ठसा – प्राचार्य ल. बा. रायमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  प्रशांत गौतम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ल. बा. रायमाने यांच्या निधनाने दलित साहित्य चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. दलित साहित्याच्या संवर्धानात साठव्या दशकापासून त्यांचे मोठे योगदान लाभलेले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर रोजी झाले होते. त्याच दिवशी रायमाने यांनीही जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत उतारही पडत नव्हता, पण आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असताना हॉस्पिटलमध्येच बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची इच्छा बोलून दाखवली. पत्नी आणि मुलाचा होकार मिळाला. 4 डिसेंबरला दुपारी चार वाजता धर्मांतर करून धम्म स्वीकारला. रुग्णशय्येवर त्यांना दीक्षा देण्यात आली. बावीस प्रतिज्ञांचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याच वेळी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही ऋणातून मुक्त झाले आणि 6 डिसेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते पुरोगामी व सत्यशोधक विचारांचे होते. याची प्रचीती त्यांनी केलेल्या देहदानातून दिसून आली. आपल्या लेखन साहित्याच्या प्रवासात त्यांनी वैचारिक प्रबोधनात्मक लेखन केले. विविध संमेलनांच्या परिसंवादात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करीत असतानाच अनेक विद्यार्थी घडवले. संभाजीनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्या महाविद्यालयाचे ते सेवानिवृत्त प्राचार्य होते. त्यांच्यावर बाबासाहेबांच्या विचाराचा मोठा प्रभाव होता. मिलिंदमध्ये येणारा विद्यार्थी हा घडलाच पाहिजे. अशा उद्देशाने ते रात्रंदिवस प्रयत्नशील असायचे. अध्ययनासाठी येणाऱया विद्यार्थ्यांसाठी पालकाची भूमिका बजावायचे. त्यांचे लक्ष केवळ भावनेपोटीच होते असे नाही तर अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यास ते आर्थिक पाठबळ देत असत. त्याची वाच्यता ते कधीही करीत नसत. म्हणूनच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओखळले जात असत. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी कर्तव्याच्या नि आत्मीय भावनेतून शिकवले त्यात कितीतरी डॉक्टर्स, इंजिनीअर्स, प्राध्यापक म्हणून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या मिलिंद महाविद्यालयात डॉ. म. ना. वानखेडे, प्राचार्य म. भि. चिटणीस आणि प्रा. रा. ग. जाधव कार्यरत असल्याच्या काळात प्राचार्य रायमाने यांचाही सक्रिय सहभाग राहिलेला आहे. वानखेडे, चिटणीस, जाधव ही मराठी साहित्याच्या संवर्धन, संगोपन काळातील प्रमुख संवर्धक मंडळी होत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी प्राचार्य रायमाने यांना मिळाली. असे तीन-चार दिग्गज मराठी साहित्याचे अभ्यासक एकत्र आले तर काय बदल होऊन शकतात त्याची प्रचीती अनेकांनी घेतली. 1963च्या सुमारास प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर प्राचार्य रायमाने यांनी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भित्तिपत्रकाचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे नव्याने लिहू पाहणाऱया नवोदित लेखक, कवींना व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपलब्ध झाले. मिलिंदच्या संस्कारातून आकारास येणाऱया विद्यार्थी लेखकांनी आपल्या विदारक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारे अनुभव लेखन ताकदीने केले. बघता बघता या उपक्रमाची नोंद राज्यपातळीवर घेतली गेली. त्यातून उदयास आलेल्या चळवळीसाठी वानखेडे, चिटणीस, जाधव यांच्याबरोबर रायमाने यांचा सक्रिय सहभाग राहिला. एवढेच नव्हे, तर अस्मिता मिलिंद साहित्य परिषदेचेही याकामी महत्त्वाचे योगदान राहिले. या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना लिहिते केले. एवढय़ावरच न थांबता साठ ते सत्तर या दशकात दलित साहित्याला उभे करण्यात मोठी व महत्त्वाची भूमिका बजावली. यासंदर्भात प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, दलित साहित्य संस्कृतीची निळी पहाट या पर्वाचे रायमाने हे एक शिल्पकार होते.

प्राचार्य लक्ष्मण बाळू रायमाने यांची ओळख मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक, व्यासंगी समीक्षक अशी होती. दलित साहित्याचे ते भाष्यकार होते. बेळगाव जिल्हय़ात चिकोडी तालुक्यातील अंकली या गावी 24 जानेवारी 1937 रोजी जन्म झालेल्या रायमाने यांनी अंकली येथूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठात बी. ए. साठी त्यांनी संस्कृत, मराठी हा विषय घेतला, तर एम. ए. कर्नाटक विद्यापीठात धारवाड येथून पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संभाजीनगरात मिलिंद महाविद्यालय स्थापन केल्यानंतर ते 26 ऑगस्ट 1963 पासून मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 31 जाने. 1995पर्यंत त्यांनी या महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख पद सांभाळले. अभ्यासू, चिंतनशीलतेची जोड असलेल्या रायमाने यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार होते. बाबासाहेबांच्या आठवणीचे इंदुमती चिटणीस यांचे ‘आमचे डॉक्टर’ हे पुस्तक तसेच राधाबाई वराळे यांचे ‘मातोश्री रमाबाई आंबेडकरांच्या सहवासात’ अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. बाबासाहेबांचा चरित्रग्रंथ काशिनाथ पोतदार यांनी लिहिला होता. त्याचे कानडी भाषांतर रायमाने यांनी केले. प्राचार्य रायमाने यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की, ते विद्यार्थ्यांचे वर्गातील आणि विद्यार्थ्यांचे वर्गाबाहेरीलही प्रश्न सोडवत असत. त्यांच्यात सृजनात्मकता शोधत असत. याच सजगतेमधून त्यांनी महाविद्यालयात भित्तिपत्रकाचे माध्यम उपलब्ध करून दिले. ज्यातून भविष्यातील अनेक साहित्यिक निर्माण झाले. ज्यात प्रख्यात कवी प्रा. डॉ. यशवंत मनोहर, कथाकार योगिराज वाघमारे, राम दोतोंडे, डॉ. महेंद्र भवरे, डॉ. अरुणा लोखंडे, प्राचार्य प्र. ई. सोनकांबळे अशी अनेकांची नावे सांगता येतील. प्राचार्य रायमाने यांच्या लेखन आणि योगदानाची अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी नोंद घेतली. आयुष्यभर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करणाऱया निष्ठावंत अनुयायाचा प्रवासही महापरिनिर्वाणदिनीच थांबला. त्यांच्या निधनाने नागसेन परिसरातील साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रातील अखेरचा दुवाही आता निखळला आहे.