लेख – पाकिस्तानी ड्रोन दहशतवादाचे आव्हान

587

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ने ड्रोनच्या मदतीने ‘एके-47’ रायफल, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट नोटा हिंदुस्थानमध्ये पाठवल्या आहेत. या सर्वांचे वजन 80 किलो होते. ड्रोनचा वापर अनेकवेळा करण्यात आला. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद्यांना ड्रोन्समधून शस्त्रपुरवठा झाल्याने हे थांबवा असा आरडाओरडा सुरू आहे. ड्रोनपासून रक्षण करणे हे तितकेसे सोपे नाही हे समजून घेतले पाहिजे. 

ड्रोन्स किंवा अनमॅण्ड एरियल व्हेहिकल्स म्हणजे एक छोटे विमान. ड्रोन्स नेहमीच अनमॅण्ड म्हणजे मानवरहित असतात. जे विनापायलट रिमोटच्या मदतीने उडवता येते. ड्रोनची रेंज त्याच्या आकारावर त्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून असते. सध्या जे ड्रोन आपल्याकडे आहेत ते चार ते पाच किलो वजनापासून ते 20-25 किलो वजन घेऊन 100 ते 200 किलोमीटर दूरपर्यंत जाऊ शकतात. ड्रोन्सचे चालक जमिनीवरून नियंत्रण करून ड्रोन्स उडवितात. नियंत्रण जमिनीवरून होत असल्यामुळे उडण्याचे क्षेत्र मर्यादित असते. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने संगणकीय आज्ञावली व उपग्रहीय संदेश वापरून एका ठरावीक पूर्वनियोजित मार्गावरून उडविता येऊ शकते. त्यामुळे याचा उपयोग शस्त्रे घेऊन जाण्याकरिता (जसा ‘आयएसआय’ने केला) किंवा क्षेपणास्त्र फायर करण्याकरिता (जसा अमेरिका अफगाणिस्तान/पाकिस्तानमध्ये करते) केला जातो. स्वस्त असल्यामुळे व चीनकडून मिळत असल्यामुळे ती दहशतवाद्यांनी वापरली जायची शक्यता नक्कीच आहे.

मात्र प्रश्न असा पडतो की, हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने आले. त्यांना आपल्या रडारने पाहिले का नाही? आपल्याकडील निरीक्षण रडार ही महत्त्वाच्या ठिकाणीच लावलेली असतात. तीसुद्धा युद्धजन्य परिस्थितीत काम करत असतात. संपूर्ण साडेचार हजार पाकिस्तानी सीमेवर किंवा 7 हजार 600 किलोमीटर या समुद्री सीमेवर अशा प्रकारचे लक्ष ठेवणारी सिस्टीम आपल्याकडे नाही. कारण ही सिस्टीम अतिशय महागडी असते. म्हणजेच पाकिस्तानने आपल्या विरुद्ध कमी पैसे लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकारचा दहशतवाद सुरू केला आहे.

ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मितीही त्या मानाने अतिशय सोपी आहे. म्हणून जर ड्रोनच्या मदतीने सीमावर्ती भागात शस्त्र किंवा स्फोटक पदार्थ किंवा अमली पदार्थ पाठवायचे असतील तर आपले रक्षण कसे करायचे? आपली रडार सातत्याने सुरू ठेवणे खर्चिक असते. म्हणजे काही ड्रोन्स सीमेवरून घुसल्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून रडार कव्हरेज देण्याचा विचार करणे अव्यवहार्य आहे. म्हणून कमी किमतीने आपले रक्षण कसे करता येईल यावर अधिक लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे.

आज आपल्या देशामध्ये अनेक मोठी शहरे आहेत. त्यात विविध महत्त्वाच्या संस्था म्हणजे तेल कारखाने, न्यूक्लिअर रिऍक्टर वगैरे आहेत. या सर्वांचे ड्रोनपासून रक्षण करणे महागडे ठरते. आपण ‘एस-400’ नावाची अत्याधुनिक हवाई संरक्षण व्यवस्था रशियाकडून विकत घेत आहोत, परंतु ती केवळ एखाद्या मोठया शहराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ती देशाच्या सर्व जमिनी सीमा किंवा सागरी सीमा यांचे रक्षण कधीही करू शकत नाही. अमेरिकेने तयार केलेल्या क्षेपणास्त्र विरोधी पॅट्रिऑट क्षेपणास्त्राची किंमत 2.4 बिलियन डॉलर आहे. एवढय़ा महागड्या सिस्टीम असूनही छोटय़ा ड्रोनच्या मदतीने केलेले हल्ले त्यांना थांबवता आले नाहीत. महागडी विमाने, प्रचंड महागड्या एअर क्राफ्ट कॅरिअर्स किंवा मोठी जहाजे स्वस्त शस्त्रांपासून(ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र) आपले रक्षण करू शकतात का?

