लेख – विचारस्वातंत्र्यावर सुनियोजित नियंत्रण

>> अजित कवटकर

मानवाच्या प्रत्येक कृतीवर आज कशाचा नाही कशाचा तरी प्रभाव नक्कीच कार्यरत असतो. म्हणजेच आपल्या  मनाला असंख्य गोष्टी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यात ते बहुतांश सफल ठरतात. याचा अर्थ असाही होतो की, आज आपल्या विचारस्वातंत्र्यावर बाह्य घटकांचे सुनियोजित अतिक्रमण आणि नियंत्रण होत असते आणि त्यामुळे आपण आपली निर्णय स्वायत्तता आज पूर्णपणे हरवून बसलो आहोत.

आज परिस्थितीनुरूप लोकांच्या सवयी व विचारसरणीचा रंग झपाटय़ाने बदलताना दिसत तर आहेच, पण संस्कार,संस्कृती, चालीरीती, रूढीपरंपरादेखील या सततच्या ‘न्यू अँण्ड डिफरंट’च्या आसक्तीमुळे आपली कात टाकून वारंवार एक वेगळे रूप धारण करत आहेत. हे सगळं होत असताना आपल्याला वारसा म्हणून लाभलेल्या सात्त्विकतेतील सत्त्व कितपत टिकून राहणार आहे?

अंगावरील वस्त्रं किती जरी साधी असली तरी चालतील, परंतु ते स्वच्छ असावेत आणि विशेष म्हणजे फाटके नसले पाहिजे. आपल्या संस्कृतीचे हे आपल्यावरील संस्कार ‘होते’, परंतु आज थोडी मळकट दिसणारी ‘डिस्ट्रेस्ड (उसवलेली) जीन्स’ परिधान करणे ‘स्टाईल स्टेटमेंट’ आणि ‘हॅपनिंग’ दिसण्याच्या मोहाला अपरिहार्य वाटू लागले आहे. संस्कारांच्या मुळाशी असणाऱ्या विचारांना जिथे फाटे फुटू शकतात, तिथे अन्य कशाचे काय ? ‘आधीपेक्षा काहीतरी वेगळं’ हा मंत्र जणू आज जगण्यातली हौस झाली आहे. याच गरजेची पूर्तता करण्यासाठी आज वस्तू व सेवांचा महापूर आला आहे. आपण उत्पादित केलेलं उत्पादन ग्राहकांनी विकतच घेतले पाहिजे यासाठी मग विपणनाच्या माध्यमातून सुरू होतो भ्रमिष्ट करणारा ‘ऍडव्हर्टायझिंग’चा अविरत मारा. गरज नसतानाही गरज असल्याची जाणीव पेरून ग्राहकाला त्या वस्तू वा सेवांचा उपभोग घेण्यासाठी ती खरेदी करण्यास मजबूर करणे हेच टार्गेट. आमच्या वस्तू व सेवांमुळे तुमचे जीवन कसे अधिक सुखकारक व सकारात्मक होईल असे जेव्हा प्रसार माध्यमांतून दिवसरात्र ऐकवलं जातं तेव्हा मनात विचार येतो की, आपण जर का हा अनुभव प्राप्त नाही केला तर मग आपण जीवनात काय मिळवलं, काय अनुभवलं, काय उपभोगलं! माणूस म्हणून मनुष्यप्रवाहात राहण्यासाठी आपल्याला समाजकृत्याचे अनुकरण करणे आवश्यक वाटते. याच ‘हर्ड मेंटॅलिटी’वर प्रभुत्व प्रस्थापित करणारा, नियंत्रित करणारा एक नरेटिव्ह तयार केला जातो, जो खोटय़ाचं खरं आणि नव्हत्याचं होतं असल्याचे बिंबविण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय… सगळेच आज याच्या आहारी गेले आहेत. त्यातूनच उत्सर्जित होणाऱ्या माहितीच्या अनेक प्रवाहांच्या महाकाय संगमात आज संपूर्ण मानवजाती स्वतःला हरवून बसली आहे.

