ठसा – पतंगे गुरुजी

2921

>> सुरेंद्र तेलंग

दक्षिण मुंबईतील खेतवाडी 8 व्या गल्लीतील आनंद बाल संगीत कला मंडळ या लोकप्रिय संस्थेचे संस्थापक बळीराम नानाभाई पतंगे यांनी 7 सप्टेंबर 1977 रोजी संस्था स्थापन केली. गेली 42 वर्षे अविरत सेवा करणारे संस्थापक पतंगे गुरुजी यांचे नुकतेच 18 डिसेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 1988 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. आनंद बाल संगीत कला मंडळ ही खेतवाडी विभागातील 8 व्या गल्लीतली संगीत क्षेत्रातील नामवंत संस्था आहे. या संस्थेची स्थापना सुप्रसिद्ध गानसम्राज्ञी हिराबाई बडोदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्यन हायस्कूल (गिरगाव) येथे झाली. या कार्यक्रमास हेमंत कारंडे (कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी), बाबासाहेब महाडिक (ज्येष्ठ नाटय़ कलावंत), अरविंद आचार्य (बी. एससी. बी.एड), गुरुवर्य आर. जी. जोशी (व्हायोलिन वादक), मधुकरराव कांबळी, व्यंकटेश पै आदी मान्यवर उपस्थित होते.

वयाच्या सातव्या वर्षांपासून तबल्याची साथ करणारे पतंगे गुरुजी यांनी आपले अवघे आयुष्य संगीत क्षेत्राला वाहिले. शिक्षकाचा पिंड असलेल्या मास्तरांना कल्पना होती की, लहान वयात मनातल्या कोमल अवस्थेत कोणतीही विद्या विद्यार्थ्यांच्या अंगी चटकन उतरते आणि या विचाराने प्रेरित होऊन पंतगे मास्तरांनी संगीतातून बाल मनाला आनंद देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली.

सुरुवातीपासून मंडळातील लहान मुलांना त्या काळी जबरदस्त माध्यम असलेल्या रेडिओ (आकाशवाणी) व दूरचित्रवाणीवर पतंगे गुरुजी कार्यक्रमाची संधी देत असत. अनेक विद्यार्थी सुरुवातीच्या काळापासून वेगवेगळय़ा स्पर्धेमध्ये पतंगे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली उत्तंgग यश संपादित करीत होते. या आनंद बाल संगीत कला मंडळाची स्थापना करून त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना संगीताचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. अतिशय नाममात्र शुल्कात ते विद्यार्थ्याला शिकवीत असत. पुरेसे पैसे नाहीत म्हणून कुणीही संगीत शिक्षणापासून वंचित राहू नये ही गोष्ट पतंगे सरांनी आपल्या आयुष्यात पुरेपूर जपली. 1977 साली आनंद बाल संगीत कला मंडळ स्थापनेनंतर पहिला तबला विशारद विद्यार्थी म्हणजे सुप्रसिद्ध तबला वादक जगदीश मयेकर. मास्तरांनी जगदीशची इतकी तयारी करून घेतली की, तीन वर्षांत विशारद होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला. अतिशय लहान वयात मास्तरांकडे वेगवेगळी वाद्ये शिकायला येणाऱया विद्यार्थ्यांना मास्तरांनी त्यांच्या आवडीप्रमाणे हलकीफुलकी गाणी वेगवेगळय़ा रागांमध्ये स्वरचित छोटय़ा छोटय़ा धूनच्या माध्यमातून वाजवायला देऊन त्यांच्यामध्ये संगीताची आवड निर्माण केली.

7 ऑक्टोबर 2000 रोजी दसऱयाच्या शुभमुहूर्तावर ग्रॅण्टरोड येथील साईधाम मंदिरात आनंद बाल संगीत कला मंडळाने ‘स्वर आनंद’ या वाद्यवृंदाद्वारे आपली संगीत सेवा श्री साईचरणी भक्तिगीते, अभंग, भावगीते सादर केली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2000 रोजी साहित्य संघ मंदिरात ‘स्वर आनंद’ वाद्यवृंदाद्वारे चित्रपट गीते व भावगीते सादर केली. 7 जुलै 2001 रोजी संगीत सभा (मुंबई) व ब्राह्मण सभा (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त बळीराम पतंगे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. तेव्हाही ‘स्वर आनंद’ वाद्यवृंदाने कार्यक्रम केला. साई संस्थान (शिर्डी) येथे 20 नोव्हेंबर 2001 रोजी वाद्यवृंद सादर केला. हा कार्यक्रम पाहून संस्थानच्या पदाधिकाऱयांनी अधिक मासानिमित्त लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम करण्याची संधी दिली. 26 ऑगस्ट 2004 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष देवस्थान येथे वाद्यवृंद केला. ठाकूरद्वार येथील दत्तमंदिर प. पू. वासुदेवानंद टेंबेस्वामी यांच्या 150 व्या समाधी वर्षानिमित्त 23 फेब्रुवारी 2014 रोजी वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर केला याशिवाय अनेक ठिकाणी पतंगे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदाचे कार्यक्रम सादर केले.

1988 साली शिवसेना खेतवाडी शाखेतर्फे भगवा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पतंगे गुरुजींचा सत्कार करण्यात आला होता. 28 सप्टेंबर 1997 रोजी शिष्य वर्गातर्फे पतंगे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पतंगे गुरुजींना 2002 साली प्रभाकर भालेराव स्मृती नाटय़सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या