चेहऱ्याचा जादूगार

859

>> दिलीप ठाकूर

कृष्णधवल अर्थात ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपटापासून रंगीत चित्रपटापर्यंत चित्रपट बनवण्यापर्यंत निर्मितीची पद्धत बदलली, स्टारच्या पिढय़ा बदलल्या, मेकअपचे नवीन तंत्र येत गेले, सुविधा आल्या, एकूणच सिनेमा बदलत गेला पण या सगळ्यात ‘पंढरीदादा जुकर’ हे नाव मात्र आपले वैशिष्टय़ राखत हुकमी राहिले.

चित्रपट माध्यम म्हणजे अनेक कला आणि विज्ञान (तांत्रिक बाजू) यांचा संगम. असे असले तरी फारच थोडे ‘कारागीर’ प्रकाशझोतात येतात अन्यथा स्टार्सचे चेहरे मोहरे यासाठी हा व्यवसाय ओळखला जातो. याच ‘रिऍलिटी शो’मध्ये रंगभूषेचा किमयागार पंढरीदादा जुकर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरले हे त्यांचे मोठे यश होय. कृष्णधवल अर्थात ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपटापासून रंगीत चित्रपटापर्यंत चित्रपट बनवण्यापर्यंत निर्मितीची पद्धत बदलली, स्टारच्या पिढय़ा बदलल्या, मेकअपचे नवीन तंत्र येत गेले, सुविधा आल्या, एकूणच सिनेमा बदलत गेला पण या सगळ्यात ‘पंढरीदादा जुकर’ हे नाव मात्र आपले वैशिष्टय़ राखत हुकमी राहिले. 17 फेब्रुवारी रोजी पंढरीदादा जुकर यांचे निधन झाले.

pandhari-dada-jukar

चित्रपटाच्या जगात ‘मेकअप ’ अर्थात रंगभूषा अतिशय महत्त्वाचा घटक. अनेकांना तर ‘आपण पडद्यावर कसे दिसतोय/दिसणार ’ याचे भारी कुतूहल. पण दादांची शैली वेगळीच होती. ते त्या प्रत्येक स्टारचे मूळ व्यक्तिमत्वाचा पैलू आणि चित्रपटातील त्या स्टारची व्यक्तिरेखा यांचा योग्य मेळ घालत. तेच त्यांचे सामर्थ्य होते. ते करताना पटकथेनुसार काही बदल होतही आणि एकाच वेळेस दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांच्याही अपेक्षा विचारात घ्याव्या लागतात. हे सगळे तसे पटकन न दिसणारे गुण. पण दादांनी ते आत्मसात करताना स्टारमधला माणूस शोधला आणि जोडला आणि आपली एक वेगळी ओळख आणि जागा निर्माण केली.

दादांची वाटचाल खूप मोठी. 1948 साली आपले वडील आजारी पडले म्हणून ‘नारायण हरिश्चंद्र जूकर’ नावाच्या या मुलाने बाबा वर्धम या तेव्हाच्या ख्यातनाम रंगभूषाकाराचा हात धरून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यांच्याकडे ते मेकअपची कला शिकले, आणि बाबांनी त्यांना चित्रपती व्ही. शांताराम यांच्या परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत आणले. तेव्हा अण्णा अर्थात व्ही. शांताराम ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाचे काम करीत होते. अण्णांवरच दादांनी सर्वप्रथम मेकअप केला. व्ही. शांताराम अतिशय कडक शिस्तीचे आणि कामात अगदी चोख, ते दादांचे काम पाहून प्रभावी झाल्याने काही वर्षे पंढरीदादा राजकमलमध्येच रंगभूषाकार म्हणून नोकरीला लागले. नर्गिसजींनी दिग्दर्शक के. ए. अब्बास यांच्याशी पंढरीदादांची ओळख करून दिली आणि ते ‘परदेसी ’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियात गेले. त्यांच्या कामाची दखल घेत 1957 साली रशिया सरकारने त्यांना फेलोशीप दिली. पण असा ‘फॉरेन रिटर्न्स’ रंगभूषाकार महागडा असेल या भीतीने दादांना बराच काळ चित्रपट मिळाले नाहीत. दिग्दर्शक चेतन आनंद यांच्यासाठी दादांनी गौतम बुद्धाचा विग बनवल्याचे बाराशे रुपये मिळालेले मानधन दादांच्या करीयरला वळण आणि रंग देणारे ठरले.