ड्रोन्सवर स्फोटके घालून त्यांचा इम्प्रोव्हाइज एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस म्हणजे उडती आयईडी म्हणूनसुद्धा वापर केला जाऊ शकतो. आयर्लंडमध्ये अशा प्रकारचे स्फोटक पदार्थ हवेतून ब्रिटिश सैन्याविरुद्ध वापरले गेल्याची उदाहरणे आहेत. अशाच प्रकारच्या आयईडीज इराक आणि अफगाणिस्तानात हवेतून अमेरिकन सैन्याविरुद्ध थोड्या प्रमाणात वापरल्या गेल्या आहेत. स्वस्त किमतीतील ड्रोन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने लहान देश किंवा दहशतवादी एका मोठय़ा देशाविरुद्ध हल्ला करून त्यांचे नुकसान करू शकतात.

आपल्या लांबलचक समुद्रकिनाऱ्यावर कुठलीही संरक्षण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यासाठी काय करावे लागेल? हिंदुस्थानी पायदळाच्या बटालियन लढाईमध्ये शत्रूंच्या विमानाविरोधात त्यांच्याजवळ असलेली स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगन यांचा वापर करून हवाई सीमेचे रक्षण करतात. अशाच प्रकारची संकल्पना सीमा संरक्षणासाठी आपल्याला वापरावी लागेल. सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दल, नौदल, तटरक्षक दल आणि शहरात पोलीस किंवा सैन्याने अशा प्रकारची वाहने हवेतून येताना दिसली तर त्यांच्यावर फायर करून त्यांना तिथेच पाडण्याची योजना राबवू शकतील.

स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगन शस्त्रांचा वापर करून जर ड्रोन्सनी महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला केला तर त्यांना पाडावे लागेल, मात्र येत्या काळात ड्रोनच्या विरुद्ध रक्षण करण्यासाठी कमी किमतीची एअर डिफेन्स सिस्टीम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे.

याशिवाय आपल्याला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल की, अशा प्रकारचे ड्रोन हिंदुस्थानात पाठवण्याचा प्रकार केला तर आम्हीही ड्रोन पाठवून तुमचे नुकसान करू शकतो. स्वसंरक्षण करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे. याशिवाय आपल्या देशात तयार होणारे ड्रोन्स आणि त्यांचे महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उड्डाण करणे यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कमी खर्चात दहशतवादी हल्ले हिंदुस्थानवर करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. आक्रमक कारवाया, कमी खर्चिक उपाययोजना यासोबतच अतिशय कल्पकतेने ड्रोन दहशतवादाविरोधात हिंदुस्थानला वापरावे लागेल.

सुरक्षा संस्थांकडून तंत्रज्ञानाचा शोध

देशामध्ये सहा लाखांपेक्षा जास्त वैमानिकविरहित विमाने (यूएव्ही) अनियमित आणि त्यांच्या योग्य नोंदी नसलेल्या अवस्थेत आहेत. संशयास्पद ड्रोनना लगाम घालण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्कायवॉल 100 यांसारखे तंत्रज्ञान जगात आहे. कुठलाही पर्यायच काही महत्त्वाच्या ठिकाणीच वापरला जाई शकतो. कारण ही सगळी महागडी शस्त्रे आहेत. हिंदुस्थानलाच काय, पण इतर विकसित देशांनासुद्धा परवडण्यासारखी नाही. म्हणूनच येणाऱ्या काळात ड्रोन विरोधात आपल्याला स्वस्त शस्त्रे आणि तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तोपर्यंत आपल्याकडे असलेली सरंक्षण व्यवस्थाच वापरावी लागेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या