सूर-ताल – तीन दशकांचा सांगीतिक प्रवास

>> गणेश आचवल

एखादा हिंदी, मराठी गाण्यांचा वाद्यवृंद असो किंवा दांडिया रास. रिअॅलिटी शो असो किंवा एखादी सांगीतिक मैफल. गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ अशा मैफलींमधून तबला, ढोलक, ढोल, ढोलकी, कोंगो, ऑक्टोपॅड अशा अनेक वाद्यांवर स्वतची हुकूमत गाजवणारा कलाकार म्हणून आपल्याला परिचित झालेले नाव म्हणजे पंकज धोपावकर!

पंकजला संगीत कलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्याचे वडील विजय धोपावकर हेदेखील गायक होते. त्यांची ‘कलाप्रेमी’ नावाची एक संस्था होती आणि त्या संस्थेतर्फे ते अनेक सांगीतिक कार्यक्रम करायचे. पंकज शाळेत असल्यापासूनच वडिलांना साथ करण्याकरिता कार्यक्रमातून सहभागी होत होता. सुरुवातीच्या काळात त्याने पंडित औसरीकर यांच्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच अनिल गोसावी आणि पंडित माधव पवार हेदेखील पंकजचे या क्षेत्रातील गुरू आहेत. 1995 ते 2000 हा काळ मराठी हिंदी वाद्यवृंदांचा होता. त्यात पंकज तबला वादक म्हणून सहभागी होत असे व भक्तिगीतांचे आणि भावगीतांचे कार्यक्रमातही पंकजला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती.

शालेय शिक्षण घेत असतानाच पुढे मोठेपणी संगीत क्षेत्र हेच करीअर म्हणून करायचे हे ठरवले होते, पण जेव्हा पंकजने हे वडिलांना सांगितले, तेव्हा वडिलांनी त्याला सांगितले की फक्त तबला या वाद्यावर त्याकाळी उपजीविका होणे कठीण होते. तुला इतर वाद्येसुद्धा आली पाहिजेत. वडिलांचा हा सल्ला पंकजने ऐकला आणि हळूहळू ढोल, ढोलकी, ढोलक, कोंगो, ऑक्टोपॅड ही वाद्येसुद्धा तो शिकला.

2002 मध्ये एका हिंदी सांगीतिक कार्यक्रमाकरिता त्याने पहिला लंडन दौरा केला. मग एकातून एक कामे मिळत गेली आणि आजपर्यंत त्याचा वीस विविध देशांत अनेक सांगीतिक कार्यक्रमांत सहभाग राहिला आहे. अमेरिका, दुबई, थायलंड, मलेशिया, लंडन अशा अनेक देशांत त्याने कार्यक्रमात वाद्यसाथ केली आहे. पूर्व आफ्रिकेमध्ये दारे सलाम येथे सलग तीन वर्षे दांडिया रासकरिता पंकज खास ढोल वादनासाठी गेला होता.

सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांच्या कार्यक्रमातही त्याचा सहभाग होता आणि पंकज हा 2007 मध्ये संगीतकार अनिल मोहिले पुरस्काराचा (उत्कृष्ट तालवादक) मानकरी ठरला. महाराष्ट्रदिनी लता मंगेशकर यांच्या सांगीतिक कार्यक्रमात त्याला तबला वादनाची संधी मिळाली. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, सोनू निगम, सुखविंदर सिंग, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, वैशाली सामंत, साधना सरगम, संजीवनी भेलांडे… अशा अनेक मान्यवर गायक-गायिकांच्या कार्यक्रमात पंकजने आपली कला सादर केली आहे.

गेली काही वर्षे पंकज हा संगीत संयोजनदेखील करत आहे. मध्यंतरी चाळीस वादकांना घेऊन एका सांगीतिक कार्यक्रमाचे संगीत संयोजन पंकजने केले होते. तसेच ‘पखवाज’ ही संकल्पना घेऊन ‘लयकारी’ या पंधरा वादकांचा सहभाग असणाऱया कार्यक्रमाचे संगीत संयोजनसुद्धा त्याने केले होते. अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी विविध विषयांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे संगीत संयोजनदेखील तो करतो. सह्याद्री वाहिनीवरील काही कार्यक्रमांत तसेच आकाशवाणीवरील कार्यक्रमातदेखील त्याचा सहभाग असतो. ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिअॅलिटी शोमध्ये सलग चार वर्षे तो तबला वादक म्हणून कार्यरत होता. तसेच नुकत्याच झालेल्या ‘सा रे ग म प लिट्ल चॅम्प्स’ कार्यक्रमात संपूर्ण शेडय़ुलमध्ये त्याने तबला वादनात साथ केली आहे.

तबला वादनापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता संगीत संयोजनापर्यंत आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स समन्वय करण्यापर्यंत आला आहे. भविष्यात अनेक नवीन सांगीतिक संकल्पना घेऊन तो आपल्यासमोर येणार आहे. संगीत ही कला आनंद देणारी आहे, असे तो आवर्जून सांगतो.

[email protected]