pandhari-dada-jukar-1

तो काळ निर्मिती संस्थांचा होता आणि दादांनी आपल्या कर्तृत्वाने आर. के., यशराज, नवकेतन, राजश्री, अजंठा आर्टस् फिल्म अशा अनेक बॅनरच्या चित्रपटांसाठी काम केले. मराठी चित्रपटासाठीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. दिग्दर्शक के. जी. कोरगावकर यांच्या ‘महानंदा ’ ( 1984) या चित्रपटासाठी त्यांनी वैशिष्टय़पूर्ण रंगभूषा केली. ‘गुंतता हृदय हे’ या नाटकावर आधारित हा चित्रपट कोकणच्या पाश्वभूमीवर असल्याने तेथील संस्कृतीनुसार रंगभूषा आवश्यक होती. त्याचे नेमके भान पंढरीदादांनी ठेवले. या चित्रपटाचे विशेष म्हणजे दिग्दर्शक के.जी. हे खरे तर उत्तम कॅमेरामन, त्यामुळे त्यांच्याही काही रंगभूषाकाराकडून अपेक्षा असणे स्वाभाविक होतेच. कुमार सोहनी दिग्दर्शित ‘पैसा पैसा पैसा’ (1993) आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कदाचित ’ ( 2008) या चित्रपटांसाठी पंढरीदादांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार हा पुरस्कार प्राप्त झाला.

अलीकडच्या काळात दादांनी आपल्या अनुभवाचा नवीन पिढीला फायदा व्हावा यासाठी ‘पंढरीदादा मेकअप अकॅडमी ’ आणि ‘स्टार इन्स्टिटय़ुट’ या संस्था स्थापन केल्या. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे अनेक नवीन मेकअपमन घडले आणि स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली. ते आवर्जून पंढरीदादांचे नाव घेतात.

दादांच्या दीर्घकालीन प्रवासाची राज्य शासनाने योग्य दखल घेऊन त्यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. ज्यांच्याकडे आपला कला प्रवास सुरू केला, त्यांच्याच नावाचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला या गोष्टीने पंढरीदादा भावुक झाले. अशा चौफेर वाटचालीत ते अखेरपर्यंत दादरच्या रानडे रोड येथे राहिले हे विशेष उल्लेखनीय आहे.

फक्त चेहरा रंगवणे म्हणजे चित्रपटासाठीचा मेकअप नव्हे, तर त्या कलाकाराचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वही त्यात दिसायला हवे आणि चित्रपटातील व्यक्तिरेखा त्यात मिसळून जायला हवी याचा संगम त्यांनी योग्यरीत्या सांभाळला. तीच त्यांची खासियत मीनाकुमारी, मधुबाला यांच्यापासून ते माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला यांच्यापर्यंत अनेक भिन्न स्वभाव वैशिष्टय़े असलेल्या स्टार्सना सारखीच आवडली हे जास्त महत्वाचे आहे. अमिताभ बच्चननेही यावर ट्वीट करताना म्हटले की, पंढरीदादांनी असंख्य चेहरे रंगवले… पण त्यांनी तसे करताना असंख्य हृदयांना स्पर्श केला….

पंढरीदादांची वैशिष्टय़े अनेक. विशेषतः प्रसंगानुसार मेकअप हीदेखील त्यांची हातोटी होती. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटासाठी सुनील दत्तच्या दंडावर गोळी लागल्याने ओघळणारी चरबी त्यांनी अशा कल्पकतेने साकारली की, तो मेकअप केलेला आहे असे वाटूच नये. एकीकडे अभिनेत्रीचे सौंदर्य खुलवायचा मेकअप, दुसरीकडे व्यक्तिरेखेनुसार चेहरा तयार करण्याची खुबी आणि त्यातच काही विविधस्पर्शी प्रसंगानुसार कौशल्य अशा विविध स्तरांवर पंढरीदादा यशस्वी ठरले. हे सगळे घडत जाताना त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या आठवणी आणि अनुभव यांचा भरपूर साठा तयार झाला. संवाद कौशल्यातही ते वाकबगार होते आणि म्हणूनच बहुदा त्यांनी आपला मेकअप कधी बरे केला हेच राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत अनेकांना समजलेही नसेल. स्टारला बोलता ठेवत त्याचे मनही जाणून घेत तेही रंगवणारा हा किमयागार वयाच्या 88 व्या वर्षी निधन पावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आपली प्रतिक्रिया द्या