ही आमची पोर आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर खेळण्याचे भाग्य लाभलेल्या साध्वी परमपूज्य पार्वतीबाई देशपांडे यांच्या चरित्राचा हा पूर्वरंग.

श्री स्वामी महाराजांमुळे ‘अक्कलकोट’नगरी आध्यात्मिक जगतास सुपरिचित झाली. श्री स्वामी समर्थांचे येथे झालेले 21 वर्षांचे वास्तव्य अक्कलकोटवासीयांसाठी अपार जिव्हाळ्याचे होते. श्रीदत्तावतारी दयाघन सत्पुरुषाचा सहवास त्यांना साक्षात दररोज नित्यनेमाने अनुभवावयास मिळत होता. त्यातल्याच अनेक भाग्यवंतांपैकी एक असलेल्या उमाकांत सोनटक्के यांच्या घराण्यास श्री स्वामी महाराजांच्या प्रेमळ सहवासाचे अपार सौख्य लाभले. उमाकांत यांचे पुत्र नारायणराव हे श्री स्वामी महाराजांच्या विशेष मर्जीतले, त्यांची निस्सीम सेवा करणारे. श्री स्वामींच्या वैचित्र्यपूर्ण लीला अनुभवताना, त्यांच्या सेवेमध्ये एकरूप होताना ते श्री स्वामीरायांना कधी शरण गेले हे त्यांचे त्यांनादेखील समजले नाही.

एकदा नारायणरावांची परीक्षा घेण्याच्या हेतूने श्री स्वामी समर्थांनी एक ‘कौतुक’ लीला केली. सेवेसाठी आलेल्या नारायणरावांना त्यांनी हाक मारली. ‘नाऱया, इकडे ये!’ महाराजांसमोर नारायणराव ‘नम’ उभे राहिले. महाराजांनी एकाएकी आज्ञा केली, ‘आताच्या आता घरदार आणि हे गाव सोडून पुण्याला जा.’ नारायणराव फक्त ‘जशी आपली आज्ञा’ असे म्हणून घरी आले. दोन लहानग्या लेकरांना उचलले, मठामध्ये येऊन आपली दोन्ही लेकरे श्री स्वामी महाराजांच्या चरणांवर ठेवली अन् नमस्कार करून आल्या पावली परत निघाले. तोच त्यांना मागाहून आवाज आला ‘नाऱया थांब!’ नारायणराव पुन्हा मागे फिरले आणि पाहतात तो त्यांच्या लेकीला श्री स्वामीमाऊलीने उचलून आपल्या मांडीवर बसवले होते. तिचे लाड करीत श्रीस्वामी तिच्याशी खेळू लागले आणि मध्येच म्हणाले, ‘ही आमची पोर आहे!’ पुढे गदगदलेल्या आवाजात दोन्ही लेकरांना जवळ घेत म्हणाले, ‘नाऱया, ही दोन्ही मुले माझीच आहेत, त्यांनाही तुझ्यासोबत घेऊन जा.’

श्री स्वामी समर्थांनी नारायणरावांना पुण्यास पाठविण्याचा निर्णय तत्कालीन स्थितीत अतर्क्य वाटत असला तरीही त्रिकालदर्शी परब्रह्माने घेतलेले निर्णय कालांतराने अचूक ठरतात हे विधान सिद्ध करण्यासाठी पुरेसा होता. श्री स्वामींनीच अक्कलकोट संस्थानशी संबंधित श्रीमंत तुळोजीराजे यांना सांगून नारायणरावांची सोय पुण्यामध्ये करविली होती. इथे नारायणरावांनी मात्र मागचा पुढचा कसलाही विचार न करता श्री स्वामीवचनांवर अपार निष्ठा आणि अपार श्रद्धा ठेवून दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि ते पुणे येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आले. नारायणरावांना नरहरी, पार्वती अन माई अशी तीन लेकरे. पुण्यातील बिऱहाडात नारायणरावांचे कुटुंब व्यवस्थित रुळले. मुलांवर उत्तम संस्कार घडत होते. योग्य त्या वातावरणात नारायणरावांची तिन्ही मुले सुसंस्कारित आणि आध्यात्मिक मनोवृत्तीची बनणे हे साहजिकच होते.

छोटय़ा पार्वतीचा जन्म 1877 सालचा. मातोश्री आणि वडीलबंधूंच्या सान्निध्यात रामरक्षा, भगवद्गीता, स्तोत्रे आणि अभंग पार्वतीला बालवयातच मुखोद्गत झाले. बिऱहाडाजवळच्या मुरलीधर मंदिरात जाणे आणि मुरलीधराशी गप्पागोष्टी करणे हा पार्वतीचा मुलखावेगळा छंद होता. पार्वतीची अध्यात्माची गोडी लक्षात घेता नारायणरावांनी तिला सातव्या वर्षीच ‘शक्तिपात’ दीक्षा दिली. श्री स्वामीसहवास लाभलेल्या नारायणरावांनी पार्वतीला अध्यात्माचे वर्म, मर्म आणि धर्म समजावला. शक्तिपात दीक्षा प्राप्त होताच पार्वतीला तीनेक तास समाधीसुख अनुभवता आले आणि अध्यात्माची विस्तृत व प्रगल्भ अशी दिव्यपरंपरा आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलण्याकरिता ती सात वर्षांची पोर सिद्ध झाली. पुढे पार्वती नऊ वर्षांची झाली आणि तिचे लग्न शिरवळच्या कर्तबगार देशपांडे घराण्यातील दत्तोपंतांसोबत करण्यात आले.

