या लिनस तोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने 1991 साली स्वतःचा नवीन संगणक चालविण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. तोरवाल्ड्सने 21व्या वर्षी विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याची सर्व सांकेतिक रचना त्याने सर्वांसाठी विनामूल्य खुल्या केल्या. या पद्धतीला ओपन सोर्स म्हणतात. कारण त्या सॉफ्टवेअरचे सर्व सोर्स सर्वांसाठी खुले केले जाते. तोरवाल्ड्सच्या या कृत्याने सर्वांना ती सिस्टम वापरायला मिळणार होतीच, पण ती पुढे विकसित करू इच्छिणारे, त्यासंदर्भात सूचना करू शकणार होते. ते ऑपरेटिंग सिस्टम उत्तम करण्यासाठी त्यांनी जरी इतरांकडून सूचना मागविल्या होत्या, तरी आपण त्या अमलात आणूच असे नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते.

आपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता. लिनस तोरवाल्ड्स यांच्या ऑपरेटिंग सिस्टमचा विकास करण्यासाठी अग्रगण्य असलेल्या हेलसिंकी तंत्रज्ञान विद्यापीठाचे अरी लेमके यांना फ्रीक्स हे नाव पसंत आले नाही आणि त्यांनी या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव लिनक्स असे ठेवले. लिनस तोरवाल्ड्स यांना श्रेय मिळावे या हेतूने त्यांनी लिनस नावाबरोबर उनिक्सचा एक्स लावून लिनक्स हे नाव तयार केले आणि या नावाला तोरवाल्ड्स यांनी मान्यता पण दिली.

जगभरात लिनक्सचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. त्यात उबुंटू हु ऑपरेटिंग सिस्टम सर्वात लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या 15 लाख लॅपटॉपमध्ये उबुंटूचा वापर करण्यात आला होता. डेल आणि एचपी या दोन्ही कंपन्या आपल्या लॅपटॉपमध्ये उबुंटू घालून देत आहेत. उबुंटूच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावाने लिनक्स उपलब्ध आहे. आपल्या देशात बौद्धिक संपत्ती कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही म्हणून विन्डोज ऑपरेटिंग सिस्टम, एमएस ऑफिस, फोटोशॉप, इन डिझाईन आणि कॉर्क एक्स्प्रेस इत्यादी सॉफ्टवेअरची पायरेटेड प्रत शंभर-दोनशे रुपयांत सर्रास मिळते. या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा असा वापर करणे बेकायदेशीर आहेच, धोक्याचेदेखील आहे. असा वापर करणाऱयांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर असे सॉफ्टवेअर अनेकदा व्यवस्थितपणे काम करत नाहीत. या सर्वांवर एक उत्तम उपाय म्हणजे फ्री सॉफ्टवेअर, म्हणजे असे सॉफ्टवेअर, ज्यासाठी कधी पैसे मोजावे लागत नाहीत. अनेक महागडय़ा सॉफ्टवेअरना पर्याय म्हणून फ्री सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.

एमएस ऑफिसला पर्याय म्हणजे स्टार ऑफिस, लिबर ऑफिस, पोलारिस ऑफिस, डब्ल्यूपीएस ऑफिस, सॉफ्टवेअर मेकर फ्री ऑफिस असे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. एमएस ऑफिसच्या वापराने जी कामं होऊ शकतात, ती सर्व कामं या सॉफ्टवेअरने होऊ शकतात.फोटोशॉपला पर्याय म्हणजे गिंप, क्रिटा, सीशोर, पेंटडॉटनेट, पिकमंकी, सुमोपेंट असे काही सॉफ्टवेअर आहेत. गिंपचा वापर करून ज्या काही गोष्टी करता येतात, त्या फोटोशॉपनेदेखील करता येत नाहीत. वृत्तपत्र, नियतकालिके इत्यादीची रचना करण्यासाठी इन डिझाईन आणि कॉर्क एक्स्प्रेससारख्या महागडय़ा सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. याला पर्यायी फ्री सॉफ्टवेअर म्हणजे इंक स्केप आणि क्रीबस. हे दोन्ही सॉफ्टवेअरच्या वापराने उत्तम प्रकारे डेस्क टॉप पब्लिकेशन केले जाऊ शकते. इंक स्केपची तुलना अडॉब इलस्ट्रेटरशी करायला हरकत नाही.

हल्ली शाळा कॉलेज तसेच कॉन्फरन्समध्ये प्रेझेन्टेशनचे महत्त्व वाढले आहे. पॉवरपॉइंटपेक्षा आकर्षक प्रेझेन्टेशन करण्यासाठी प्रेझीचा वापर केला जातो. ‘प्रेझी’ हा शब्द प्रेझेन्टेशन इझीपासून तयार झाला आहे. सोप्या पद्धतीने प्रेझेन्टेशन करण्यासाठी हा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरता येतो. या सॉफ्टवेअरचा सामान्य वापर विनामुल्य करता येतो. मात्र त्याची संपूर्ण कार्यक्षमता वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतात. प्रेझीलादेखील फ्री सॉफ्टवेअरचे काही पर्याय आहेत. त्यापैकी काही म्हणजे सोझी (सो ईझी) आणि जेसी इंक. हे दोन्ही इंक स्केपबरोबर वापरता येतात. सोझी इंक स्केपशिवायदेखील वापरता येते.
उत्तम प्रेझेन्टेशन करण्यासाठी अजून एक उत्तम सॉफ्टवेअर म्हणजे ऍकॅडेमिक प्रेझेंटर. यातील फरक असा आहे की, सोझी आणि इंक स्केपने तयार केलेले प्रेझेन्टेशन कोणत्याही ब्राऊझरमध्ये पाहता येते. त्यासाठी या सॉफ्टवेअरची गरज नसते. ऍकॅडेमिक प्रेझेंटरच्या सहाय्याने केलेले प्रेझेन्टेशन फक्त ऍकॅडेमिक प्रेझेंटरचा वापर करून पाहू शकतात.

बॉसचा वापर कमी का?
आपल्याकडे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सेंटर फॉर ऍडव्हान्स कम्प्युटिंग (सी डॅक) या संस्थेने बॉस—भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स (BOSS) अशी एक लिनक्सची अजून एक आवृत्ती विकसित केली आहे. यात हिंदुस्थानी भाषांचा समावेश आहे आणि याचा वापर सरकारी कार्यालयात चांगला होऊ शकतो असे बॉसच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. सरकारी संस्थेने विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केंद्र आणि राज्य सरकारांकडून फार कमी होताना दिसतो. अशा कार्यालयांत विन्डोज ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला जातो. म्हणजेच त्याचा आर्थिक भार त्या-त्या सरकारवर पडत राहिला आणि आजही पडत आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

summary- article on open source software by abhay mokashi