पाकिस्तानः अस्थिरतेकडून अनागोंदीकडे…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> (नि.) ब्रिगेडियर हेमंत महाजन

विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पाकिस्तानात सध्या जोर धरला आहे. विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर आंदोलने सुरू केली आहेत. जमात–उलेमा–ए–इस्लामचे (जेयूआय–एफ) नेते फझलूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आझादी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थात आपण राजीनामा देणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानची सध्याची वाटचाल अस्थिरतेकडून अनागोंदीकडे सुरू आहे.

कश्मीरप्रकरणी चहूबाजूंनी अपयश आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता देशांतर्गत राजकारणात फसले आहेत. पाकिस्तानमधीलच कट्टर धार्मिक मुसलमानांच्या, जमात उलेमा-ए-इस्लाम या एका राजकीय पक्षाने राजधानी इस्लामाबादला घेराव करून त्याची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. या राजकीय पक्षाचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान म्हणतात, सध्या सत्तेत असलेले इम्रान खान सरकार अवैध व असंवैधानिक आहे. हे सरकार लोकांनी निवडलेले नसून लष्कराने नियुक्त केलेले आहे. त्यामुळे इम्रान खानने ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. जोपर्यंत इम्रान खान राजीनामा देत नाही तोपर्यंत इस्लामाबादची नाकेबंदी सुरू राहील. इम्रान खान यांना वाटले की आपण मौलानांची समजूत काढून त्यांना परावृत्त करू, परंतु मौलाना आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शेवटी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी मौलाना रहमान यांना भेटीला बोलावले आणि खडसावले की, तुमची कारवाई संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा आझादी मार्च रद्द करा. बाजवा त्यांना म्हणाले की, तुम्ही एक जबाबदार राजकीय नेते आहात आणि आज पाकिस्तान ज्या परिस्थितीत आहे  त्यावेळी असले आंदोलन करणे योग्य नाही. कश्मीर प्रकरणामुळे हिंदुस्थानच्या सीमेवर अशांती, अफगाणिस्तानच्या सीमेवरही गडबड, तिकडे इराण व सौदी यांच्यात ठिणग्या पडत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानला अस्थिर करण्याचे कुठलेही प्रयत्न लष्कर सहन करणार नाही, परंतु मौलाना रहमान अजून तरी वाकले नाहीत.

पाकी लष्करप्रमुखांचेही मौलाना ऐकत नाहीत याचा अर्थ लष्करातील बाजवाविरुद्ध जनरल्सचा मौलानांना छुपा पाठिंबा असावा. कारण बाजवा यांनी स्वतःचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवून घेतल्यामुळे काही जनरल्स अत्यंत चिडले आहे आणि पाकिस्तानी लष्करही दोन गटांत विभागले आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अमेरिका, चीन आणि सौदी अरब यांनी पैसे देणे बंद केले आहे. महागाईने कळस गाठला आहे. इम्रान खान यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. देशातील गंभीर आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख बाजवा यांनी देशातील मोठय़ा उद्योगपतींची एक बैठक 15 दिवसांपूर्वी बोलावली आणि त्यात देशाच्या आर्थिक स्थितीची चर्चा केली. इम्रान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले आहेत. देशात लोकशाही आहे हे जगाला दाखविता यावे यासाठीच लष्कराने पश्चिमेला पसंत पडणारा चेहरा असलेल्या इम्रान खानला निवडले आणि निवडून आणले. इम्रान खान फक्त नावाचे पंतप्रधान आहेत. सर्वात मोठी ताकद लष्कर आहे.

इम्रान खान यांनी सत्तेत येताच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले. पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे आसिफ झरदारी, पाकिस्तान मुस्लिम लीगचे नवाझ शरीफ आणि इतरही अनेक महत्त्वाचे विरोधी नेते सध्या तुरुंगात आहेत. अनेक महिने झाले, परंतु अजूनही त्यांच्यावर आरोप दाखल झाले नसल्यामुळे या पक्षांच्या समर्थकांमध्ये अत्यंत संताप आहे. नवाझ शरीफ यांचा तर तुरुंगात चांगलाच छळ सुरू आहे. त्यांची मुलगी मरियम हिलादेखील वडिलांना भेटू दिले जात नाही. आता तर नवाझ शरीफ यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तुरुंगात असताना त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस् सात हजारांपर्यंत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना गंभीर स्थितीत लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाझ शरीफ कुटुंबीयांनी  इम्रान खान सरकारवर जाहीर आरोप लावला आहे की, नवाझ शरीफ यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. नवाझ शरीफ यांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर पाकिस्तानात मोठा हिंसाचार होऊ शकतो.

या गंभीर परिस्थितीमुळे इम्रान खान बावचळून गेले आहेत. पाकिस्तानने इतका बेजबाबदार पंतप्रधान कधी पाहिला नाही, असे आतापर्यंत इम्रान खानची तळी उचलणारी मीडिया म्हणू लागली आहे.

‘एफएटीएफ’ संस्थेने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने फेब्रुवारी 2020 पर्यंत दहशतवाद्यांविरुद्ध समाधानकारक कारवाई केली नाही तर हा देश ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत जाईल. तसे झाले तर पाकिस्तान आणखीच गर्तेत जाईल. मग त्यांच्या अण्वस्त्रांचे काय होणार?

हिंदुस्थानद्वेषावरच पाकिस्तान आतापर्यंत पोसला गेला आहे. पाकिस्तानात काहीही झाले आणि कश्मीरचा विषय काढला की पाकिस्तानची जनता पुन्हा सर्व विसरून एकजूट उभी राहते. पाकिस्तानची इतकी गंभीर स्थिती या आधी कधीच झाली नव्हती. पाकिस्तानशी फटकून वागणारे ट्रम्प शासन, सीपीईसी प्रकल्प रेंगाळला म्हणून चिडलेला चीन, येमेन युद्धात व इराण विरुद्ध लढत नाही म्हणून सौदी अरब व यूएई यांनी मदतीचा आखडता घेतलेला हात आणि इराण व अफगाणिस्तानशी संघर्ष. अशा रीतीने पाकिस्तान जागतिक स्तरावर चहूबाजूंनी घेरला आहे. देशांतर्गत परिस्थिती पाहिली तर बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद कश्मीर प्रांतात बंडखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीतून पाकिस्तानी लष्कर कसा मार्ग काढणार? सर्वात सोपा मार्ग म्हणजे या सर्व परिस्थितीला इम्रान खान यांना जबाबदार ठरवून पदावरून काढणे आणि दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी बसविणे. तसे होण्याची शक्यता पाकिस्तानात आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी हिंदुस्थानात आश्रय मागितला आहे. हिंदुस्थानने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद कश्मीर प्रांतातील मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उठवत राहावा, त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त कश्मीरवरूनही हिंदुस्थानला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युद्धाचा वापर करून हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे.

[email protected]