लेख – ध्रुवतारा ‘अढळ’ नसतो!

983

>> दिलीप जोशी

तुम्ही म्हणाल, हे काय काहीतरीच सांगताय! लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय की ध्रुवतारा ‘अढळ’ असतो. बाळ ध्रुवाला ‘अढळपद’ मिळाल्याची कथाही आम्ही ऐकलीय. खरंच आहे. ती कथा मलाही ठाऊक आहे. ‘अढळ’ ध्रुवतार्‍याचा मागोवा घेत अंधार्‍या रात्री सागरसफर करणार्‍यांना दिशाज्ञान होतं हेसुद्धा माहीत आहे आणि आम्ही खगोलीय अभ्यासात प्रत्यक्ष आकाशदर्शन घडवताना ‘अढळ’ ध्रुवतारा रात्रभर दाखवत असतो. दिशानिश्चितीसाठीचं त्याचं महत्व सांगतो.

मग ध्रुवतारा अढळ नसतो या म्हणण्याला काय अर्थ? अर्थ आहे. आपल्या हयातीत किंवा आपल्या मागच्या काही ‘शे’ वर्षाच्या पिढय़ांच्या काळात आणि येणार्‍या शेकडो पिढय़ांनाही हाच ध्रुवतारा ‘अढळ’ स्वरूपात दिसणार आहे. पण आणखी सुमारे तेरा हजार वर्षांनी त्याचं हे ‘अढळपद’ ढळेल आणि ‘अभिजीत’ किंवा ‘व्हेगा’ हा तारा ध्रुवतारा असेल! मग आताच्या ध्रुवतार्‍याच्या पूर्वी कोणता तारा ‘अढळपदा’वर होता? होता ना! त्याचं नाव ठुबान. वासुकी (किंवा ड्रको) या विशाल तारकासमूहातला ठळक तारा सुमारे सहा-सात हजार वर्षांपूर्वी ‘ध्रुवतारा’ होता. म्हणजे पृथ्वीचा कललेला अक्ष बरोबर त्याच्या दिशेने रोखलेला होता. आता तो सध्याच्या ध्रुवतार्‍याकडे आहे. इजिप्तमधले प्राचीन पिरॅमिड ‘ठुबान’ या एकेकाळच्या ध्रुवतार्‍याकडेच त्यांची टोकं रोखून होते किंवा तसेच उभारले होते असंही म्हटलं जातं.

असं का घडतं? ध्रुवतारा का बदलतो? त्याचं कारण आणि कालावधी काय? असे अनेक प्रश्न मनात आले तर चांगलंच आहे. त्यामुळे ध्रुव तार्‍याकडे अधिक कुतूहलाने पाहता येईल. हल्ली आपण पाहतो तो ध्रुवतारा म्हणजे ‘पोलॅरिस’ आपल्या सूर्यमालेपासून 433 प्रकाशवर्षे दूर असून तो सूर्याच्या साडेपाच पट मोठा आहे. उत्तर आकाशात तो स्थिर दिसत असला तरी व्याध किंवा अभिजीतसारखा ठळक दिसत नाही. रात्रीच्या निरभ्र काळोखी आकाशात सप्तर्षी किंवा शर्मिष्ठा यापैकी एक नक्षत्र सूर्यास्तानंतर दिसतंच. त्यातील ताऱ्य़ांवरून ‘ध्रुव’ दाखवणारी रेषा काढून हा तारा लक्षात ठेवता येतो.

आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो म्हणून पृथ्वीच्या अक्षाच्या उत्तर टोकापासून अंतराळात सरळ जाणार्‍या रेषेवर ध्रुवतारा दिसतो. दक्षिण गोलार्धातून तो अर्थातच दिसत नाही. दक्षिण ध्रुवापासून अवकाशात रेषा काढली तर ‘सदर्न क्रॉस’ दिसेल पण त्याला ध्रुवतारा म्हणत नाहीत.