माहितीच्या अशा सततच्या वर्षावामुळे काय लक्षात ठेवायचे आणि काय नाही या विवंचनेत स्मरणशक्ती कमजोर होऊ लागली आहे. त्यामुळेच तर आजकाल सारं काही चालून जातं. कारण केलेले गुन्हे, पापं, भ्रष्टाचार झाकण्यासाठी, लोकांच्या मनातील या आठवणींवर नवीन माहितीचा जाणीवपूर्वक भार टाकला जातो, गर्दी केली जाते. ही नवीन माहिती आपल्याला जुन्या माहितीपासून दूर करते आणि एका वेगळ्याच भावनेमध्ये गुंतवत अनोख्या विश्वात घेऊन जाते, ज्यात शिरताच बुद्धीला भूतकाळाचा विसर पडतो. जे वर्तमानात दिसतं, जाणवतं तेच खरं मानून चालायचं असा सोपा, परंतु घातक युक्तिवाद आजच्या पिढीने स्वीकारला आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘इन्स्टंट नूडल’ ब्रॅण्डच्या नूडल्समध्ये घातक रसायन सापडल्याचा आरोप झाल्यानंतर संपूर्ण देशभर त्यावर बंदी आणण्यासाठी निर्देशनं झाली आणि सरकारनेदेखील काही काळासाठी सदर उत्पादनावर रोख लावला. नंतर काही महिन्यांनी जेव्हा तो ब्रॅण्ड पुन्हा बाजारात आला तेव्हापासून ते आजतागायत तो या अन्न विभागात निर्विवादपणे ‘मार्केट लीडर’ म्हणून वर्चस्व गाजवतो आहे. सध्याच्या ‘ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड प्रमोशन’ची जादू अशी आहे की, जी वाल्याचा वाल्मीकी आणि वाल्मीकीचा वाल्या बनवू शकते. काही दशकांपूर्वी राजकारणातील व्यक्तीला लागलेला एखादा कलंक त्याची संपूर्ण कारकीर्द उद्ध्वस्त करू शकत होता, परंतु आज मात्र कोणी किती जरी खालची पातळी गाठली तरी तो उजळ माथ्यानेच समाजात वावरताना उत्तरोत्तर राजकीय प्रगती करताना दिसतो. स्वतःला साजेसा नरेटिव्ह प्रसार माध्यमांतून प्रसारित करणारी करोडोंची ऍडव्हर्टायझिंग करायची आणि लागलेले डाग या मेकअपखाली झाकून टाकायचे. या ‘इमेज मॅनेजमेंट’ शास्त्राद्वारे जनतेला मूर्ख बनविणारी कला राजकारणाला अवगत झाली आहे. आजची अनागोंदी त्याचेच परिणाम आहेत.

जिथे एकीकडे वस्तू व सेवा प्रसार माध्यमांवरून उत्कृष्टतेचे आणि परिपूर्णतेचे सर्रास खोटे दावे करत आहेत, तिथेच दुसरीकडे सत्ताधारी भ्रष्टाचार संपविण्याची भाषा करताना भ्रष्टाचारालाच सुरक्षित मार्ग तयार करून भ्रष्टाचाऱ्यांसाठी पायघडय़ा अंथरताना दिसत आहेत. प्रगती, विकास, रोजगार, गरिबी निर्मूलन वगैरेंच्या उपलब्धींवर तर सरकार पक्षातर्फे सर्वत्र स्तुतिसुमने उधळली जात आहेत, परंतु ‘ग्राऊंड रिऑलिटी’ तशी आहे का? जनतेला हे सगळं कळतं, परंतु ते तेवढय़ापुरतंच. कारण फसवणारा जेव्हा रेटून खोटं बोलून त्यावर भावनांचा गुळगुळीत मुलामा चढवून झळाळी आणतो, तेव्हा ते लोकांना दिपवून टाकते, मोहून टाकते, विचारदृष्टीवर पट्टी बांधते. तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवाहांमध्ये पद्धतशीरपणे सर्वांना ओढण्याचे, सामील करण्याचे नियोजनबद्ध काम केले जाते. आपल्याबरोबरचे जर एका विशिष्ट पद्धतीने विचार करत असतील तर आपण वेगळा विचार करून कसा चालणार ! आपण त्यांच्याप्रमाणे विचार व कृती केल्यास त्यांच्यातले एक समजले जाऊ अन्यथा नव्हे, अशी सामाजिक मानसिकता आज तयार करण्यात आली आहे. याच ‘सोशल सायकॉलॉजी’वर बोट ठेवून आज व्यापार, व्यवसाय व राजकारण केले जात आहे. व्यक्तिगत विचार प्रक्रियेत हस्तक्षेप करून त्यास नियंत्रित केले जात आहे. आपण काय खावे, काय घालावे, काय करावे, कुणाला मत द्यावे या सगळय़ावर बाहय़ नियंत्रण आहे. बुद्धिमान समजला जाणारा मानव आज आपली बुद्धी वापरेनासा झाला आहे का? चूक की बरोबर, योग्य की अयोग्य? याची तो बिनचूक पारख करू शकत नाही आहे का? कुणी कितीही चुकीचे, अन्यायकारक वागले तरी आपण पर्याय नसल्यासारखे त्याच्यामागे फिरतो, त्याचे सर्व अपराध पोटात घालतो, अन्याय पचवतो. का? तर तो त्याच्या मनमर्जीनुसार आपल्या भावना खेळवतो, मॅनेज करतो. आपल्या निर्णय अधिकारावर दुसऱ्याची हुकुमत चालू देणे हे बेबंदशाही, हुकूमशाहीला प्रोत्साहन नव्हे का? विवेकी असणारी आपली तर्कबुद्धी प्रत्येक ‘मॅनिप्युलेटिव्ह मटेरियल’चा योग्य तो सोक्षमोक्ष लावू शकते. तसे झाल्यास मग कोणीही आपल्याशी जुगाड करणारा जुमला योजणार नाही.