गावचे कुलकर्णीपद सांभाळणारे दत्तोपंत निगर्वी आणि धार्मिक वृत्तीचे होते. नऊ वर्षांची पार्वती अठरा वर्षांच्या दत्तोपंतांशी विवाह करून देशपांडय़ांच्या घराचा उंबरठा ओलांडती झाली. दत्तोपंत हरहुन्नरी होते, देवभोळे व सरळमार्गी होते, परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र तितकेच कडक होते. सकाळी सात वाजता ते देवपूजेला बसत असत. पार्वतीबाईदेखील शिस्तीच्या व टापटिपीच्या होत्या. दत्तोपंतांचा आध्यात्मिक अधिकार बराच मोठा होता. त्यांना श्रीटेंबेस्वामींचा यांचा साक्षात अनुग्रह होता तसेच ‘भोर’च्या दत्तमहाराजांचा सहवासही लाभलेला होता.

नसरापूरच्या या देशपांडय़ांचा वाडा मोठा आणि साधनसंपत्तीने पुरेपूर होता. जानकीबाईंनी त्यांच्या हयातीत दत्तोपंत, सीतारामपंत या दोन्ही मुलांना वेगळे संसार थाटून दिले होते मात्र मालमत्ता सीतारामपंतांच्या कुटुंबाकडेच राहिली. जानकीबाईंना समाजात प्रतिष्ठा होती, अत्यंत हुशार, चतुर आणि कर्तव्यदक्ष असलेल्या जानकीबाईंना वैद्यकीचे आणि ज्योतिषाचेही ज्ञान होते. नुसती नाडी पाहून त्या रुग्णाचा आजार ओळखत असत. यजमान गेल्यावर जानकीबाईंनी स्वसामर्थ्यावर त्याचा संसार उभा केला होता. पार्वतीबाईंनी आपल्या सासूबाईंकडून वैद्यकी आणि ज्योतिषाचे ज्ञान शिकून घेतले. दररोज श्रीज्ञानेश्वरी वाचणे आणि त्यातील प्रत्येक ओवीवर चिंतन, मनन करणे यातूनच पुढे, पार्वतीबाईंना श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधील अवीट गोडी अनुभवाने कळली.
येथून पुढे पार्वतीबाईंना विविध प्रापंचिक संकटाना सामोरे जावे लागले. यात पाठोपाठ जन्मलेल्या सहा अपत्यांचे मृत्यू, वडील व गुरू नारायणराव यांचे देहावसान, सासू जानकीबाईंना झालेला उदररोग, मालमत्तेसंदर्भातील कटकटी आणि संसाराची वाढती जबाबदारी अशा अनेक समस्यांचा समावेश होता. त्यातल्या त्यात सुखावह गोष्ट एकच होती आणि ती म्हणजे, मृत्यू येण्यापूर्वी जानकीबाईंनी पार्वतीबाईंच्या डोक्यावर हात ठेवून भविष्य वर्तवले की, ‘श्री स्वामी समर्थ आणि श्री टेंबे स्वामी या दोघा सत्पुरुषांची तुझ्यावर कृपा आहे. तुझी सेवा फळाला येईल आणि तुझ्या पोटी जन्म घेणारा मुलगा साक्षात्कारी असेल. तो केवळ या कुळाचाच नाही तर जगाचाही उद्धार करेल.’

पार्वतीबाईंना पतीसुख लाभले तरीही पुत्रसुख लाभत नव्हते. दत्तोपंत दर पौर्णिमेस नरसोबाच्या वाडीला जात असत. या खेपेस मात्र ते पार्वतीबाईंसह गेले. उभयतांनी अपत्यप्राप्तीचे गाऱहाणे श्रीदत्तांच्या मनोहर पादुकांसमोर मांडले. देवांनी त्यांना श्री टेंबे स्वामींकडे जाण्याचा आदेश दिला. पती-पत्नी श्री टेंबे स्वामींपाशी दुःख मांडते झाले तेव्हा त्यांनी कृपाशीर्वाद देत सांगितले, ‘दीर्घायू अपत्यप्राप्ती होईल. काळजी करू नये!’ पार्वतीबाईंना गर्भ राहिला. पुढे प्रसूतीची वेळ भरत आली तेव्हा त्यांना श्री टेंबे स्वामींनी दृष्टांतात सांगितले, ‘गुरुवारी आमच्याच पूर्णांशाने मुलगा होईल. काळजी नसावी. त्याचे नाव ‘श्रीपाद’ ठेवा!’ थोडय़ाच दिवसांत गरुडेश्वर क्षेत्री श्री टेंबे स्वामींनी समाधी घेतली आणि त्याच दिवशी त्याच वेळी, त्याच घटिका-पळांना साक्षी ठेवून पार्वतीबाई प्रसूत झाल्या. टेंबे स्वामींच्या पूर्णांशाने नवे देहरूप धारण केले होते.

[email protected]