पृथ्वीवर आपण उत्तर गोलार्धात जेवढय़ा अक्षांशावर असतो तेवढ्याच अंशात्मक उंचीवर उत्तर आकाशात आपल्याला ध्रुवतारा दिसतो. महाराष्ट्र 19 त 20 अंश उत्तर अक्षांशावर आहे. त्यामुळे आपल्याकडून सर्वत्र सारख्याच अंतरावर ध्रुवतारा दिसेल. उज्जैनला तो थोडा वर म्हणजे साडेतेवीस अंशांवर दिसेल आणि थेट उत्तर ध्रुव प्रदेशात म्हणजे आइसलॅण्डच्याही वर जाऊन उभं राहिलं तर तो डोक्यावर दिसेल. याउलट आपण श्रीलंकेखालून जाणार्‍या विषुववृत्तावर गेलो तर ध्रुवतारा उत्तर क्षितिजावर दिसेल आणि दक्षिण गोलार्धातून कधीच दिसणार नाही.

आता ध्रुवतारा का ‘ढळतो’ त्याविषयी. त्याला कारण पृथ्वीची परांचन गती (प्रिसोशन) पृथ्वी 23 तास 56 मिनिटांत स्वत:भोवती परिक्रमा पूर्ण करते. सेकंदाला 460 मीटर या वेगाने पृथ्वी स्वत:भोवती फिरते. 40,075 किलोमीटर परिघ असलेला आपला विशाल निळा ठाह अक्षाभोवती फिरताना किंचित डुलतो. त्याची तुलना फिरत्या भोवर्‍याशी केली जाते. गरगरत्या भोवर्‍याचं वरचं टोक नीट पाहिलं तर त्यावरून गतिमान भोवरा किंचित डुलतोय आणि त्याचं वरचं टोक हवेत एक (काल्पनिक) वर्तुळ निर्माण करतंय असं जाणवेल. पृथ्वीच्या आकारमानामुळे हे अवकाशातलं ‘वर्तुळ’ विशाल असतं. त्यावर येणारे तीन ठळक तारे आळीपाळीने पृथ्वीच्या अक्षाशी सरळ रेषा करतात. (चित्र पहा) हे एक अधांतरी वर्तुळ पूर्ण व्हायला सुमारे 15 हजार 750 वर्षे लागतात. त्यात तीन वेगवेगळ्या तार्‍यांना बराच काळ ‘अढळपद’ लाभतं. म्हणूनच लघु सप्तर्षी (असा मायनर) तारका समूहातला ‘ठुबान’ हा गतकालीन ध्रुवतारा. तर पुढच्या (लायरा) तारका समूहातला अभिजीत (व्हेगा) हा सुमारे 13 हजार वर्षांनी होणारा ध्रुवतारा.

तेव्हा आपल्या आणि आपल्या अनेक पिढ्यांचा ध्रुवतारा सध्या आहे तोच ‘अढळ’ राहणार आहे! सव्वीस हजार वर्षांच्या चक्रात त्याचं अढळपद जाणं आणि पुन्हा येणं दोन्ही अटळ आहे. कारण पृथ्वीची भोवती फिरण्याची गती शतकामध्ये काही मिलिसेकंदांनी मंदावत असली तरी त्याने काय फरक पडतो!

त्यामुळे ‘ध्रुवबाळा’ची कथा आणखी हजारो वर्ष तशीच राहील. नंतर ती पुढच्या ध्रुवतार्‍याशी निगडीत होईल इतकंच. या रंजक कथा आपल्याला आकाश वाचायला करतात म्हणून लक्षात ठेवायच्या. एरवी खगोलीय घटनांशी त्यांचं वैज्ञानिक नातं नसतं. मात्र त्यातून मिळणारा वैज्ञानिक अभ्यासाची दिशा बरंच ज्ञान देते.

आपली प्रतिक्रिया द्या