
वैश्विक, [email protected]
अवकाशातील सर्व वस्तूंना उपजत गती प्राप्त झालेली आहे. चंद्र पृथ्वीभोवती, पृथ्वी चंद्रासकट सूर्याभोवती फिरते. आपली अख्खी ग्रहमाला आणि ग्रहमालेतील महापाषाण (अशनी) खुजे ग्रह (ड्वार्फ प्लॅनेट) एवढेच काय, धूमकेतू आणि अंतराळातील धूलिकण, दगडधोंडे सारं काही गरगरत असतं. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग सेकंदाला 30 किलोमीटर तर सूर्याच्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरण्याचा वेग सेकंदाला 220 किलोमीटर इतका आहे. म्हणजे आपला सर्वांचाच जन्मजात वेग आपल्या नकळत सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर इतका प्रचंड आहे. ट्रेन किंवा अगदी रॉकेटवर स्वार झालेल्या प्रवाशाला आत असताना तो वेग जाणवत नाही. तसेच पृथ्वीचा वेग आपल्याला जाणवत नाही, परंतु हे वेगाचं वैज्ञानिक सत्य विस्मयकारी आहे खरं. त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
आज पृथ्वीवरच्याच एका अशनीपाती विवराची माहिती घेण्याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियातील बॅण्डाना येथील 2 सप्टेंबर 2020 रोजी ‘सापडलेलं’ विवर. झालं असं की, या भागात सोन्याच्या खाणीचं खोदकाम सुरू असताना हा सोन्यासारखा बावनकशी शोध लागला. हे ओराबॅण्डाना विवर ऑस्ट्रेलियातल्याच सर्वात मोठय़ा मानल्या गेलेल्या वुल्फ विवरापेक्षा पाच पट मोठं असल्याचं सिद्ध झालंय! वुल्फ (की वोल्फ) विवराचा व्यास 880 मीटर, तर या नव्या बॅन्डानाचा 4400 मीटर आहे.
सवादोन कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातच प्रचंड अशनीपाताने निर्माण झालेलं येराबुबा हे विवर आतापर्यंत ऑस्ट्रेलियातलं सर्वात प्राचीन विवर समजलं जात होतं. परंतु गतवर्षीच्या संशोधनाने आता बहुधा हा मान बॅण्डानाला मिळणार. त्याचं वय 10 कोटी वर्षांचं असल्याचं सांगितलं जातं.
पृथ्वीवर 1 लाख वर्षांपेक्षा कमी वयाची आणि 100 मीटरपर्यंत व्यासाची अनेक विवरं आहेत. त्यामध्ये अर्जेन्टिनातील रिओ क्युएर्तो येथील विवर अजून तरी सर्वात जुने मानले जाते. विज्ञानाचा अभ्यास करताना नवे पुरावे सापडले की नवे निष्कर्ष सहजतेने स्वीकारले जातात.
पृथ्वीवर रोज सुमारे 25 लाख उल्का दिवसरात्र पडत असतात. आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. त्यामुळे रोज पृथ्वीचे वजन सुमारे 15000 टनांनी वाढते! त्याविषयीसुद्धा उल्कावर्षावाचे दिवस आले की अधिक जाणून घेऊ. मात्र बहुतेक उल्का, पृथ्वीच्या वातावरणाशी झालेल्या तीक्र घर्षणाने जळून जातात. उल्केपेक्षा मोठा आणि थेट पृथ्वीच्या वातावरणात भस्मसात न होता भूपृष्ठावर आदळतो तो अशनी. असाच एक अशनी सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील लोणार येथे कोसळला व त्यातून नयनरम्य लोणार सरोवर निर्माण झाले आहे.
अशनीपाती विवराचे वर्गीकरण करताना 190 महत्त्वाच्या विवरांची नोंद त्यांच्या वयावरून व आकारानुसार करण्यात आलेली आहे. अशी विवरे सागरतळी भरपूर असतील. कारण अवकाशातून काहीही, अगदी कृत्रिम अवकाशयानाचे तुकडे कोसळले तरी ते समुद्रात पडण्याची शक्यता जास्त. कारण पृथ्वीवरील दृश्य भूभागापेक्षा पाण्याचा साठा प्रचंड आहे हे आपण जाणतोच. नोंद होते ती काही कोटी ते काही शतकांपूर्वी भूपृष्ठावर अशनी पडून तयार झालेल्या विवरांची. 10 लाख ते 1 कोटी वर्षांपूर्वीची आणि 5 किलोमीटर व्यासाची विवरे सुमारे 40 आहेत. जगात सर्व देशांत ती आढळतात. काही तर काळाच्या ओघात आणि नैसर्गिक परिणामांमुळे नष्टही झाली असतील.
ऑस्ट्रेलियात आता सापडलेले विवर तिथे सर्वात जुने ठरत असले तरी, घाना, रशिया आणि मध्य आशियाई वाळवंटातही प्राचीन विवरे आहेत. मेक्सिकोमधले प्रसिद्ध चिक्सुलब विवर 150 कि.मी. व्यासाचे आणि 6 कोटी वर्षांचे आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेर्व्हेडिकोर्ट येथील विवर तर 160 कि.मी. व्यासाचे आणि 20 कोटी वर्षांपूर्वीचे असल्याचे म्हणतात. कॅनडातले क्वेबेक त्या तुलनेत 100 कि.मी. व्यासाचे आणि 2 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. पुढच्या काळात आणखी संशोधन होतच राहील आणि कदाचित अधिक जुनी आघात-विवरे नव्याने सापडतील.




























































